प्रपंचात मिळवायचं आहे, ‘मी पुष्कळांचा आहे’, याची हमी मिळवायची आहे. पुष्कळांचा आधार असला की असुरक्षिततेची भीती पुष्कळच कमी होईल, अशीही आपली समजूत आहे. त्या पुष्कळांकडून पुष्कळ सुख कायम मिळवायची आस आहे. या प्रपंचात किती मिळालं म्हणजे पुरे, हे ठरलेलं नाही त्यामुळे कितीही मिळालं तरी आपल्याला पुरेसं वाटत नाही. त्यामुळे जे काही आपण मिळवत राहतो त्याची पूर्ती कधीच होत नाही. त्यामुळे हा प्रपंच कठीण आहे. मग इतका कठीण प्रपंचही आपण न कंटाळता, न थकता, न थांबता, उमेद न गमावता अविरत करीत असू तर इतका कठीण प्रपंच करणाऱ्याला परमार्थ का साधू नये? प्रपंचात मिळवायचं आहे तर परमार्थात गमवायचंच तर आहे! श्रीमहाराजही सांगतात, परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचं आहे. काय गमवायचं आहे? तर ‘मी कोणाचाच नाही’ हे! आता ‘मी कुणाचाच नाही’, याचा अर्थ काय? ‘मी कोणाचाच नाही’ याचा अर्थ मी केवळ त्या एका परमात्म्याचा आहे! प्रपंचात मी पुष्कळांचा असल्याचं मानतो आणि तसं व्हावं म्हणून धडपडतो. त्यासाठी अनेकांच्या कलानं मला जगावं लागतं. परमार्थात जर मी एकाचाच असेन तर मला एकाच्याच कलानं तर जगावं लागेल! मग अनेकांचा होऊन अनेकांना सांभाळण्याची धडपड करण्यापेक्षा एकाचा होऊन एकाला सांभाळणं सोपंच असेल ना? आता हे मिळवणं आणि गमावणं आहे काय? ते मानसिकच आहे. पहिल्या टप्प्यावर मिळवण्याची गरज आणि गमावण्याची भीती कोणाला वाटते? ती मलाच तर वाटते. प्रत्यक्षात मी जे काही मिळवतो त्यातून मनाची निश्चिंती, समाधान, शांती, स्थैर्य मी गमावतो का, याचा विचारही मी करीत नाही. माझ्याच कल्पनेचा गुंता मी जेव्हा तोडू शकतो त्या वेळी मी जे काही गमावतो त्यामुळे मी निश्चिंती, समाधान, शांती, स्थैर्य मिळवतो का, याचाही विचार मी अंतर्मुख होऊन करीत नाही. मोह आणि भ्रमामुळे जे गमवायला पाहिजे, जे सोडायला पाहिजे, जे त्यागायला पाहिजे, ते सुटत नाही. मोह आणि भ्रमामुळे मी जे खरं मिळवलं पाहिजे, ते मिळवायलाही मला साधत नाही. त्यामुळे हे मिळवणं आणि गमावणं ज्याला लागू आहे, त्या ‘मी’कडेच वळल्याशिवाय, या ‘मी’ला वळण लावल्याशिवाय काही साधणार नाही. श्रीमहाराजही सांगतात, ‘‘परमार्थाला अगदी स्वतपासून सुरुवात करायची असते’’ (चरित्रातील परमार्थविषयक बोधवचने, क्र. ५३) तेव्हा हा ‘मी’ प्रपंचात कसा वागतो, कसा वावरतो हे मी लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली तरी जगण्यातला बराच गोंधळ, बरीच अव्यवस्था दूर करता येईल. श्रीनिसर्गदत्त महाराज सांगत, आज आपण अनवधानानं जगत आहोत तेच अवधानानं जगू तर कितीतरी समस्यांतून मुक्त होऊ! आज आपण अनवधानानं जगत आहोत आणि त्यामुळेच श्रीरामदासांच्या शब्दांत सांगायचं तर प्रपंची ‘अप्रमाण’ आहोत. ती प्रमाणबद्धता अवधानानंच येईल. तेव्हा गमवायचं आहे ते अनवधान! श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच!’’ (परमार्थविषयक बोधवचने, क्र. ७२)
७४. गमावणे
प्रपंचात मिळवायचं आहे, ‘मी पुष्कळांचा आहे’, याची हमी मिळवायची आहे. पुष्कळांचा आधार असला की असुरक्षिततेची भीती पुष्कळच कमी होईल, अशीही आपली समजूत आहे. त्या पुष्कळांकडून पुष्कळ सुख कायम मिळवायची आस आहे. या प्रपंचात किती मिळालं म्हणजे पुरे, हे ठरलेलं नाही त्यामुळे कितीही मिळालं तरी आपल्याला पुरेसं वाटत नाही.
First published on: 16-04-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan to lose