मी वाईट आहे म्हणून जग मला वाईट दिसत आहे, हे आपल्याला पटत नाहीच. जग वाईट आहे म्हणून ते तसं दिसतं, असं आपल्याला ठामपणे वाटतं. मी सुधारलो तर जगही सुधारेल, हेसुद्धा मला भ्रामक वाटतं. उलट मी सुधारलो पण जग वाईटच राहिलं तर? अशी भीती मला वाटते. बरं, थोडं आणखी खोलवर जाऊ. जगात वाईट गोष्टी आहेत तशाच चांगल्या गोष्टीही आहेत. माणूस जसा विध्वंसक आहे तसाच तो सर्जकही आहे. अश्मयुगापासून त्यानं जशी शस्त्रं निर्माण केली तसंच त्यानं भावनांच्या अभिव्यक्तीसाठी आणि पोषणासाठी कित्येक भाषाही विकसित केल्या. प्रथम हावभाव, मग चित्रबद्ध लिपी, मग बोलीभाषा आणि अखेरीस लिपीबद्ध भाषा; असा प्रवास करीत करीत त्यानं अनंत पिढय़ांचं भावनिक, मानसिक, वैचारिक पोषण करणारी ग्रंथरचनादेखील केली. त्यानं चौसष्ट कलांना जन्म दिला. किती तरी वाद्यं त्यानं निर्माण केली. स्वरांचे विश्व साकारले. उत्तुंग शिल्पं घडविली. भौतिक आणि मानसिक जगणं समृद्ध व्हावं यासाठी सौंदर्यपूर्ण संस्कृतीही घडविली. पण जगाचं हे चांगुलपण त्याच्या वाईटपणापुढे हतबल ठरतं, निष्प्रभ ठरतं. नैसर्गिक आपत्तीमुळे कितीही दुखभोग वाटय़ाला आले तरी माणूस त्यांना स्वीकारून जिद्दीने उभा राहातो. पूर, दुष्काळ, भूकंप यांचा स्वीकार तो अटळ मानतो. पण युद्ध, घातपात, स्फोट या मानवनिर्मित आपत्तींचा स्वीकार तो करू शकत नाही. जगात दुख आहे आणि जग वाईट आहे, असं तो म्हणतो तेव्हा ही मानवनिर्मित दुखे आणि वाईटपणाच त्याला अभिप्रेत असतो. मग जग सुधारावं, जगातला वाईटपणा संपावा, जगात आनंद असावा, सलोखा असावा; असं मला वाटतं त्याचा अगदी खरा हेतू काय असतो? तो हेतू शुद्ध स्वार्थकेंद्रितच असतो. माझी स्थिती चांगली राहून जगाची स्थिती वाईट झाली, तरी मला काही वाटणार नाही. पण मी माझ्या जगापासून अभिन्न असतो. त्यामुळे जगातला बिघाड, जगातलं दुखं, जगातलं वैर, जगातला वाईटपणा, जगातला तणाव माझ्या जगण्यावर आघात करत असतो. त्यातही लाखो किलोमीटर दूर अंतरावर भीषण आपत्ती कोसळली किंवा घातपातासारखी मानवनिर्मित आपत्ती कोसळली आणि त्यात शेकडो माणसं दगावली तरी मी शाब्दिक हळहळीपलीकडे काही करीत नाही. माझ्या शेजारच्या गावात स्फोट झाले तर मात्र मी खडबडून जागा होतो. अस्वस्थ होतो. जगातला दहशतवाद संपला पाहिजे, असं तावातावानं बोलू लागतो. कारण त्या स्फोटाची पुनरावृत्ती माझ्या आसपास होऊन माझ्या उंबरठय़ाआतल्या जगात उलथापालथ होऊ शकते, ही भीती मला भेडसावत असते. जगात दुख नसावं, असं मला वाटतं कारण ते दुख आपल्या वाटय़ालाही येईल, अशी धास्ती मला असते. माझ्या आनंदासाठी मला जगात आनंद हवा आहे, माझ्या सुरक्षिततेसाठी मला जग सुरक्षित हवं आहे, माझं जगणं तणावमुक्त असावं म्हणून मला जगातला तणाव संपावा, असं वाटत आहे. माझं जीवन कितीही दुखानं भरलं तरी चालेल पण त्याबदल्यात जग आनंदी असू द्या, असं कल्पनेतसुद्धा मी म्हणू शकणार नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा