एका घरातल्या माणसांचेही स्वभाव भिन्न भिन्न असतात. प्रत्येकाच्या मनाची आणि स्वभावाची घडण वेगळी असते, मनावरचे संस्कार वेगळे असतात, स्वप्नं वेगळी असतात, अपेक्षा वेगळ्या असतात, क्षमता वेगळी असते, शारीरिक आणि मानसिक शक्तीत अधिक-उणेपणा असतो. अशी भिन्न स्वभावप्रकृतीची माणसं प्रारब्धयोगानं रक्ताच्या नात्यानं एकाच छताखाली आली असतात. तेव्हा इतक्या भिन्न वृत्तीच्या लोकांमध्ये एकलय असणं कठीणच असतं. आता कुणी म्हणेल, एकाच घरात एकाच पद्धतीचे संस्कार होतात मग मनावरचे संस्कार वेगवेगळे असतात, हे कसं बरोबर आहे? त्याचं थोडं स्पष्टीकरण केलं पाहिजे. संस्कार हे बाहेरून होत नसतात. अवतीभवतीच्या माणसांच्या व्यवहारातून, बोलण्यातून मन जे संस्कार सूक्ष्मपणे ग्रहण करीत असतं तेच अधिक व्यापक आणि खोलवर उमटणारे असतात. स्वभावाच्या जडणघडणीवर याच संस्कारांचा ठसा मोठा असतो. त्यामुळे एकाच घरातल्या दोन्ही भावंडांना एकाच शिस्तीत वाढवले, ठरावीक स्तोत्रे, श्लोक, बाराखडी, परवचे वगैरे करून घेतले, एकाच शाळेत घातले, एकत्रच अभ्यास घेतला म्हणजे दोघांची मने एकाच पद्धतीचे संस्कार ग्रहण करीत असतात, असा नव्हे. तेव्हा आपला प्रपंच असा एक कालाच असतो. तो सुखाचा कसा होईल? श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात- ‘‘ अनेक वस्तू एकत्र आणणे म्हणजे काला करणे. निरनिराळ्या स्वभावाची, गुणदोषांची आणि आवडी-निवडीची अनेक माणसे एकत्र येणे म्हणजे त्याचा काला होणे; पण ज्या काल्यात गोपाळ आला तो खरा गोड झाला. काल्यात गोपाळ आणणे जरूर आहे. आपला प्रपंच सबंध सृष्टीतला एक अंश आहे. सृष्टीमध्ये जे आहे ते आपल्या प्रपंचात आहे. अर्थात जे आपल्या प्रपंचात आहे ते सृष्टीमध्ये दिसू शकेल. मग प्रपंचातल्या काल्यात ज्याने गोपाळ आणला त्याला सृष्टीतला गोपाळ दिसायला वेळ लागणार नाही. गोपाळकाला करताना नाना तऱ्हेचे खेळ खेळतात, धिंगामस्ती करतात. पण हे सगळे करताना गोपाळाला मात्र विसरत नाहीत. तसे प्रपंचात सगळ्या गोष्टी करताना ‘या गोपाळाच्यामुळे आहेत’ ही जाणीव ठेवून वागणे हे गोपाळकाल्याचे खरे बीज आहे. हा गोपाळकाला प्रत्येकाने आपआपल्या घरी करावा. त्याला कशाचीही गरज नाही. तेथे कसलाही भेद नाही. तेथे एकच टिकवून एकाला भजावे लागते. अनेकात एकत्व पाहणे हे गोपाळकाल्याचे शेवटचे ध्येय आहे. सर्वाभूती भगवंत पाहण्याचा अनुभव ज्याला पाहिजे असेल त्याने आधी आपल्या घरात प्रत्येकात तो आहे, ही जाणीव ठेवून वागावे. प्रत्येक कार्यात गोपाळाचा हात आहे ही जाणीव ठेवून वागा, म्हणजे तो काला अतिशय गोड होतो. पण जेथे काला आहे आणि गोपाळ नाही तेथे मात्र भांडण असते. तो गोड होत नाही. ज्याला आपला काला म्हणजेच प्रपंच गोड व्हावासा वाटतो त्याने आपल्या घरात भगवंताला आणावा. आपल्या प्रपंचात गोपाळाचे स्मरण ठेवून राहा, मग तो प्रपंच गोड झाल्याशिवाय राहणार नाही.’’ (चरित्रातील प्रवचने, पृ. ६१४).