रशियन अर्थव्यवस्थेवर ताबा ठेवणारे अब्जाधीश बराच पैसा पश्चिम युरोपमध्ये राखून आहेत. तो रशियात येत असतो व व्यापाराच्या माध्यमातून बाहेरही जात असतो. पण २०१२ मध्ये या पैशाची जावक ही आवकीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यामुळे पुतीन यांचा त्यांच्यावर रोष आहे. या अब्जाधीश वर्गाशी सामना करून त्यांच्यावर हुकमत मिळवण्यात पुतीन यांना अद्याप यश आले नाही..
रशियामध्ये अब्जाधीश उद्योजकांचा एक नवीन वर्ग उदयास येऊ पाहात आहे. देशांतर्गत उद्योगव्यवसाय, प्रचंड उत्पादनक्षमता, अवाढव्य संपत्तीची निर्मिती आणि रोजगाराच्या संधी यांच्या जोरावर हा वर्ग राजकीय परिस्थिती व राज्यशासन यांच्यावर आपला वाढता प्रभाव टाकण्यात यशस्वी होत आहे. देशातील आर्थिक परिस्थिती व धोरणे यांच्यावर नियंत्रण मिळवून आपापल्या उद्योगसमूहांना पोषक असे धोरणात्मक निर्णय सरकारकडून मंजूर करून घेणे हा या वर्गाचा मुख्य उद्देश आहे. अशा वर्गातील लोकांना ‘अल्पलोकसत्ताकवादी’ (Oligarchs) असे संबोधले जाते, असे वर्ग प्रत्येक देशात कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात.
रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष ‘व्लादिमीर पुतीन’ यांना याची पूर्ण जाणीव आहे. किंबहुना त्यांच्यासमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे. ते स्वीकारून ते या प्रभावी समूहावर कशी मात करू शकेल हाच प्रश्न आहे. स्वत: एक कुस्तीपटू असल्यामुळे पुतीन या परिस्थितीला तोंड देण्यास पूर्णपणे समर्थ आहते. ज्यांनी त्यांच्याशी संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला त्यांना कौशल्याने हाताळून मार्गातून दूर करण्यात त्यांचे कणखर नेतृत्व कामी आले आहे. एकेकाळी पुतीन यांना ‘केजीबी’ या गुप्तचर संस्थेतून बाहेर काढून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ‘बोरीस बेरेझॉव्हस्की’ याने मार्च २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये आत्महत्या केली. तो पुतीनचा ‘किंगमेकर’ असला तरी काही राष्ट्रीय धोरणांत त्याने पुतीनला तीव्र विरोध दर्शवला. पण पुतीन यांनी त्याला खडय़ासारखे बाजूला काढून त्याच्या पदरी निराशाच टाकली. यामुळे शेवटी त्याने देश सोडून लंडनमध्ये आश्रय घेतला. त्याचप्रमाणे ‘प्रसारमाध्यमातील प्रबळ व्यक्ती’ म्हणून ओळख असलेला आणखी एक ‘Oligarch’ व्लादिमीर गुसिन्स्की यालाही पुतीन यांच्या विरोधात गेल्यामुळे देश सोडावा लागला. मिखाइल खोडोर्कोव्हस्की हा पुतीनच्या मार्गातील आणखी एक अडथळा होता. त्याला २००५ मध्ये पुतीनच्या विरोधात अध्यक्षीय निवडणूक लढवायची होती. कर चुकविण्याच्या आणि पैशाच्या अफरातफरीच्या आरोपाखाली तो आता नऊ वर्षे तुरुंगवास भोगत आहे. एवढेच नव्हे तर त्याची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
पुतीन यांचे डावपेच
एकंदरीत या उच्चभ्रू अब्जाधीशांच्या कारवाईचे वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याचा अचूक अंदाज पुतीन यांना आला आहे. हे त्यांच्या काही धोरणात्मक निर्णयावरून लक्षात येते.
खोडोर्कोव्हस्कीचा पूर्ण बंदोबस्त – सध्या तुरुंगात असलेल्या या अब्जाधीशावर आणखी काही आरोपांखाली त्याचा कारावास काही वर्षे लांबवण्याचा बेत आहे. रशियातील पैशाची गुंतवणूक बाहेर देशातील व्यवसायात करणे व मानवी हक्क संस्थांना मदत करणे हे त्याच्यावर आणखी आरोप करण्यात येत आहेत. म्हणजे त्याचा काटा काढण्याचा घाट घातला जात आहे.
मर्जीतील बिगरसरकारी संस्था – यातील विरोधाभास म्हणजे काही अब्जाधीशांशी मैत्री प्रस्थापित करण्याचे धोरण. जे उद्योजक पुतीन यांच्या धोरणांना व सरकारला पाठिंबा देतील त्यांच्या मदतीसाठी पुतीन सरकारने ७५ दशलक्ष डॉलरची तरतूद केली आहे. हे टीकाकारांच्या लक्षात आल्यामुळे खोडोर्कोव्हस्कीच्या शिक्षेत आणखी चार-पाच वर्षांची वाढ होईल असा त्यांचाही अंदाज आहे.
विरोधाभासी धोरण – पण जे भांडवलदार पुतीन यांच्या धोरणांना पाठिंबा देऊन त्यांच्या सरकारशी इमान राखून आहेत, त्यांच्याशी पुतीन यांनी तडजोडीचे धोरण स्वीकारले आहे. ‘अॅलेक्सी मिलर’, ‘ओलेग देरीपास्का’, ‘व्लादिमीर पोटॅनिन’, ‘अॅब्रामोव्हीच’ यांचा या गटात समावेश आहे. येल्त्सीनच्या कारकीर्दीत त्यांनी स्वत:ची आर्थिक भरभराट करून हे खरे असले तरी, पुतीन यांनाही भरघोस मदतीचा हात पुढे करून सरकारबरोबर हितसंबंध सांभाळण्याचे काम ते करीत असतात. मिलर हा ‘गॅझप्रॉम’ या नैसर्गिक वायू कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यांच्याकडे जगाच्या २०-२५ टक्के इतका वायूसाठा आहे. सरकारची यात मोठी गुंतवणूक आहे. यामुळे सरकारचे जागतिक राजकीय हित आणि मिलरचे जागतिक आर्थिक हित हे एकमेकाला पूरक असल्यामुळे पुतीन-मिलर एकमेकांना धरून आहेत. युरोप व इतर पश्चिम देशांना हा वायू निर्यात होत असल्यामुळे रशियाला आवश्यक असलेले ‘पेट्रो-डॉलर्स’चे चलन मिळत राहते. रशियन सरकारच्या फायद्याबरोबरच पुतीन व मेद्वदेव हे दोघेही लक्षाधीश होण्याच्या वाटेवर आहेत.
त्याचबरोबर इतर भांडवलशाही देशांप्रमाणेच या अब्जाधीशांमध्ये आपसात स्पर्धा चालू असते. डेरीपास्का व पोटॅनिन या दोघांच्यात ‘नोरीस्क निकेल कंपनी’चा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर स्पर्धा चालू आहे. या कंपनीकडे ‘निकेल’ धातूचा प्रचंड साठा आहे. अॅब्रामोव्हीच हाही या स्पर्धेत मागे नाही. या सर्वाचा दावा हा आहे की, त्यांनी आपले आर्थिक भांडवल रशियातच राखून ठेवले आहे. पण प्रसारमाध्यमांना माहीत आहे की, प्रत्येकाच्या पश्चिम युरोपमध्ये मालमत्ता अस्तित्वात आहेत. अॅब्रोमोव्हीचने तर इंग्लंडच्या ‘चेल्सी फुटबॉल क्लब’मध्येही मोठी गुंतवणूक केली आहे.
रशियन अर्थव्यवस्थेवर ताबा ठेवणारे हे अब्जाधीश बराच पैसा पश्चिम युरोपमध्ये राखून आहेत. तो रशियात येत असतो व व्यापाराच्या माध्यमातून बाहेरही जात असतो. पण २०१२ मध्ये या पैशाची जावक ही आवकीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यामुळे, पुतीन यांचा त्यांच्यावरील रोष समजण्यासारखा आहे. कारण रशियात विकास व आधुनिकीकरणासाठी त्यांची धडपड चालू आहे. पण त्याला अजून पाहिजे तसे यश मिळाले नाही, पण या अब्जाधीश वर्गाशी सामना करून त्यांच्यावर हुकमत मिळवण्यात पुतीन यांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे पुतीन अखेर या भांडवलदारांवर विजय मिळवणार का? हा मोठा प्रश्न आहे.
* लेखक हे मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज’चे माजी संचालक असून रशियाविषयक घडामोडींचे जाणकार आहेत.
अनुवाद : जगन्नाथ टिळक
पुतीन यांच्यापुढील आव्हाने
रशियन अर्थव्यवस्थेवर ताबा ठेवणारे अब्जाधीश बराच पैसा पश्चिम युरोपमध्ये राखून आहेत. तो रशियात येत असतो व व्यापाराच्या माध्यमातून बाहेरही जात असतो. पण २०१२ मध्ये या पैशाची जावक ही आवकीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यामुळे पुतीन यांचा त्यांच्यावर रोष आहे. या अब्जाधीश वर्गाशी सामना करून त्यांच्यावर हुकमत मिळवण्यात पुतीन यांना अद्याप यश आले नाही..
First published on: 02-05-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challanges in front of putin