ज्याला हाव अधिक तो गरीब आणि ज्याला आहे त्यात समाधान तो श्रीमंत! हे शुद्ध तत्त्वज्ञान आहे. गरिबी आणि श्रीमंतीची आपली व्याख्या ही पैसा नसण्यावर आणि असण्यावर अवलंबून असते. श्रीमहाराजांसह सर्वच संतांची व्याख्या ही हाव असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आपण गरीब मानतो तर श्रीमहाराज हाव असलेल्याला गरीब मानतात. पैसा असलेल्याला आपण श्रीमंत मानतो तर श्रीमहाराज, ज्याला आहे त्यात समाधान वाटते त्याला श्रीमंत मानतात. ‘आहे त्यात समाधान’ मानण्याच्या वृत्तीपायीच भारताच्या माथी पूर्वापार आर्थिक करंटेपण आणि निष्क्रियता आल्याचा आरोपवजा तर्क काहीजण मांडतात. जणू पिढय़ान्पिढय़ा आपले लाखो लोक ‘आहे त्यात समाधान’ मानण्याचा सल्ला तंतोतंत पाळतच आहेत! वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की आपला जन्मच वासनेत, अर्थात हवेपणात आहे. आपल्या जन्माबरोबरच हवेपणाही आपल्या अंतरंगात जन्मला आहे आणि जसजसे दिवस जात आहेत तसतसा आपला हा हवेपणा, आपली हाव कमी न होता वाढतच आहे. आपल्याला जे हवं आहे ते पैशानंच मिळतं, ही जाणीव जसजशी पक्की झाली तसतसे पैशाचं प्रेम आपल्यात रुजत गेलं आहे. त्यामुळे पैसा मिळवण्याचा प्रयत्न करणे कसे योग्य आहे, हे कोणी कोणाला सांगावे वा शिकवावे लागत नाही. पैशाची ओढ कुणात प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागत नाही. ती उपजतच आहे. तेव्हा आहे त्यात समाधान मानायची शिकवण या देशातच जन्मली असली तरी आणखी हवेच, या वृत्तीचा सार्वत्रिक उपशम झालेला नाही. मग पैशावर श्रीमहाराज किंवा कोणीही सत्पुरुष कठोर टीका करतात त्याचा हेतू काय? ज्याची झोप सावध असते तो नुसत्या हाकेनंही जागा होऊ शकतो, पण जो अगदी गाढ झोपला आहे त्याला जागं करण्यासाठी नुसत्या हाका पुरेशा होत नाहीत. त्याला गदगदा हलवावं लागतं, प्रसंगी तोंडावर पाण्याचा शिडकावासुद्धा मारावा लागतो. तेव्हा ज्यात आमची सर्वाधिक आसक्ती आहे त्यापलीकडेही जीवनाचा काही हेतू आहे, याची जाग आम्हाला आणण्यासाठी श्रीमहाराजांनी त्या आसक्तीचं जे मूळ आहे त्या पैशावरच वार करावा लागतो. त्या वारांनी आम्ही लगेच गाठीचा पैसा सोडून देत नाही पण निदान पैशाच्या हव्यासाबद्दल थोडा विचार तरी करू लागतो! मुख्य म्हणजे ‘आहे त्यात समाधान’ मानण्याचा सल्ला हा निष्क्रियतेची शिकवण देत नाही की निष्क्रियतेचे उदात्तीकरणही बिंबवू इच्छित नाही. उलट तो माझी मानसिक क्षमता वाढविण्याची प्रक्रिया सुरू करतो. मला कितीही मिळत राहिलं पण माझी वृत्ती जे मिळालं त्यात समाधान मानण्याची नसेल तर त्या अतृप्तीचा कधीही अंत होणे शक्य नाही. ‘आहे त्यात समाधान’ म्हणजे मिळविण्याच्या प्रक्रियेला किंवा प्रयत्नांना पूर्णविराम नव्हे. आणखी मिळवण्याचे प्रयत्न होतच राहतील, पण त्या ‘आणखी’मागे अतृप्तीचा वखवख किंवा जोर नसेल. उलट आत्मतृप्तीमुळे होत असलेले प्रयत्नही अधिक निश्चिंत मनाने, स्थिर वृत्तीने म्हणूनच अचूक व विचारपूर्वक होत राहातील.
८७. आहे त्यात समाधान
ज्याला हाव अधिक तो गरीब आणि ज्याला आहे त्यात समाधान तो श्रीमंत! हे शुद्ध तत्त्वज्ञान आहे. गरिबी आणि श्रीमंतीची आपली व्याख्या ही पैसा नसण्यावर आणि असण्यावर अवलंबून असते. श्रीमहाराजांसह सर्वच संतांची व्याख्या ही हाव असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आपण गरीब मानतो तर श्रीमहाराज हाव असलेल्याला गरीब मानतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-05-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan self satisfaction