उद्याच्या काळजीने आजची भाकरी गोड लागत नाही! येणारा प्रत्येक दिवस हा जणू अज्ञाताच्या प्रांतातून उलगडत असतो. त्या दिवसात माझ्या जीवनात काय घडणार आहे, याची मला किंचितही पूर्वकल्पना नसते. अमुक घडेल, असं मी मानतो, पण ते तसंच घडतंच असं नाही, असा माझा अनुभव असतो. तेव्हा माझ्या मानण्या- न मानण्यानुसार गोष्टी घडत नाहीत. जे व्हावं, असं मला वाटतं ते होईलच, याचा काही भरवसा नाही. जे टळावं, असं मला वाटतं, ते टळेलच याचाही काही भरवसा नाही. तेव्हा या ‘उद्या’ची मला नेहमीच चिंता असते. या ‘उद्या’च्या स्वप्नात रमत असतानाही, ती स्वप्नं पूर्ण होतील की नाही, याचीही मला चिंता असतेच. कारण जे जे काही या घडीला अज्ञात आहे, त्याची मला सुप्त भीती वाटत असते. त्या उद्याच्या चिंतेत गुंतल्यामुळे आज मला जी काही मीठभाकर लाभली आहे त्याची गोडीसुद्धा मला चाखता येत नाही. म्हणजेच, दररोज पंचपक्वान्न खाण्याइतपत श्रीमंती मी पुढे मिळवीन, या स्वप्नात गुंतल्यामुळेही आज माझ्याकडे जे काही आहे त्यातली ‘श्रीमंती’ मला अनुभवता येत नाही. तसेच मी श्रीमंत नाही झालो तरी चालेल, पण निदान आज जशी माझी स्थिती आहे तशीच नंतरही टिकेल ना, या चिंतेनेही मला आज जी स्थिती लाभली आहे तिचा निश्िंचत मनानं आनंद घेता येत नाही. तेव्हा प्रत्येक क्षणात माझ्याकडून अनवधानाने जी कृती होते, ज्या प्रतिक्रिया उमटतात त्यांचा ठसा माझ्या वासनात्मक देहावर उमटत असतो. आणखी एका बाजूबाबत आपण पूर्ण अनवधानी असतो कारण ती बाजूच आपल्याला अनभिज्ञ असते. प्रत्येक क्षणी आपली संकल्पशक्तीही आपण अनवधानाने वापरत असतो, ही ती बाजू आहे! माणसाला संकल्प ही मोठीच विलक्षण शक्ती लाभली आहे. माणूस हा परमात्म्याचाच अंश आहे आणि परमात्मा हा सत्यसंकल्पी आहे. म्हणजेच परमात्मा जो जो संकल्प करतो तो सत्य होतो. मग त्या परमात्म्याचाच अंश असलेला माणूस जो संकल्प करील, तो पूर्ण होईलच. फक्त एक फरक आहे. तो असा की, परमात्म्याचा संकल्प हा मुळातच सत्याला धरून असल्याने तो वेगाने पूर्ण होतो. माणसाचा संकल्प त्याच्या वासनात्मक आवेगांनुरूप असल्याने त्यांच्या पूर्तीसाठी योग्य काळ, योग्य परिस्थिती, योग्य पाश्र्वभूमी यांची गरज असते. एक गोष्ट नि:संशय, तो संकल्प पूर्ण होईपर्यंत जीव अनंत योनींमध्ये जन्म घेतच राहातो! आता हा संकल्प म्हणजे काय? ‘अमुक व्हावं,’ ही मनात उमटणारी इच्छा म्हणजे संकल्प आहे. आपल्या मनात उमटणारी प्रत्येक इच्छा ही संकल्परूपच आहे, तिची पूर्ती झाल्याशिवाय राहाणार नाही आणि ती पूर्ण होत नाही तोवर पुन: पुन्हा आपण या खेळात येतच राहाणार, याची जाणीवही आपल्याला नसते. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या लीलासहचर श्रीमाताजी सांगत की, ‘साधा मिठाईचा तुकडा खायची इच्छा शेष राहिली तरी पुन्हा जन्मावं लागतं!’ आपल्या मनात प्रत्येक क्षणात अशा किती अनंत इच्छा जाणता-अजाणता उमटत असतात, त्यांची तर गणतीच नाही.
११९. संकल्पांचं जाळं
उद्याच्या काळजीने आजची भाकरी गोड लागत नाही! येणारा प्रत्येक दिवस हा जणू अज्ञाताच्या प्रांतातून उलगडत असतो. त्या दिवसात माझ्या जीवनात काय घडणार आहे, याची मला किंचितही पूर्वकल्पना नसते. अमुक घडेल, असं मी मानतो, पण ते तसंच घडतंच असं नाही, असा माझा अनुभव असतो. तेव्हा माझ्या मानण्या- न मानण्यानुसार गोष्टी घडत नाहीत.
First published on: 18-06-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan net resolution