टाइम साप्ताहिकाचे विद्यमान संपादक फरीद झकारिया यांचे ‘पोस्ट अमेरिकन वर्ल्ड’ नावाचे पुस्तक तीन-चार वर्षांपूर्वी- म्हणजे ते न्यूजवीक या साप्ताहिकाच्या संपादकपदी असताना प्रसिद्ध झाले. तीन वर्षांआधीचा तो काळच निराळा होता. न्यूजवीकच्या संपादकाची जबाबदारी अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांपेक्षा फार वेगळी नसते, अशा अर्थाचे विधान गमतीने का होईना, झकारियांनी करावे आणि त्याचा प्रतिवाद करण्याच्या फंदात कुणी पडू नये, असा तो काळ. झकारियांनी पोस्ट अमेरिकन वर्ल्डची कल्पना मांडताना.. किंवा वास्तव ओळखताना असे प्रतिपादन केले होते की अमेरिकाकेंद्री कारभार फार काळ चालणार नाही. म्हणजेच आणखी स्पष्टपणे असे की, जगात आपले केंद्रस्थान टिकवायचे असेल तर अमेरिकोत्तर जगाशी कसे वागायचे, हे अमेरिकेला नव्याने शिकावे लागेल. हे अमेरिकेला पटले वा नाही, हा मुद्दा नाही. पण अमेरिकेतील एकेक सत्ताकेंद्रे आपापले नवे मार्ग शोधू लागली, हे वारंवार दिसत असते.. मुंबईचे झकारिया अमेरिकेत पोहोचले त्याच्या कैक वर्षे आधीपासून न्यूजवीक हे असेच एक अमेरिकी सत्ताकेंद्र होते आणि विभागवार आवृत्त्या काढून जगावर अंमल गाजवण्याचे न्यूजवीकचे स्वप्न साकारच झाले, अशी हवा अवघ्या २० वर्षांपूर्वी होती. त्या न्यूजवीकने आता छापील आवृत्तीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि केवळ इंटरनेट आवृत्तीच्या बळावर आपण उत्तम मजकूर व फायदेशीर जाहिरात-उत्पन्न यांचा समन्वय साधू शकू, असा विश्वास न्यूजवीकच्या सध्याच्या धुरिणांना वाटतो आहे. याच धुरिणांनी आखलेल्या आणि ऑक्टोबरपासून जाहीरही केलेल्या योजनेबरहुकूम ३१ डिसेंबरचा न्यूजवीकचा अंक, हा अखेरचा छापील अंक आहे.
बदल नक्कीच झाला आहे आणि तोही नफा-तोटा आदी गणिते मांडूनच. आठवडय़ाने अंक छापून तो वाचकांपर्यंत पाठवण्याऐवजी आम्ही हरघडी ताजा मजकूर इंटरनेट आवृत्तीद्वारे वाचकाला देऊ शकतो, हे पाऊल बदलत्या काळाबरोबर चालण्यासाठी आवश्यकच आहे, अशी भलामण न्यूजवीक व्यवस्थापनाच्या वतीने गेले अडीच महिने सुरू आहे. साप्ताहिकाने तोटा सोसण्याऐवजी ही योजना फायदाच वाढवणारी आहे, असा त्यांचा हिशेब. शिवाय, अमेरिकेतील जवळपास ३८ टक्के वाचक आज ऑनलाइन वाचन अधिक पसंत करतात, अशी एक आकडेवारी त्यांच्या बाजूने आहे. या स्थितीत न्यूजवीकचा निर्णय हा धडाडीचे पाऊल समजला जायला हवा, पण तसे होताना दिसत नाही. उलट, टाइम आणि द इकॉनॉमिस्ट या अन्य साप्ताहिकांनाही न्यूजवीकच्याच मार्गाने आज ना उद्या जावे लागणार, अशी हताशाच अधिक आहे. चिंता अमेरिकेतील सर्वच साप्ताहिकांना आहे आणि तिचे प्रमुख कारण इंटरनेटवरून होणारे वाचन, हेच सांगितले जाते आहे. मंदीमुळे या साप्ताहिकांच्या बडय़ा जाहिरातदारांनी हात आखडता घेतला हे धडधडीतपणे दिसते, कुणाची जाहिरात मंदीच्या आधीपेक्षा किती टक्के घटली याची आकडेवारीही प्रसिद्ध होते, पण अमेरिकेतील साप्ताहिकांच्या सद्यस्थितीसंदर्भातील चर्चा मंदीभोवती नव्हे, इंटरनेटवरून होणाऱ्या वाचनाचा टक्का वाढतो आहे, या मुद्दय़ावर रेंगाळते आहे. अमेरिकाभरच्या सात प्रमुख नियतकालिकांची पृष्ठसंख्या २००९ पर्यंत १८ हजार होती, ती आता दहाच हजारांवर येते आहे, याचाही दोष मंदीचा नव्हे, इंटरनेटवरून वाचनाची भूक भागवणाऱ्या लोकांचा.
इंटरनेटला महत्त्व देणाऱ्या या चर्चेत तथ्य नाही, असे नव्हे. लोक कमी वाचतात आणि अधिक पाहतात, ही ओरड चित्रवाणीच्या प्रसारानंतर झाली, त्यातही तथ्य होतेच. पण भारतात इलस्ट्रेटेड वीकलीसारखे साप्ताहिक बंद झाले, त्या वेळी उपग्रह वाहिन्यांचा प्रसार वाढू लागला होता. तो मात्र योगायोग होता. तेव्हा मुद्दा इंटरनेटचा नसून माध्यमबदलाचा आणि अस्तित्व टिकवण्याच्या धोरणांचा आहे. कोणत्याही प्रकाशनाचा एखादा काळ सुवर्णकाळ असेल, तर तो सरल्यावरही नफा-तोटय़ाची समीकरणे बेरजेत कशी ठेवावीत याची फेरआखणी होते. अशा फेरआखणीत १९३३ पासून निघणाऱ्या आणि जगव्यापी प्रसार असणाऱ्या साप्ताहिकाची छापील आवृत्ती बंदच करण्याइतका टोकाचा निर्णय कुणी घेत नव्हते, ते आता होऊ लागले आहे. मात्र, हे करताना इंटरनेटवरील वाचकांचे फक्त आकडेच पाहिले जाताहेत. त्याऐवजी त्यांची वाचनसवय कशी आहे हे अभ्यासल्यास निराळे निष्कर्ष निघू शकतात. छापील न्यूजवीक बंद करण्याचे श्रेय ज्यांना जाते, त्या टीना ब्राउन यांनी वाचकाला छापील शब्दापेक्षा कितीतरी अधिक आम्ही देऊ शकतो, असे म्हटले आहे. टाइम साप्ताहिकाने आपल्या आयपॅड आवृत्तीत ते सारे देण्याचा प्रयत्नही चालवला आहे. व्हिडिओ आणि ई-बुक यांचा मेळ घालणारे ‘अ‍ॅप’ विकत घेण्याची सवय लोकांना टाइमने लावली. इकॉनॉमिस्टनेही फक्त इंटरनेट आवृत्तीसाठी निराळे दर ठेवले. बदलांचे अन्य मार्ग खुले असताना न्यूजवीकने छापील अवतार समाप्त केला.
छापील माध्यमांची घटलेली वाचकसंख्या हा बागुलबुवा आहे. वाचकसंख्या किती यावर दर्जाच काय, नफाशीलता म्हणजे प्रॉफिटॅबिलिटीदेखील अवलंबून नसते. हे अमेरिकेतच नव्हे तर महाराष्ट्रातही खरे आहे. आपले वाचक तरुण आहेत म्हणजे ते टेन्शन नकोच असणारे कॉलेजियन किंवा कॉलेज ड्रॉपआउट आहेत की उमेदीने पुढे जाणारे विद्यार्थी, उद्योजक किंवा व्यावसायिक तरुण आहेत, हे ओळखण्यातच अनेकांची दांडी उडते. हे न्यूजवीकबाबतही झाले. आपला वाचक हा हाय-फ्लाइंग एक्झिक्युटिव्ह आहे आणि तो छापील न्यूजवीकपेक्षा नेटवरचा डेली बीस्ट वाचतो, म्हणजे न्यूजवीक कुणाला नकोच आहे, असे टीना ब्राउनबाईंनी ठरवले. न्यूजवीकच्या व्यवस्थापनात त्या आल्यानंतर डेली बीस्ट नावाचे नेट-दैनिक भरभराटीला आले, हे साऱ्यांनी पाहिले होतेच, त्यामुळे ब्राउनवाक्य प्रमाण मानले गेले. न्यूजवीकचा वाचक कमी होऊन जाहिराती आणि एकंदर नफाशीलताही कमी झाली ती का, याचे उत्तर इंटरनेटच्या प्रसारावर अवलंबून नाही. न्यूजवीकने जे बदल हळूहळू करीत राहणे आवश्यक होते, ते केले नाहीत. वाचकांसाठी जे आवश्यक आणि श्रेयस्कर आहे, ते देण्यात मग कमतरता राहते, तसे होत गेले.
व्यवस्थापनाची समज, हे छापील माध्यमांच्या क्षेत्रातील गाजलेल्या आणि धडाडीचे अशी भलामणही झालेल्या निर्णयांचे मूळ कारण होते आणि असते, असे माध्यमजगताचा गेल्या ३५ वर्षांतला आढावा सांगतो. मग मरडॉक यांच्या कब्जेशाहीनंतर ब्रिटिश वृत्तपत्रसृष्टी ढवळून निघाली. पुढे त्यांच्या सन वृत्तपत्राचा फोन टॅपिंग घोटाळा गेल्याच वर्षांत उघडकीस येऊन मरडॉक दोषी ठरले. टीना ब्राउन यांच्याबद्दल जगाचे बरे मत आहे, परंतु अखेर त्याही बदललेल्या न्यूजवीक व्यवस्थापनाचा भाग आहेत आणि बदल दाखवून देण्याची इच्छा त्यांना आहे.
जग बदलले, काळ बदलला, चला काळाबरोबर बदलूया, असा झपाटा लावताना आपापली समज टिकवून बदलांकडे पाहण्याचे कौशल्य नाकारले जाते. नफा-तोटय़ाची गणिते मांडताना कोणत्याही परिस्थितीत मांडता आलीच पाहिजेत, पण बदल झाला म्हणून एखादे गणित विस्कटणे, हे व्यवस्थापकीय अपयशाचेच लक्षण ठरते.

Prasad Oak was on a liquid diet for 55 days for the film Dharmaveer
‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Phone pay machine desi jugaad video
गाणी ऐकण्याची हौस म्हणून ‘फोन पे’ मशीनला बनवून टाकले स्पीकर; जुगाड VIDEO पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
docufilm bhalchandra nemade
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उदाहरणार्थ ‘डॉक्यूफिल्म बनवणे’…
cid
CID सहा वर्षांनी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, धमाकेदार टीझर प्रदर्शित; मालिकेत कोण कोण दिसणार?
Kalyaninagar accident case State govt approves prosecution of Dr Ajay Tavere and Srihari Halnor
कल्याणीनगर अपघात प्रकरण : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी
Success Story of Dr. Prathap C. Reddy who goes to the office daily at 91 founder of Apollo Hospitals know his Net Worth
वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, वाचा ७१ रुग्णालये आणि कोटींची संपत्ती असलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास
Anil Deshmukh Diary of Home minister
Diary oF Home Minister : “माझ्यावर दबाव टाकून मविआ सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला”, अनिल देशमुखांच्या पुस्तकाची चर्चा!