काळजी कायमची सुटायची तर भगवंताचं स्मरण पाहिजे. ज्या गोष्टीची प्राप्ती होते वा जी गोष्ट अनुभवाचा विषय होते, तिचंच स्मरण राहू शकते. त्यामुळे भगवंताचं स्मरण हवं तर त्याची प्राप्ती, त्याचा अनुभव पाहिजे. तो अनुभव पाहिजे तर अज्ञानी जिवाला परमार्थाच्या मार्गाचं ज्ञान करून देणारा मार्गदर्शक सद्गुरू पाहिजे. इथवर आपण आलो आहोत. आता या टप्प्यावर एक प्रश्न असा उत्पन्न होतो की, सद्गुरूची काय गरज आहे? सद्गुरूशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही का? ‘पूर्ण-अपूर्ण’ या गुरूगीतेवर आधारित सदरात आपण या विषयाचा उहापोह केला आहेच पण इथे त्याचा अगदी संक्षेपात विचार करू. पहिली गोष्ट अशी की, आज जगभर बोकाळलेल्या बुवाबाजीला विटूनदेखील लोकांना ‘गुरू’ आणि या मार्गाबद्दल तिटकारा उत्पन्न होणे स्वाभाविकच आहे. पण एक लक्षात घ्या, सर्व तऱ्हेचे ज्ञान देणारी पुस्तकं उपलब्ध असतानाही आपण मुलाला शाळेत घालतोच. शिक्षकाची गरजच काय? पुस्तकं वाचून शिकेल मुलगा, होईल डॉक्टर वा अभियंता; असं आपण मानत नाही. साध्या विद्या शिकायला जर गुरुची गरज लागते तर आत्मविद्येसारखी श्रेष्ठ व सर्वोच्च विद्या अवगत करण्यासाठी गुरु नको? आता शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचार आहे म्हणून कोणी शिक्षणच बंद करा, असं म्हणत नाही. त्याचप्रमाणे ढोंगी बुवाबाजीमुळे शुद्ध परमार्थाची जी वाट आहे, ती बंद करता येणार नाही. तर ‘मार्गदर्शक’ हवाच. त्यासाठीच आपणही श्रीमहाराजांचे बोधस्वरूपातले दर्शन घेत आहोत. मग भगवंताची प्राप्ती  कशी होईल, याबद्दल श्रीमहाराज काय सांगतात? श्रीमहाराज सांगतात, ‘‘सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही!’’ तुम्हाला भगवंताची ओळख करून घ्यायची आहे ना? मग आधी सत्याची ओळख करून घ्या! याच अनुषंगाने श्रीमहाराजांचे आणखी एक मार्मीक वाक्य आहे- ‘‘भगवंत प्राप्त करून घ्यायला काही नवीन मिळवायचे असे नाही, फक्त आहे ते घालवायचे आहे!’’ (चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. २२). आता असं पाहा, सत्य हे कायमच असतं, असं आपण म्हणतो याचाच अर्थ जगण्यातलं असत्य दूर झालं तर सत्य त्या जागी आहेच की! असत्य संपवायचं आणि मग सत्य मिळवायचं, असं काही नाही. ते वेगळं प्राप्त करून घ्यायचं नाहीच. ते आहेच. मग घालवायचं काय? तर जगण्यातलं असत्य. तेव्हा ‘सत्या’ची ओळख करून घेण्याचा मार्ग हा असत्य ओळखण्याचाच आहे. असत्य ओळखलं की सत्याची ओळख, सत्याचं दर्शन आहेच. मग माझ्या जगण्यात ‘असत्य’ काय आहे? साधुसंत सांगतात, आपला प्रपंचच मिथ्या आहे. प्रपंच खोटा आहे? आपल्याला ते पटत नाही. पण हा प्रपंच कोणत्या अर्थाने खोटा आहे? श्रीमहाराज सांगतात की, ‘‘द्वैताचा प्रपंच खोटा म्हटला तर आपल्याला समजतच नाही. पण तो निदान आहे तसा तरी मानावा. तो जसा प्रत्यक्ष आहे तसे त्याचे स्वरूप ओळखावे..’’ प्रपंच मिथ्या वाटत नाही ना? न वाटू दे पण तो नेमका आहे तरी कसा, हे तरी जाणून घ्या, असं श्रीमहाराज सुचवत आहेत.