अवगुणांच्या दर्शनानं मन भांबावलं तरी नाम सोडू नये. नाम हेच औषध आहे. नामच माझी वृत्ती सुधारू शकतं. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे. दुसऱ्या कशासाठी नाम न घेता ते वृत्ती सुधारण्यासाठी घ्यावे.’’ भौतिकाकडे मला प्रवृत्त करणारी वृत्ती सुधारणं माझ्या आवाक्यात नाही. ती वृत्ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्यामुळे तिच्यात सुधारणा घडवून आणणारं सूक्ष्म असं नामच हवं. पू. बाबा बेलसरे यांनी म्हंटलं होतं की, सुरुवातीला ते नामस्मरण करीत असत. पण ज्या नामानं भगवंताचं दर्शन घडतं, ते नाम वेगळंच असलं पाहिजे, असं त्यांना वाटत असे. पुढे त्यांना जाणवलं की नाम तेच राहातं. नाम बदलत नाही, पालट घडतो तो नाम घेणाऱ्यात! नामच अंत:करणात पालट घडवतं. जे मन आधी नामाला विन्मुख होतं, इंद्रियआधीनतेमुळे जे मन अनावर होतं त्याच मनात असा काही पालट घडतो की ते मन नामाला सन्मुख होतं, नाम अनावर होतं! जे मन इंद्रिय आधीन होऊन अनावर होतं तेच मन नामाच्या आधीन होतं! ज्या श्रीतुकाराममहाराजांनी सांगितलं की, ‘‘माझे मज कळों येती अवगुण। काय करूं मन अनावर।।’’ त्याच तुकाराममहाराजांनी नामानं जो पालट घडवला त्याचंही वर्णन केलं आहे. त्यांचा तो प्रसिद्ध अभंग असा- ‘‘विषयीं विसर पडिला नि:शेष। अंगीं ब्रह्मरस ठसावला।।१।। माझी मज झाली अनावर वाचा। छंद या नामाचा घेतलासे।।२।। लाभाचियां सोसें पुढें चाले मन। धनाचा कृपण लोभी जैसा।।३।। तुका म्हणे गंगा सागरसंगमीं। अवघ्या झाल्या उर्मि एकमय।।४।।’’ माझे अवगुण मला उमगतात, पण काय करू, मन अनावर आहे, अशी ज्या साधकाची स्थिती होती त्याच्यात नामानं काय पालट घडला, हे तुकाराममहाराजांनी आपलं निमित्त करून सांगितलं आहे. जे मन इंद्रियाधीन होऊन विकारांसाठी अनावर होतं तेच मन नामाधीन होऊन नामासाठी अनावर झालं! हे कशामुळे झालं? तर विषयांचा पूर्ण विसर पडला! म्हणजे विषयांचा नाश झाला नाही, विसर पडला! विषयांच्या नुसत्या स्मरणातदेखील इतकी ताकद आहे की ते खेचूनच नेतात. त्या विषयांचा सहजविसर पडला. त्यामुळे ब्रह्मरस म्हणजे सद्गुरूमयतेनं अंत:करण ओतप्रोत भरून गेलं. एखादा लोभी जसा पै-पै जोडतो आणि अगदी प्राणाइतकी सांभाळतो तसा त्या सद्गुरूंचा पूर्ण लाभ व्हावा, यासाठी हे मन प्रत्येक क्षण नामासाठी जोडतो आणि प्रत्येक क्षणात ते नाम सांभाळतो. समुद्रात विलीन होईपर्यंत गंगा वेगळी दिसते. एकदा सागरसंगम झाला की गंगा त्याच्यात एकरूप होते. त्याचप्रमाणे त्या सद्गुरूंमध्ये विलीन झाल्यावर माझ्या अंत:करणातल्या समस्त ऊर्मी या त्या एकाच सद्गुरूंमध्ये सामावल्या. तर निष्ठेने, सातत्याने, दृढपणे उपासना करणाऱ्यात होणारा हा पालट आहे. मग याची सुरुवात कुठे करावी? आपली प्रपंचाची आजची घडी मोडून काही उपासना करायला श्रीमहाराज सांगत नाहीत. आपल्या साधनेवर आपल्या व्यवहाराचा फार मोठा प्रभाव असतो आणि तो पुसणं हे आपल्या आवाक्यात नसतं म्हणून श्रीमहाराज सोपा मार्ग सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा