जगाला चिकटलेलं मन जगाचं आणि आपल्या सध्याच्या दशेचं खरं दर्शन घेऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीपासून अलिप्त झाल्याशिवाय तिचं खरं रूप पाहताच येत नाही. नाम घेताना मन जसजसं अंतर्मुख होत जाईल, तसतसं जगाला चिकटलेलं मन त्यापासून किंचित सुटू लागेल. आपल्या चित्ताच्या पात्रात अनंत जन्मांचं जगाच्या मोहाचं खरकटं साचलं आहे. नामानंच हळूहळू ते खरवडलं जाईल! जगाचं खरं रूप, आपल्या मनातलं त्याचं भ्रामक रूप आणि त्या भ्रमापायी मोहग्रस्त होऊन आपण जगावर मानसिकदृष्टय़ा कसे अवलंबून आहोत, हे उमगू लागेल. जग सोडून तर कुणालाच राहता येणार नाही, पण या जगात कसं राहायचं, हे ठरवता येईल. जगाची गोडी किंचित कमी होईल आणि भगवंताची ओढ किंचित वाढू लागेल. उपासनेची गोडी वाटो न वाटो, उपासना सातत्यानं, चिकाटीनं, अभ्यासपूर्वक, हट्टपूर्वक, दृढनिश्चयानं केली की ‘नामात भगवंत आहे’ हे जाणता येईल आणि ‘त्याचंच होऊन राहण्याची’ संधीही मिळेल! तो परमात्मा सद्गुरूच्याच रूपात माझ्या जीवनात प्रवेश करील. ‘वाचवा वाचवा’ या हाकेला तोच धावून येईल. संत-सत्पुरुषांच्या रूपानं आलेला खरा सद्गुरू ओळखणं अर्थातच सोपं नाही. ती ओळख आतून पटल्याशिवाय मात्र राहणार नाही. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संत हे चालते-बोलते देव आहेत’’ (चरित्रातील संतविषयक वचने, क्र. ६२). आता देवाला आपण पाहू शकत नाही, पण ज्याचं चित्त भगवत्प्रेमानं अखंड व्याप्त आहे, अशा संताला पाहू शकतो. त्याच्याशी बोलू शकतो. त्याच्या सांगण्यानुसार चालू शकतो. इथे काही जणांच्या मनात मोठा विकल्प येईल. बाहेरच्या जगात आज काय चाललं आहे! संत म्हणून कुणावर विश्वास ठेवण्याची स्थिती नाही, असंही वाटेल. यात आपलीही थोडी चूक आहे. बाह्य़ वेशावरून संताची ओळख आपण स्वीकारतो, त्याचं अंतरंग पाहत नाही. श्रीमहाराजांनी स्पष्ट बजावलं आहे की, संतत्व हे मनाचं लक्षण आहे. मनानं संत न होता बाह्य़वेशानं संत होणं, हे पाप आहे. पण बाह्य़वेशावरून एखाद्याला संतपदापर्यंत पोहोचविण्यात आपलाही हातभार असतो. श्रीमहाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की, ‘संत हा गुप्त पोलिसासारखा असतो. तो आपल्यामध्ये आपल्यासारखाच राहतो, पण आपल्याला तो ओळखता येत नाही!’ पोलिसाचा गणवेश न घालता जसा गुप्त पोलीस वावरतो, तसे खरे संत अवडंबराशिवाय वावरतात. पण गुप्त पोलिसाला ओळखण्याचा एकच गुण म्हणजे त्याची निर्भयता! खरा संत तसा निर्भय, नि:शंक असतो. माणूस कसाही असो, त्याची वृत्ती भौतिकाकडे आहे की भगवंताकडे आहे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. ज्याची ओढ भौतिकाकडे आहे त्याच्या वागण्यात भौतिक गमावलं जाण्याचं भय कधी ना कधी जाणवल्याशिवाय राहणार नाही. भगवंताशिवाय ज्याला कशातच गोडी नाही, त्याला कसलं भय असणार! तेव्हा ज्याची वृत्ती अखंड परमात्ममय आहे, असा सद्गुरूच ‘चालते बोलते देव’ या व्याख्येत अभिप्रेत आहे, हे लक्षात घ्या. तोच माझ्यासाठी आपणहून धावत येतो.