देहबुद्धीचं मरण म्हणजे अहंकाराचा लय साधायचा तर माझा हात, अर्थात माझी कर्तेपणाची भावना, कर्तेपणाचा ताठा, कर्तेपणाचा गर्व हा सद्गुरूंच्या हाती सोपवला पाहिजे. ज्या परमात्म्यात सद्गुरू सदोदित रममाण आहेत तो परमात्मा आणि अर्थात ते सद्गुरूही कसे आहेत? त्यांच्या त्या स्थितीची झलक आपण अथर्वशीर्षांच्या काही श्लोकांतून पाहात आहोत. हा सद्गुरू तिन्ही गुणांच्या, तिन्ही अवस्थांच्या, तिन्ही देहांच्या, तिन्ही कालांच्या, तिन्ही शक्तींच्या पलीकडे आहे. तो मूलाधार आहे. या सद्गुरूंना मी तन, मन, धन सर्वस्वानं अर्पण करणं म्हणजेच माझा हात त्यांच्या हाती देणं आहे. तुकोबा ज्या त्रिभुवनांचा उल्लेख करतात त्यांचा माग या तन, मन, धनातूनच घेता येतो. ज्या सद्गुरूंना सारी कर्तृत्वशक्ती समर्पित करायची आहे, त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? सद्गुरू गुणातीत आहेत. आपण सत्, रज आणि तम या तीन गुणांच्या प्रभावाखाली आहोत. सद्गुरू देहातीत आहेत. आपण स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह या देहात बद्ध आहोत. सद्गुरू अवस्थातीत आहेत. आपण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये बद्ध आहोत. सद्गुरू कालातीत आहेत. आपण भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ या तीन कालांमध्ये बद्ध आहोत. सद्गुरू तिन्ही शक्तींच्या पलीकडे आहेत. आपल्या तिन्ही शक्तींना मर्यादा आहेत. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक या त्या तीन शक्ती. आता तुकोबा जो ‘तिन्ही त्रिभुवने’ असा उल्लेख करतात, त्याचा संबंध तन, मन आणि धनाशीच असला पाहिजे. आपलं समस्त जीवन या त्रयीमध्येच आहे. या तिघांच्याही तीन अवस्था आहेत आणि म्हणूनच तिन्ही त्रिभुवने, म्हटलं असावं. तन म्हणजे देह. देहाच्या तीन अवस्था- स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. मनाच्याही तीन अवस्था- जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. धन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे तीन प्रकार कोणते, हे आपण नंतर पाहू. आता प्रथम देहाचा विचार करू. स्थूल देहाची आपल्याला जाणीव आहे. इतकेच नाही जन्मापासून आपले आपल्या देहाशी क्षणोक्षणीचे सख्य आहे, मैत्र आहे. क्षणोक्षणी आपल्याला आपल्या या देहाची जाणीव आहे. तेव्हा हा स्थूल देह, आपला आकार हेच आपण आहोत, आपलं खरं स्वरूप आहे, असं आपण पक्केपणाने मानतो. काही तत्त्वज्ञ स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहांचा क्रम उलटा सांगतात. म्हणजे विशिष्ट देहाच्या आकारात जीव जन्माला येतो त्यामागे जे कारण असतं, त्याला कारण देह म्हणतात. त्यानंतर स्थूल देहात जीव प्रकटतो. पण त्याच्या वासनापुंजाचा म्हणून एक देह तयार होत असतो तोच सूक्ष्म देह. माणसाच्या इच्छा, वासना जशा असतील त्यानुसार या सूक्ष्म देहाची जडणघडण होत असते. त्या वासनांनुरूप संस्कार या सूक्ष्म देहावर होत असतात. मृत्यूनंतर माणसाचा स्थूल देह सुटतो, त्याला अंतरतो. त्यानंतर पुढील जन्म होईपर्यंत सूक्ष्म देहात तो वावरतो, असं तत्त्वज्ञान मानतं. हाच सूक्ष्मदेह स्वर्गसुख किंवा नरकयातना भोगतो. तर आपला देह असा देहाच्या या तीन अवस्थांत बद्ध आहे.
१७५. तन-भुवन
देहबुद्धीचं मरण म्हणजे अहंकाराचा लय साधायचा तर माझा हात, अर्थात माझी कर्तेपणाची भावना, कर्तेपणाचा ताठा, कर्तेपणाचा गर्व हा सद्गुरूंच्या हाती सोपवला पाहिजे.
First published on: 05-09-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan three phase of bodies