महाराष्ट्रात आज जे बदल घडत आहेत त्यांची दिशा आणि दशा तपासून पाहायची असेल, ते योग्य मार्गाने होत आहेत की नाही हे पडताळून पाहायचे असेल, आणि ते भरकटलेले असतील तर त्यांना ताळ्यावर आणायचे असेल, तर त्यांवर विचारमंथन झालेच पाहिजे.
महाराष्ट्र बदलतो आहेच. १९४७चा भारत आज उरलेला नाही आणि १९६०च्या महाराष्ट्राची ओळखही आज राहिलेली नाही, हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. बदलांना महाराष्ट्र सामोरा गेला, अनेक पातळ्यांवर महाराष्ट्राचा विकास झाला. हे केवळ झोपडपट्टय़ांवर दूरचित्रवाणीच्या थाळ्या दिसतात आणि प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे, इतके वरवरचे नाही. आíथक विकास आणि मानव विकास यांचे प्रमाण व्यस्त असू शकते. परंतु आज महाराष्ट्राचा मानवविकास निर्देशांक ०.५७ आहे आणि देशाचा ०.४७. याबाबत देशात राज्याचा पाचवा क्रमांक आहे. अनेक पातळय़ांवर घडत गेलेल्या बदलांमध्ये विसंगती आहेत, त्याबद्दल समाधान आणि चीड अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत असतात. गेल्या उन्हाळ्यामध्ये निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळ होता. १९७२च्या भीषण दुष्काळाशी त्याची तुलना केली गेली. हा केवळ पाण्याचा दुष्काळ होता. अन्नधान्याचा नव्हता हेही स्पष्ट झाले. याचबरोबर हेही ध्यानात घ्यायला हवे, की महाराष्ट्रात आजही दुष्काळ पडू शकतो. पाऊस कमी झाला म्हणून दुष्काळ पडला, हे १९६०मधील सरकारने म्हटले असते, तर एक वेळ चालले असते. आजचे सरकार मात्र तसे म्हणू शकत नाही. आज त्यांना तसे म्हणण्याचा अधिकार नाही. असे सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत आहे. तेव्हा राज्यात अजूनही खूप काही घडणे बाकी आहे. राज्यकर्त्यांनी विकासाचे ढोल-नगारे जरूर पिटावेत. त्यांना ते कोणी सांगण्याचीही आवश्यकता नाही. हे निवडणुकीचे वर्ष आहे म्हटल्यावर लवकरच आपल्या कानठळ्या बसू लागतील. परंतु त्याचबरोबर अजूनही आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्या मार्गावर आपणच करून ठेवलेले मोठमोठे कमरतोड खड्डे आहेत, हेही त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ते त्यांच्या ध्यानात येत नसेल, तर कोणीतरी ते सांगितले पाहिजे. ‘लोकसत्ता’ने तर सांगितलेच पाहिजे, हीच पहिल्यापासून आमची भूमिका राहिलेली आहे. शुक्रवारपासून मुंबईत सुरू झालेली ‘बदलता महाराष्ट्र’ ही दोन दिवसीय विचार परिषद हे त्याच भूमिकेचे अपत्य आहे.
वृत्तपत्राचे प्रमुख काम हे समाजातील घटना-घडामोडींचे वृत्तांकन करतानाच, तेथील बदल टिपणे आणि त्यांचा अर्थ वाचकांसमोर मांडणे हे असते. आजची सारीच वृत्तपत्रे आपले हे प्राथमिक आणि प्रमुख काम प्रामाणिकपणे करतात, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. सगळ्याच प्रसारमाध्यमांचे कमी-जास्त प्रमाणात एवढे सुमारीकरण झालेले आहे, की केवळ छचोरपणा, उच्छृंखलता, लोकानुनयी सनसनाटीपणा म्हणजेच पत्रकारिता अशी एक नवी व्याख्या रूढ होऊ लागलेली आहे. मात्र याला ‘एक्स्प्रेस समूह’ नेहमीच अपवादभूत राहिलेला आहे. केवळ समाजातील बदल टिपून त्यांचा अर्थ लावणे एवढेच नव्हे, तर सामाजिक बदलांचा उत्प्रेरक – कॅटॅलिस्ट म्हणूनही काम करणे हे लोकसत्ताने आपले कर्तव्य मानले आहे. तिथीनुसार कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत हे सांगण्यासारखी थोर कामे ज्यांना करायची त्यांनी ती खुशाल करावीत, परंपरांचे तसे इव्हेंटीकरण करण्यात ‘लोकसत्ता’ला रस नाही. तो आमचा पत्रधर्म नाही. याचा अर्थ लोकसत्ताला कार्यक्रमांचे, उपक्रमांचे वावडे आहे, असे नाही. विचारांचे आदान-प्रदान करणारा ‘आयडिया एक्स्चेंज’, ‘लाउडस्पीकर’ असे काही कार्यक्रम ‘लोकसत्ता’ करतेच. समाजामध्ये स्वत:ला गाडून घेऊन काम करीत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना मदतीचा हात देणारा ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ हा उपक्रमही दरवर्षी राबविण्यात येतो. या उपक्रमशीलतेचे एक पुढचे पाऊल म्हणजे ‘बदलता महाराष्ट्र’ ही विचार परिषद.
या उपक्रमाची घोषणा झाल्यानंतर त्याचे स्वागत करणाऱ्या प्रतिक्रिया जशा आल्या, तशाच काही ‘नेहमीच्या’ प्रतिक्रियाही आल्या. असले कार्यक्रम म्हणजे केवळ चूष असते हो, त्याने काही बदल वगरे होत नसतात, यांसारख्या. त्यात काही गर नाही. संशयात्मा विनश्यती असे कोणी कितीही म्हटले, तरी कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा संशय घेणे केव्हाही चांगले. मात्र येथे एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे, की कोणत्याही कृतीला विचारांची साथ आवश्यक असते. ती नसेल, तर ती अविचारी कृती ठरते. महाराष्ट्रात आज जे बदल घडत आहेत, त्यांची दिशा आणि दशा तपासून पाहायची असेल, ते योग्य मार्गाने होत आहेत की नाही हे पडताळून पाहायचे असेल, आणि ते भरकटलेले असतील तर त्यांना ताळ्यावर आणायचे असेल, तर त्यांवर विचारमंथन झालेच पाहिजे. आज महाराष्ट्रात कमतरता कशाची असेल, तर ती या विचारमंथनाची. शहरीकरण, औद्योगिक आणि सांस्कृतिक स्थिती, शिक्षण व आरोग्यव्यवस्था, राजकारणाचा दर्जा यांसारख्या विषयांत ती अधिक जाणवते. ‘लोकसत्ता’च्या पानमर्यादेतून हे काम प्रत्यही सुरूच असते. त्यालाच जोड म्हणून या चर्चापीठाची योजना करण्यात आली आहे. वाद-विवाद, खंडन-मंडन यांतून येथे विविध विषयांवर जी वैचारिक घुसळण अपेक्षित आहे, त्यातूनच भविष्याकडच्या सकारात्मक वाटचालीचा नकाशा निर्माण होणार आहे, असा आमचा विश्वास आहे.
‘बदलता महाराष्ट्र’च्या उपक्रमाचा श्रीगणेशा शुक्रवारी ‘शिक्षणात महाराष्ट्र कुठे?’ या विषयाने झाला. त्याचे वृत्त आजच्या अंकात पहिल्या पानावर आहे. शिक्षण हा ‘लोकसत्ता’च्या दृष्टीने कळीचा विषय आहे. विद्येविना किती अनर्थ होतात, हे महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला कधीच सांगून ठेवलेले आहे. अशा महत्त्वाच्या आणि वाचकांच्याही जिव्हाळ्याच्या विषयापासूनच या उपक्रमास प्रारंभ होणे हे औचित्यपूर्णच होते. आज राज्यातील आणि एकंदरच देशातील शैक्षणिक क्षेत्राकडे पाहिल्यास पहिल्यांदा दिसतो तो गोंधळ. शिक्षणाच्या माध्यमापासून अभ्यासक्रमांपर्यंत आणि परीक्षांपासून निकालांपर्यंत पदोपदी अनागोंदी असल्यासारखे चित्र आहे. त्यात तथ्य असल्यास हा नेमका काय आजार आहे? तो व्यवस्थेचा आहे की अंमलबजावणीतला? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या विचारसत्रांतून शोधली जाणार आहेत. राज्यात मराठीची गळचेपी होत असल्याचा आक्षेप नवा नाही. परंतु मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या हा चिंतेचा विषय आहे. अभ्यासक्रमांत सातत्याने बदल होत आहेत. मात्र ते कालसुसंगत आहेत की काय, हा प्रश्नच आहे. शिक्षकांची क्षमता हाही आजच्या काळातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा व्यापक विषयांवर येथे विचार केला जातो आहे. राज्यातील शिक्षणतज्ज्ञांपासून शैक्षणिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्यांचे विचार यथावकाश ‘लोकसत्ता’मधून वाचकांसाठी चर्चेस खुले होतीलच.
या मंथनातूनच विकासाला गती मिळेल. लोकसत्ताच्या ज्ञानयज्ञात वाचकांचा नेहमीच मोठा सहभाग राहिलेला आहे. या उपक्रमातही वाचकांची वैचारिक साथ मिळेल असा आम्हांस विश्वास आहे. आपण सारेच ‘बदलत्या महाराष्ट्रा’च्या या सकारात्मक वाटचालीचे यात्रेकरू होऊ या. विकास सर्वानाच हवा आहे. त्याची दिशा ठरवू या.
अग्रलेख- एका विचारयात्रेचा प्रारंभ
महाराष्ट्रात आज जे बदल घडत आहेत त्यांची दिशा आणि दशा तपासून पाहायची असेल, ते योग्य मार्गाने होत आहेत की नाही..
First published on: 03-08-2013 at 04:01 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in maharashtra need to check and see