माणसाने जगताना जगाचा नव्हे तर भगवंताचाच आधार धरावा. त्याच आधाराने पूर्ण समाधान त्याला प्राप्त होईल, असा श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच सत्पुरुषांचा आग्रह आहे. सूक्ष्मपणानं या गोष्टीचा विचार करू. आज आपल्याला जग खरं भासतं आणि भगवंत हा कल्पनेच्या पातळीवर वाटतो. त्यामुळे जगातली परिस्थिती, जगातली आपली माणसं, पैसा, भौतिक संपदा यांचा आधार आपल्याला खरा वाटतो. भगवंत हा कल्पनेच्या पातळीवर असल्यामुळे त्याचा आधार धरायचा म्हणजे काय, हेच मुळात समजत नाही. आता भगवंताचा आधार धरायचा आणि जगाचा आधार सोडायचा, याचा नेमका अर्थ काय? तर हे आधार घेणं आणि त्यागणं, हे दोन्ही पहिल्या पावलावर मानसिक पातळीवरच आहे. भगवंताचा आधार घ्यायचा आहे तो मनानंच आणि जगाचा आधार सोडायचा आहे तो मनानंच. म्हणजेच जग हाच माझा एकमेव आधार आहे, हा समज मनातून त्यागणं म्हणजे जगाचा आधार त्यागणं आहे. भगवंत हाच माझा एकमात्र आधार आहे, हा भाव मनात रुजवून कर्तव्यकर्मे करीत राहाणं, हाच भगवंताचा आधार घेणं आहे. म्हणजेच, आजारी पडलो तर डॉक्टरकडेच जावं लागेल, औषधंच घ्यावी लागतील पण त्यावेळीही ईश्वरी इच्छेवरच सारं काही सोपवून निश्चिंत राहाण्याचा अभ्यास मनाला साधेल. एखादी व्यावहारिक अडचण आली तर आपल्या परिचयातील माहीतगाराचीच मदत घ्यावी लागेल, पण त्यावेळीही या अडचणीतून बाहेर पडण्याचा योग असेल तर तो परमात्म्याच्याच इच्छेवर अवलंबून आहे, मी अडचणीच्या निराकरणासाठी व्यवहारातले सर्व ते प्रयत्न करून मनाचं स्थैर्य घालवता कामा नये, ही जाणीव टिकून राहील. तेव्हा भगवंताचा आधार घेत असताना, त्या आधाराचं भान आणि जाण टिकवत असताना जगाच्या आधारावरची भिस्त कमी होत जाईल. आता या जगात खरंच कोण कुणाला कुठवर आधार देऊ शकतो? आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती असं सारं काही जुळून आलं तरच एकमेकांना आधार देता येतो. हे सर्व काही जुळून येईल की नाही, हे सांगता येत नाही. त्या अज्ञाताचीच भीती मनाला अधिक अस्थिर करते. मग जे होईल की नाही, हे अज्ञात आहे त्याचा भार अज्ञात अशा भगवंतावरच सोपवून आपलं कर्तव्यकर्म अधिकाधिक अचूकतेनं करण्याची प्रेरणा हा दुबळेपणा कसा असेल? उलट तो मनाची स्थिरता टिकवणारा, मनाची उमेद राखणारा आणि परिस्थिती कशीही आली तरी तिला निर्धाराने आणि शांतपणे तोंड देण्यासाठी मनोधैर्य वाढवणाराच उपाय आहे. भगवंताचा आधार पकडला म्हणजे मी कर्तव्यांना सोडचिठ्ठी द्यायची, असाही अर्थ नाही. भगवंताशिवाय जेव्हा कोणतीच जाणीव मनाला उरणार नाही तेव्हा सगळीच र्कम सुटतील, पण आपली ती स्थिती नाही. तेव्हा आपल्याला कर्तव्यर्कम अचूकतेनं करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराजही सांगतात की, ‘‘भगवंताचे होण्यात, वृत्ती आवरण्यात खरे शूरत्व आहे. त्यात गबाळेपणा नाही’’(बोधवचने, क्र. ४२४).

Story img Loader