भाजप हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा- पार्टी विथ डिफरन्स- आहे, असे पक्षाच्या सर्वोच्च नेत्यापासून तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण कंठरवाने जगाला सांगत असतो. संघाच्या मुशीत घडलेले नेते हा पक्ष चालवितात, असा कार्यकर्त्यांचा समज असतो. पक्षाने देशाची सत्ता काबीज केली, आणि नंतर अनेक राज्यांवरही पक्षाचे झेंडे फडकले. त्यानंतर मात्र, पक्षाची भावना काहीही असली, तरी सत्तेचा सहवास लाभलेल्या या पक्षाचे वेगळेपण हळूहळू लोप पावत चालल्याची जनतेची भावना होऊ लागली. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणविणाऱ्या या पक्षात, ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ असे चित्र दिसू लागले. महाराष्ट्रात भाजपमधील मतभेद लपून राहिलेले नाहीत. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते सणावाराला ‘नमस्ते सदा’ म्हणत मतभेद असतानाही भगव्यासमोर एकाच आज्ञेनुसार नतमस्तक होतात, म्हणून महाराष्ट्रातही भाजप हा कधीकधी ‘पार्टी विथ डिफरन्स’ ठरतो. महाराष्ट्राच्या प्रदेश शाखेला मातब्बर नेत्यांची सावली लाभली आहे. गोपीनाथ मुंडे हे पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या फळीत जाऊन बसले, तर नितीन गडकरी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले. या ‘वजनदारपणा’मुळे पक्षात त्यांचे त्यांचे समर्थक असणे आणि त्यामुळे परस्परांवर राजकीय कुरघोडीसाठी संधीची वाट पाहणे या बाबी साहजिकपणे आल्या. आपले आपले राजकीय अनुभव पणाला लावून राजकीय बुद्धिबळाच्या आखाडय़ात समर्थकांसह उतरलेल्या या दोन नेत्यांमध्ये गेले काही महिने जोरदार झटापटीचे डाव रंगले होते. प्रदेशाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने हा डाव आणखीनच रंगात आला. बुद्धिबळाच्या खेळात प्रत्येक घरात प्यादी आणि मोहरे नुसते सज्ज उभे करून चालत नाही, तर पुढची प्रत्येक चाल प्रतिस्पध्र्याच्या पुढच्या दहा चालींना शह देणारी करावी लागते. गोपीनाथ मुंडे हे गेल्या काही वर्षांपासून या पटावर एकाच वेळी अनेक प्रतिस्पध्र्याशी झुंजत आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह आणि अंतिमत: त्यांच्या निवडीची घोषणा म्हणजे या सामन्यातील ‘चेक’ आणि ‘मेट’च्या अंतिम खेळी ठरल्या. सुधीर मुनगंटीवार यांच्या फेरनियुक्तीसाठी आग्रह धरण्यामागे आपल्याला शह देण्याचीच गडकरींची चाल आहे, हे ओळखूनच नागपूरवासी आणि रेशीमबागेशी जवळीक असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे नाव पुढे करत मुंडे यांनी ही चाल निष्प्रभ केली. फडणवीसांना समर्थनही देता येत नाही आणि विरोधही करता येत नाही, अशा स्थितीत सापडलेल्या गडकरी गटाची पुढची चाल ओळखून मुंडे यांनी आणखी तिरक्या चालीने पुढे सरकवलेले दोन मोहरेही फडणवीसांना संरक्षण देणारे ठरले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंडे यांचे फारसे सख्य नाही, हे राजनाथ सिंहही जाणून आहेत. त्यामुळेच, तावडे यांचेही नाव पुढे केले गेले आणि त्याच्याच जोडीला विरोधी पक्षनेते खडसे यांच्यासाठीही मोर्चेबांधणीची चाल झाली. या तीन चालींनंतर मुंडे यांची सामन्यावर पकड स्पष्ट झाली. विरोधी पक्षनेतेपदाचा ‘लाल दिवा’ सोडून प्रदेशाध्यक्षपद घेण्यास तावडे किंवा खडसे फारसे राजी नसतील हे ओळखून केलेल्या या चालीत गडकरी गटाची चाल फसली आणि अखेर मतैक्याचा उमेदवार म्हणून फडणवीस यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. गेले काही दिवस कोंडीत सापडलेले मुंडे यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. दोन-चार दिवसांपूर्वी मराठवाडय़ातील दुष्काळाच्या मुद्दय़ावर उपोषणाला बसलेल्या मुंडे यांची गंभीर दखल घेऊन सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. पण त्यावेळी पक्षाने मात्र त्यांच्या उपोषणास फारसे महत्त्व दिले नाही. पुन्हा मुंडे एकाकी पडणार असे दिसत असताना, मुंडे यांनी मैदानात उतरून आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे. मतभेदांतील तडजोड म्हणून फडणवीस हे आता मतैक्याचे उमेदवार म्हणून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, हे स्पष्ट आहे.

Story img Loader