मायाबद्ध प्रपंचात राहूनच साधनेच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकायचं आहे. आता या साधनेने ज्या भगवंताची आस लागायला हवी, त्या भगवंताबद्दल आणि आपल्याबद्दलही काही प्रश्न मनात उमटतात. कारण किती झाले तरी बुद्धीचा उंदीर कुरतडायचे थांबवत नाही! ज्या भगवंताचं नाम मी घेत आहे त्याचं मला खरंच दर्शन होईल का, माझ्या क्षुद्र जीवनातल्या सुख-दु:खाशी त्याला काही देणंघेणं आहे का, असे प्रश्न या पहिल्या पावलासोबतच येतात. मग भगवंत नेमका आहे कुठे आणि कसा, या प्रश्नावर साधुसंत सांगतात की, तो चराचरात भरून आहे. हे सर्व जग त्याचीच लीला आहे. मग, जो सर्वत्र आहे तो दिसत का नाही? एवढं अवाढव्य जग सूक्ष्म अशा एका भगवंतानंच कसं निर्माण केलं आणि त्या एकाच सूक्ष्माच्या आधारावर ते कसं तग धरून आहे; असे प्रश्नही मनात उमटतात. श्रीगोंदवलेकर महाराज फार खुबीनं सांगतात, ‘सत्य वस्तूला उपाधि फार असते पण मुख्य सत्य अगदी थोडे आणि हलके असते..’ भगवंत हा सत्य आहे आणि हे जग ही त्याची निर्मिती आहे. त्याची उपाधी आहे. उपाधी म्हणजे काय? उपाधीचा एक अर्थ आहे मानाचं पद. उपाधी म्हणजे व्यक्तीला चिकटलेले गौरवपूर्ण विशेषण वा मानाचे पद. त्या उपाधीतून त्या व्यक्तीचा लौकिक दिसतो. त्याचप्रमाणे अलौकिक भगवंताचं लौकिक रूप म्हणजे हे जग आहे. महाराज म्हणूनच सांगतात, ‘सत्य वस्तूला उपाधि फार असते पण मुख्य सत्य अगदी थोडे आणि हलके असते. आपले शरीर एवढे मोठे असते, पण आपला जीव किती लहान असतो! त्याचप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे. हे एवढे मोठे जग ही त्याची उपाधि आहे.’ (चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. ४३). आपलं शरीर मोठं असतं पण जीव लहान असतो! जो आहे म्हणूनच केवळ आपण आहोत तो ‘जीव’ दिसत नाही, नेमका शरीराच्या कोणत्या भागांत आहे, हे सांगता येत नाही, पण हे शरीर दिसतं. त्याचे अवयव दिसतात. रंगरूप दिसतं. अगदी त्याचप्रमाणे भगवंत आहे म्हणून जग आहे. हा सूक्ष्म भगवंत दिसत मात्र नाही. त्याच्या आधारावर असलेलं हे विराट दृश्य जग मात्र दिसतं. त्या न दिसणाऱ्या भगवंतालाही काहीजण मानत असतात. पण तो आहेच, या भावनेनं वागत मात्र नसतात! महाराजही सांगतात की, ‘देव आहे’ असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये फार थोडे! (चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. ९). याचाच अर्थ देव आहे म्हणजे काय, हे समजून घ्यावे आणि त्यानुसार जगावे, हीच श्रीमहाराजांची इच्छा आहे. विश्वास असो अथवा नसो, भगवंताच्याच भक्तीला लागा, असं महाराज सांगत नाहीत. तर विश्वास निर्माण कसा होईल, याचाही मार्ग दाखवतात. भगवंताचा साक्षात्कार हा याच जन्मी झाला पाहिजे, असा महाराजांचा आग्रह आहे. म्हणूनच ते म्हणतात, ‘आपण जिवंतपणी भगवंताचा अनुभव घेतला तर तो खरा!’
(चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. ७९).
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा