‘भारतमाता’असे व्यक्तिरूप दिले तरी भारताचे राष्ट्रीय चारित्र्य आपण भारतीयच प्रत्यही घडवत असतो..  हे चारित्र्य घडवताना आपण इतिहासही घडवत आहोत, त्याला कोणत्या तत्त्वज्ञानाचा आधार असल्याचे पुढील पिढय़ांना दिसणार आहे? वर्तमानाचे आधारभूत तत्त्वज्ञान हेच राष्ट्रीय चारित्र्याच्या मोजमापात येणार आहे, हे आपण जाणतो का?
चरित्र म्हणजे वर्तन, कृती, सवय. एखाद्याचे वर्तन ही कथा होते, तो इतिहास बनू शकतो. म्हणून ‘चरित्र’चा व्यापक अर्थ इतिहास असा होतो. इंग्लिशमधील character चा अर्थ सद्गुणी जीवन. character चे नियम म्हणूनी  ethos  शब्द आहे. त्याचा अर्थ व्यक्तीचे, समुदायाचे, विचारसरणीचे किंवा राष्ट्राचे चरित्र घडविणारे नियम.  
  चरित्र माणसालाच असते की राष्ट्रालासुद्धा असते, हा प्रश्न जागतिक पातळीवर फार मोठय़ा प्रमाणात आज चर्चिला जात आहे. अनेक राष्ट्रांना (भारतासह) या समस्येने ग्रस्त केल्याने अनेकांनी तथाकथित ‘मूल्यशिक्षण’ हा अभ्यासक्रम प्राथमिक शिक्षण स्तरावर सक्तीचा केला आहे. आता, राष्ट्राचे चारित्र्य कशात शोधायचे? कोणते घटक एकत्र आणले की राष्ट्राचे चरित्र घडते? उदाहरणार्थ, भारत हे राष्ट्र किंवा ‘भारतमाता’ (हिंदमाता) असे राष्ट्राचे मानवीकरण केले तर भारतमातेचे चरित्र कोण घडवते? भारतमाता ही व्यक्ती नसल्याने ती स्वत: हे चारित्र्य घडवू शकत नाही. मग, तिची मुले असणाऱ्या आपणावर- सर्वधर्मजातीजमातीच्या प्रत्येक जणावर (एकही जण न वगळता) या आपल्या आईचे चरित्र घडविण्याची जबाबदारी असते आणि आहे, असा निष्कर्ष काढता येईल.  
आता, ‘मी’ जे काही वागतो त्यामुळे माझे आत्मचरित्र तयार होते. राष्ट्राचे चरित्र कोण लिहिते? इतिहासकार, बखरकार की इतिहासाचे शिक्षक/प्राध्यापक? की नेते, पक्ष, संघटना, घराणी आणि या प्रत्येकाचे कार्यकत्रे, चेले, अंधभक्त की ‘कॉमन मॅन’? आणखी शंभर-दोनशे किंवा काहीशे वर्षांनी भारताचा सामाजिक इतिहास कसा लिहिला जाईल? ‘विसाव्या-एकविसाव्या शतकातील भारत भ्रष्ट, भयभीत, जातीयवादी, जमातवादी, राजकीय-सामाजिक जाणिवा नष्ट करणारा, एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनकाळास इतिहासाच्या कबरीत गाडून टाकणारा, सत्तांध नेते, मदांध समाजकारणी, आर्थिक गुंडगिरीखाली पिचला गेलेला..’ अशा शब्दांत? की अन्य काही परिभाषेत? भारत ही माझी माता असल्याने तिचा पुत्र-पुत्री म्हणून मी माझ्या आईचे चरित्र कसे लिहीन? राष्ट्राचे चरित्र त्या राष्ट्रातील नागरिक कसे वागतात, त्यावर अवलंबून असते, अशी म्हण आहे.
 एखादा कालखंड किंवा एखादे राष्ट्र समजावून घ्यावयाचे असेल तर आपण त्या कालखंडाचा किंवा त्या राष्ट्राचा इतिहास आणि त्या राष्ट्राच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास समजावून घेतला पाहिजे. ज्याला इतिहासाचे कसल्याही प्रकारचे ज्ञान नाही, त्याला आपण ‘सुशिक्षित’ म्हणूच असे नाही. आपण सर्वानी हे मान्य केलेले असते की, माणसाला त्याच्या देशाच्या इतिहासाचे तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासाचे; त्याचप्रमाणे देशाच्या साक्षरतेचे आणि साहित्य, संगीत, कला, नाटय़ अशा कलात्मक जाणिवांचे किमान काहीएक भान असतेच. या यादीत धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्याविषयक जाणिवा निर्माण होणे आणि त्या दिशेने व्यक्तीने व त्या समूहाने वैचारिक प्रवास करीत जाणे, या कृतीत तर तुमच्या जाणिवांची परिपक्वता दिसून येते. माणसाचा व्यवसाय-धंदा कोणताही असला, त्याचे शिक्षण कला- वाणिज्य- विज्ञान- तंत्रज्ञान- वैद्यकीय- ललितकला, नाटय़-संगीत काहीही असो, त्याच्या आवडीनिवडी कोणत्याही असल्या तरी त्याला त्याच्या देशाच्या तत्त्वज्ञानाची माहिती असणे, हे त्याच्या सुशिक्षित असण्याचे एकमेव लक्षण असते. ज्या माणसाला सुशिक्षित असण्याचा दावा करावयाचा असेल त्याने जी काही पुस्तके वाचलेली असली पाहिजेत; त्यात प्लेटोचा ‘रिपब्लिक’ हा संवाद वाचलेला असणे आवश्यक आहे, असे तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक दिवंगत जे. सी. पी. डान्ड्राड (एलफिस्टन कॉलेज, मुंबई) यांचे मत असल्याचे मे. पुं. रेगे त्यांच्या ‘माझी तत्त्वज्ञानाची वाटचाल’ या कथनात नमूद करतात.
इतिहास का शिकायचा? तर ‘त्याची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला पुन्हा गतकालीन वैभवाचे दिवस येतील’ किंवा ‘आता जे मुजोरपणा, तालेवारी करतायत त्यांना त्यांची लायकी कळेल’ अथवा ‘आमच्यावर अन्याय झाला त्याचा सूड म्हणून आम्हीही नवी अन्याय परंपरा निर्माण करू, संबंधितांना धडा शिकवू, त्यांना त्यांची लायकी दाखवू’; यासाठी नाही. तर आपल्या धर्मजातीिलगनिरपेक्ष पूर्वजांनी, म्हणजे आपल्या देशातील नेत्यांनी, आपल्या कुटुंबातील प्रमुखांनी किंवा पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत, त्यांची पुनरावृत्ती आपण करू नये, जे लोक त्या चुका करीत आहेत किंवा करू पाहात आहात, त्यांना चुकांपासून परावृत्त करण्यासाठी अतिशय जागरूक राहावे यासाठी इतिहास शिकावयाचा असतो. शिवाय आपण आपलाच इतिहास अभ्यासायचा नाही तर इतर देशांचाही अभ्यासावयाचा असतो. त्यांचाही आपल्या जडणघडणीत वाटा असतो.   
तत्त्वज्ञानाचा इतिहास कशासाठी शिकवायचा? तर ज्या तत्त्वज्ञानामुळे आपल्या पूर्वजांनी चुका केल्या, सार्वजनिक हिताचा बिनदिक्कत बळी दिला, ‘आता चुकीचे ठरत आहे’, असे तत्त्वज्ञान मांडले असेल; तर ते सारे तत्त्वज्ञान दुरुस्त करण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास शिकवायचा. देशाचा इतिहास पाहताना आपण नेहमी राजकीय इतिहासच पाहतो, त्यामागे आणि एकूण समाजरचना, विविध सामाजिक, राजकीय कृतींमागे, धोरणामागे कळसूत्राची भूमिका बजावणाऱ्या तत्त्वज्ञानाची दाखल मात्र सहसा घेतली जात नाही. नाटक पाहताना नट, नर्तन, नटय़ा दिसते, पण त्यामागे असणारा निर्माता, लेखक, दिग्दर्शक अदृश्य असावा, तसे त्या त्या समाजाचे, राष्ट्राचे तत्त्वज्ञान त्या राष्ट्राच्या जीवनाच्या नाटय़ामागे असते. भारतीय समाजाच्या स्थितिगतीचे विश्लेषण देताना भारतीय प्रबोधनकार सुधारकांनी नेमके कारण शोधले ते भारतीय तत्त्वज्ञानात आणि या तत्त्वज्ञानाच्या इतिहासात.  
तेव्हा, जुन्या चुका दुरुस्त करणे आणि नवे कालसुसंगत तत्त्वज्ञान निर्माण करणे या कामासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास शिकवायचा. पण त्याच वेळी सूड म्हणून कोणत्याही नव्या अन्याय्य समाजपद्धती निर्माण करणारे नवे चुकीचे तत्त्वज्ञान निर्माण करावयाचे नाही, ही मोठी नतिक बांधीलकी असते. चूक सापडली असता ती जर दुरुस्त केली तर चुकांचा मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग असतो, अशी स्पष्ट जाणीव हान्स रायशेनबाख हा तत्त्ववेत्ता देतो. (‘राइज ऑफ सायंटिफिक फिलॉसॉफी’- वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय – मराठी अनुवाद : ग. वि. कुंभोजकर, १९७३)                    
आज आपले भारताचे नेमके तत्त्वज्ञान कोणते? भारताचे भविष्यकाळात जे वर्णन केले जाऊ शकते, अशा आजच्या परिस्थितीमागील तत्त्वज्ञान नेमके कोणते? ते कोण निर्माण करीत आहे? ज्यांना व्यावसायिक तत्त्ववेत्ते म्हटले जाते ते तत्त्वज्ञानाचे प्रसिद्ध, अप्रसिद्ध, अज्ञात, आजी-माजी प्राध्यापक की समाजातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, प्रेमी की राजकीय व सामाजिक धुरीण नेते मंडळी? की विचारांच्या नादी न लागणारी पण थेट जीवन जगणारी सामान्य माणसे? इतिहासाचे निर्माते म्हणून आणि तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे निर्माते म्हणून आपण आज नेमका कोणता इतिहास आणि कोणते तत्त्वज्ञान निर्माण करीत आहोत? कोणत्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आपण आजचे इतिहासाचे पान लिहीत आहोत? इतिहासाच्या अखंड वाहणाऱ्या कालप्रवाहात आजच्या िबदूवर आपण उभे राहून नेमके काय करीत आहोत?
हे प्रश्न उपस्थित करण्याचे स्वातंत्र्य व सामथ्र्य ज्यातून मिळाले त्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा प्रवेश या राष्ट्रात आणि महाराष्ट्रात कसा झाला ते पुढील लेखात पाहू.
* लेखक लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा