श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘जो आपला हात माझ्या हातात देतो त्याचा हात रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहात नाही!’ आता हे हात हातात देणं म्हणजे देहबुद्धीच्या मरणासाठी राजी होणंच आहे. आता याहीपुढे जाऊन महाराज सांगतात, मुलानं आईचा हात धरला तर तो कधीही सोडून पळू शकतो, पण आईनं जर मुलाचा हात हातात घेतला तर त्यानं कितीही उडय़ा मारो, ती त्याला सोडत नाही. तसा तुमचा हात मी हातात घेतला आहे, तो रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहणार नाही! हे सारं ऐकायला, वाचायला फार छान वाटतं. प्रत्यक्षात त्यांनी जर हात हातात धरला तर आपला हात सोडवून घेण्यासाठी तळमळ सुरू होते! त्यांनी आपला हात हाती घेणं म्हणजे आपल्या जगण्याला बोधाची, आज्ञेची चौकट घालून देणं. आपण कसे असतो? आपण देवातही विषयच पाहातो. अर्थात आपला परमार्थही प्रपंचाची गोडी जपतच सुरू असतो. त्यांची आज्ञा त्या गोडीच्या आड येणारीच असते. ते प्रपंच सोडायला सांगत नाहीत पण त्यातली गोडी सोडायला सांगतात. आपली गत अशी असते की प्रपंचही एकवेळ सोडू पण त्याची गोडी मनातून सोडणार नाही. पण देहस्वरूपातच अडकलेल्या मला परमात्मस्वरूपात विलीन करण्याचा त्यांचा निश्चय असतो. मला ज्या परमात्मस्वरूपात विलीन करायचे आहे त्या परमात्मस्वरूपात ते आधीच विलीन असतात. मला ती परमप्राप्ती व्हावी यासाठी माझ्या देहबुद्धीची आत्मबुद्धी व्हावी लागते. ती प्रक्रिया तेच सुरू करतात आणि अनंत अडथळे पार करत ती शेवटालाही तेच नेतात. या प्रक्रियेची सुरुवात असते ती अनुग्रहाने. विधिवत् अनुग्रहाची वा दीक्षेची जी प्रक्रिया आहे तिच्या अखेरीस शिष्य सद्गुरूंना साष्टांग दण्डवत घालतो. त्याचबरोबर सद्गुरुंसमोर एक वाक्यही उच्चारतो की, आजपासून माझे तन, मन, धन सारे तुम्हालाच समर्पित आहे! आपण भारावून तसं म्हणतोही पण प्रत्यक्षात हात हातात घेण्याची, अर्थात माझी देहबुद्धी खरवडण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा तन, मन आणि धन या त्रिभुवनांना पहिला हादरा बसतो! ज्यांच्या हाती मी हात देत आहे आणि ज्या परमात्मस्वरुपाची प्राप्ती ते करून देणार आहेत, ते सद्गुरू आणि तो परमात्मा आहे कसा? त्यांचे वर्णन शब्दांनी शक्य नाही. तरीही गणपती अथर्वशीर्षांतील काही श्लोकांवरून सांगायचं तर- ‘‘र्सव जगदिदं त्वत्तो जायते। र्सव जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। र्सव जगदिदं त्वयि लयमेष्यति। र्सव जगदिदं त्वयि प्रत्येति।।’’ हे सर्व जग तुझ्यातूनच उत्पन्न होते, हे सर्व जग तुझ्याच आधारावर टिकते आणि हे सर्व जग तुझ्यातच विलीन पावते. हे सर्व जग तुझ्यामुळेच प्रत्ययास येते. ‘‘त्वं गुणत्रयातीत:। त्वमवस्थात्रयातीत:। त्वं देहत्रयातीत:। त्वं कालत्रयातीत:। त्वं मूलाधारस्थितोसि नित्यम्। त्वं शक्तित्रयात्मक:।।’’ तो तिन्ही गुणांच्या, तिन्ही अवस्थांच्या, तिन्ही देहांच्या, तिन्ही कालांच्या, तिन्ही शक्तिंच्या पलीकडे आहे. तो मूलाधार आहे. तुकोबा ज्या तिन्ही त्रिभुवनांचा उल्लेख करतात त्याचा आणि या श्लोकांचा संबंध आहे. तसंच तन-मन-धनाच्या समर्पणाशीही त्याचा संबंध आहे!
चैतन्य चिंतन : १७४. मूलाधार
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘जो आपला हात माझ्या हातात देतो त्याचा हात रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहात नाही!
आणखी वाचा
First published on: 04-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan perineum