आपल्या भ्रामक ‘मी’शी लढाई करायची, म्हणजेच ज्या भ्रामक कल्पनांचा आपल्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर प्रभाव आहे, ज्या भ्रामक अपेक्षांच्या ओझ्यानं आपलं मन, चित्त, बुद्धी झाकोळली आहे त्या भ्रामक कल्पना, भ्रामक अपेक्षांविरुद्ध आपल्याला लढायचं आहे. आपल्या मनात ‘प्रपंच हाच सुख देईल’ ही भ्रामक कल्पना आहे. त्या कल्पनेनुसारच बुद्धी मला मार्ग दाखवते आणि चित्तातही तीच आस आहे. ‘केवळ प्रपंचातच सुख आहे’, अशा या भ्रामक कल्पनेबरोबरच, ‘प्रपंच माझ्या मनाजोगता होईल’, ही भ्रामक अपेक्षाही माझ्या मनात खोलवर रुजली आहे. माझ्या बुद्धीवर, चित्तावर तिचा ठसा आहे. आता तत्त्वज्ञान सगळं बाजूला ठेवून आपलाच प्रपंच डोळ्यासमोर आणून सांगा, प्रपंच निव्वळ सुखाचाच असतो का? तो कधी मनाजोगता होतो का? एका क्षणी तो सुखाचा वाटतो तर क्षणार्धात तो दु:खाचा वाटू लागतो. तो माझ्या मनाजोगता करायचा म्हणजे काय? श्रीमहाराज म्हणतात, ‘प्रपंच हा पाचांचा असतो, त्यात मला एकटय़ालाच सुख कसे मिळेल?’ आता याचे दोन अर्थ आहेत. संसारापासून फारकत घेतलेला साधक दिसायला एकटा दिसला तरी त्याचाही प्रपंच असतोच. तोही पाचांचा असतो. हे पाच म्हणजे पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं. या इंद्रियांची जगाकडे स्वभावत:च ओढ असते आणि तिला भगवंताकडे वळवण्याचं आव्हान या साधकाच्या प्रपंचात असतं. अगदी त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमी साधकाचा प्रपंचही पाचांचा असतो. म्हणजेच पाच ज्ञानेंद्रियं व पाच कर्मेद्रियांनी या प्रपंचाची सूक्ष्म बाजू व्यापलेली असते तर पत्नी, मुले, भावंडे, आई व वडील असे ‘माझे’ पाचजणही त्या प्रपंचात ‘मी’पाठोपाठ असतातच. जगातला प्रत्येकजणच स्वार्थप्रेरित असल्यानं प्रपंचात त्या स्वार्थाचं प्रतिबिंब पडणं अटळ असतं. अर्थात, प्रपंचातल्या प्रत्येकाला त्या स्वार्थापायी सर्व सुख आपल्यालाच मिळावं, असं वाटतं. प्रपंचातल्या इतरांनी आपल्या मनासारखं वागावं, ही इच्छा त्यातूनच येते. प्रपंच आपल्या मनाजोगता व्हावा, ही अपेक्षा मग मन, चित्त, बुद्धीवर पकड घेते आणि सारं जगणं याच अपेक्षेभोवती भिरभिरत राहातं. तेव्हा प्रपंच करीत असतानाच तो निरपेक्ष आणि भ्रामक कल्पनांपासून मुक्त करायचा तर त्यासाठी मोठेच धैर्य लागते. श्रीमहाराजांचं एक वाक्य आपण आधीच पाहिलं आहे, ‘‘प्रपंचात पैशाइतकीच धीराची गरज आहे’’(बोधवचने, क्र. ४०१). धैर्य असेल तर जग आहे तसेच राहूनही त्यात आपल्याला आनंदानं राहाता येईल, असा संतांचा सांगावा आहे. त्या आनंदाच्या प्राप्तीची पायवाट आता आपण जाणून घेऊ. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आनंदाचा शोध संतांनी केला. राम कर्ता मानून स्मरणात राहणे हाच आनंदाचा खरा मार्ग होय. आपली आनंदाकडे स्वाभाविक ओढ आहे. आपण आनंदाला कारणे निर्माण करतो. त्यामुळे मध्ये आडकाठी आपणच आणतो. कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो. ज्या भगवंताजवळ आनंद राहतो त्याचे होऊन राहिले तरच अखंड आनंदी होता येईल’’ (बोधवचने, क्र. २९५).

Story img Loader