शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाशेजारी उभे राहून आपल्या या धन्याच्या शवाकडे स्तब्धपणे पाहत आणि त्यांना गुलाबपुष्पांच्या गुच्छाने वारा घालत उभा असलेल्या चंपासिंग थापाचा चेहरा त्याही वेळी नेहमीसारखा निर्विकार दिसत होता, पण त्याच्या मनात, हृदयात खोलवर भावनांचा कल्लोळ उसळला आहे, हे त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहीत होते. जवळपास ३० वर्षांपूर्वी नेपाळमधून आलेला आणि गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरणारा हा पोरगा भांडुपचा नगरसेवक के. टी. थापा याचा हात धरून ‘मातोश्री’त आला आणि त्याने स्वत:ला बाळासाहेबांना अर्पण करून टाकले. थंड पण भेदक डोळ्यांचा हा तरुण इमानदार आणि जिवाला जीव देणारा आहे, हे बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने नेमके हेरले. तेव्हापासून तो बाळासाहेबांची सावली बनला.. साहेबांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे हे थापाने स्वत:चे व्रत मानले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारा थापा हा थोडय़ाच काळात मातोश्री परिवाराचा सदस्य झाला. त्याच्या सेवावृत्तीने बाळासाहेबही भारावले आणि थापा हा बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनला. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर कुटुंबवत्सल बाळासाहेब आणखीच हळवे बनले, तेव्हा थापा हा त्यांचा खूप मोठा भावनिक आधार होता, हे मातोश्रीशी जवळीक असलेल्या अनेकांना माहीत आहे. मीनाताईंच्या पश्चात बाळासाहेबांची काळजी हेच जीवन मानून थापाने बाळासाहेबांसाठीच प्रत्येक क्षण वेचला. थापाचे कुटुंब नेपाळात , तर दोन मुले दुबईत असतात.  वर्षांतून कधीतरी तो कुटुंबियांकडे जातो, पण ते केवळ त्याचे शरीर असते. मन इथे, बाळासाहेबांसोबत सावलीसारखेच असते.. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेचा विस्तार करण्याच्या पहिल्या प्रयोगाला थापाचा मोठा हातभारही लागला. नेपाळमध्ये शिवसेनेची उभारणी करण्यात थापाची भूमिका महत्त्वाची होती. बाळासाहेबांनी त्याच्यावर अपार विश्वास टाकलाच, पण आपले मनदेखील अनेकदा त्याच्याजवळ मोकळे केले. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीशेजारीच थापाची लहानशी खोली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा