या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रद्धा कुंभोजकर

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

संस्कृतीचे प्रवाह एकमेकांत अधूनमधून मिसळत पुढे जात राहतात तेव्हा कधी संघर्ष होतात, तणावपूर्ण दुरावा येतो किंवा कधी खुल्या बाहूंनी एकमेकांना कवेतही घेतलं जातं. नवी संस्कृती स्वीकारली, म्हणून जुनी सोडलीच जाते असंही नाही..

आज वाघबारस आहे. आज आपण डोंगरात जाऊ. चुलीवर तांदळाची खीर करू. वाघोबाला निवद दाखवू. आणि मग म्हणू, ‘‘आमच्या शिवारी येशील का?’’ मग आपल्यातलाच वाघ झालेला कुणी तरी म्हणेल, ‘‘नाही, नाही.’’  मग आपण खीर खाऊन घरी येऊ. तुम्ही जर अहमदनगर जिल्ह्य़ाच्या अकोले तालुक्याच्या डोंगराळ भागातले रहिवासी असाल, तर तुम्हाला ही परंपरा माहीत असेल.

यावर ‘‘अरे वा, बसुबारसेला वाघबारस साजरी करतात वाटतं!’’ अशी काहींची प्रतिक्रिया असू शकेल. पण या वाघबारस साजरी करणाऱ्यांच्या ध्यानीमनीही नसताना ते ‘आपल्यासारखे’ नाहीत, वेगळे आहेत, म्हणून त्यांना ‘सुधारावं’ असंही काही जण म्हणतात. खरं पाहता ‘आमच्यासारखी भाषा नाही, आमच्यासारखं खात नाहीत, आमच्यासारखं वागत नाहीत’ म्हणून त्यांना लगेच शत्रू ठरवण्याची घाई करणं हे काही बरोबर नाही. त्यामुळे आपल्या धारणांमध्ये सुधारणा करण्याची गरज कुणाला आहे, हे स्पष्ट आहे.

पण हा झाला आपला आजच्या काळातला विचार. भारतीय इतिहासात बहुसांस्कृतिक जगण्याबाबतच्या प्रश्नांची सोडवणूक कशी केली गेली हे यानिमित्तानं पाहायचं ठरवलं तर असं दिसतं की, अनेक संस्कृतींचे प्रवाह एकमेकांत मिसळत जाऊन आपलं आजचं जगणं घडलेलं आहे. जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसार माणसांचे संघर्ष झालेत, तणावपूर्ण दुरावा आलाय, कधी खुल्या बाहूंनी एकमेकांना कवेतही घेतलं गेलंय.

पशुपालकांचं जीवन जगताना आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं जगणाऱ्या दस्यूंना ऋग्वेदात (१०.२२.८) अकर्म, अन्यव्रत, अमानुष अशा शब्दांनी शत्रू मानलेलं दिसतं. त्याच वेळी (१०.३४.१३) अक्षसूक्तामध्ये फाशांनी जुगार खेळून सर्वस्व गमावलेल्या माणसानं ‘त्यापेक्षा तुम्ही शेती करा, म्हणजे घरची माणसं, गुरं लाभतील,’ असं सांगून पशुपालक जीवनपद्धतीपेक्षा खूप वेगळी अशी शेतीची जीवनपद्धती अंगीकारण्याचा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे महाभारतातल्यासारखं खांडववन जाळूनच इंद्रप्रस्थ नगरी उभारण्याचा हट्ट ठेवणारे लोक आधुनिक काळातही आढळतात. खंडाळ्याचा घाटरस्ता तयार करताना इंग्रज साहेबाला वाट कुठून काढायची हे न कळून त्यानं तिथल्या शिंग्रुबा नावाच्या धनगराला मदत मागितली. शिंग्रुबानं दाखवलेल्या वाटेनुसार बोगदा काढून रस्ता बनल्यावर मग गोरा साहेब गाडीतून शिंग्रुबाजवळ आला, आणि तुला बक्षीस काय देऊ, असं विचारू लागला. पण ‘मी पूर्वीचा धनाचा धनगर हाय, मला काय तुजी दिनगी नकु’ असं उत्तर मिळालं. पण रोकडय़ा देवघेवीपलीकडची जगण्याची पद्धत न समजल्यामुळे कदाचित ‘गोऱ्या मंग सायबानं हो। बंदुकीला गोळी या।  गोळी त्यानं भरले। शिंग्रुबाला मारले। सुंबरान मांडले।’ असं होऊन खंडाळ्याच्या घाटरस्त्यावर शिंग्रुबाचं आणि वसाहतवादी संस्कृतींच्या हिंस्र आणि चलाख स्वरूपाचंही स्मरण- सुंबरान- करून देणारं लहानसं देऊळ उभं राहिलं.

दुसऱ्याच्या जगण्याच्या पद्धती समजून घेतल्या, तर दोन्ही बाजूंचं जगणं आनंदाचं होऊ शकतं. ‘सुलेमान चरित्र’ नावाच्या ग्रंथामध्ये ख्रिस्ती धर्मपरंपरेतील जुन्या करारामधल्या सॉलोमन राजाच्या जन्माची कथा पंधराव्या शतकात संस्कृत भाषेत रचली गेली. ग्रंथकार होता कल्याणमल्ल आणि त्याचा आश्रयदाता होता अयोध्येचा राजा, लोदी कुळाचं भूषण मानला गेलेला राजा अहमद याचा राजपुत्र – लाडखान. भाषेची, धर्माची, काळाची बंधनं ओलांडण्याचे प्रयत्न करत बहुविध संस्कृतींना सामोरं जाऊ पाहणाऱ्या खुल्या मनाचं हे उदाहरण म्हणता येईल. संघर्ष आणि समन्वयाच्या वाटांनी इतिहासक्रम चालत राहत असावा.

काही वेळा आपली सर्वाची संस्कृती एकच आहे, जगण्याची एकच पद्धत आहे असे अनैतिहासिक दावे केले जातात. वेगवेगळे मोकळे आवाज घुसमटून टाकत एकाच साचेबद्ध चालीत गायची सक्ती केल्यासारखं ते गाणं आपल्या कानीकपाळी आदळत राहतं. अशा वेळी आपल्या इतिहासाकडे पाहिलं तर अनेक प्रकारच्या जगण्याच्या पद्धती एकत्र वाटचाल करताना दिसतात. इतिहासाकडे पाहण्याची विलक्षण व्यापक दृष्टी ज्यांना होती असे  दामोदर धर्मानंद कोसंबी प्राचीन भारतीय संस्कृतीबाबत भाष्य करताना सांगतात की, संस्कृतीला पायाभूत असणाऱ्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये होणारे बदल आणि त्यावर आधारलेल्या भाषा, संस्था, परंपरा यांमध्ये होणारे बदल हे एकदम होत नाहीत. नांगर जाऊन ट्रॅक्टर आला तरी दुसऱ्या दिवसापासून बैलपोळा साजरा करणं बंद होत नाही. देवीची लस सापडली, तरी लहान बाळांना शितळादेवीच्या पाया पडायला नेणं थांबलं नाही. त्यामुळे संस्कृतीसारख्या एकजिनसी नसणाऱ्या, प्रवाही गोष्टीबाबत दावे करताना इतिहासाकडे लक्ष देणं उपयुक्त ठरतं.

अर्थातच गतकाळामध्ये ‘डालडालपे सोने की चिडिया’ छापाची आदर्शवादी स्वप्नं शोधणाऱ्या माणसांना वाटतं तितकी ही वाटचाल गुण्यागोविंदानं घडलेली नव्हतीच. जगणं निभावताना वाटेत आलेली अनोळखी माणसं, संस्कृती, भाषा यांच्याकडे संशयानं पाहणं, त्यांच्याशी संघर्ष करणं, हिंसा करणं, हार झालेल्या समूहातली माणसं, वस्तू, तंत्रज्ञान, संकल्पना जेत्यांनी बळकावणं हे इतिहासात वेळोवेळी दिसलेलं आहे. पण या संघर्षांच्या सोबतच समन्वय, हातमिळवणी, वाटाघाटी या गोष्टीही इतिहासामध्ये दिसतात.

‘फर्स्ट क्लास सरदार’ म्हणून इंग्रजांकडून बहुमान मिळालेल्या विंचूरकर घराण्यातील सरदार रघुनाथराव यांनी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारतभेटीप्रीत्यर्थ १८७६ मध्ये एक संस्कृत काव्य रचलं होतं. यात रोगराईचा नाश होण्यापासून ते स्त्रीशिक्षण आणि वीज वापरता येण्यापर्यंत सर्व चांगल्या गोष्टी ही राणीची कृपा आहे,  ‘व्हिक्टोरियानुग्रह एष सर्व:’ असं सांगून ‘प्रिन्सस्य तुष्टय़ै’ म्हणजे युवराजाला संतोष व्हावा म्हणून हे काव्य इंग्रजी भाषांतरासह अर्पणही केलं होतं. त्यापूर्वी चौदाव्या शतकामध्ये विश्वनाथानं लिहिलेल्या ‘साहित्यदर्पणा’मध्ये ‘अल्लावदीननृपतौ न सन्धिर्नच विग्रह:।’ अशा शब्दांत अल्लाउद्दीन खिलजीच्या सत्तेचा दरारा वर्णन करणाऱ्या ओळी आहेत. ही संस्कृत काव्यं शासकांपर्यंत पोहोचली की नाही यापेक्षा महत्त्वाची बाब अशी की, शासक आणि जनता यांच्या संस्कृती वेगळ्या असूनही आणि त्यामागच्या सत्तेच्या उतरंडीची जाणीव असूनही आपल्या समाजाचं जगणं सुसह्य़ व्हावं यासाठी केलेल्या या वाटाघाटी होत्या.

सुरुवातीला उल्लेख केलेल्या वाघबारसेचं आणि एकूणच गावाकडच्या जगण्याचं सुरेख चित्रण जालिंदर गभाले या तरुणाच्या ‘गावाकडचे व्लॉग’ या यूटय़ूब चॅनलवर आहे. यात जालिंदर म्हणतो – ‘‘आपली संस्कृती आपण टिकवायला पाहिजे. आणि एकमेकांच्या संस्कृतीचा आदरदेखील करायला पाहिजे.’’ स्मार्टफोनसारख्या सुलभ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपलं अस्सल जगणं चित्रित करणं म्हणजे जमीनअस्मानाचा फरक असणाऱ्या दोन जीवनपद्धतींसोबत वाटाघाटी करणं आहे असं वाटतं.

आपली संस्कृती एकजिनसी असल्याचा दावा इतिहासाच्या दाखल्यांना हरताळ फासत असेल तरीही का केला जातो? तर विविधता, बहुसांस्कृतिकता या गोष्टी माणसाच्या मनाला निवड करण्याची मोकळीक देतात. ही मोकळीक, हे स्वातंत्र्य त्यांना एकगठ्ठा बांधून ठेवायला अडचणीचं ठरतं. मी काय खावं, कोणता सण साजरा करावा, कुणावर प्रेम करावं, कोणत्या भाषेत कविता करावी, कशाची चित्रं काढावी या आणि अशा अनेक गोष्टींबाबत स्वत:च्या तंत्रानं – स्वतंत्रपणे वागायचं ठरवलं तर मला नियंत्रणात ठेवता येणार नाही. म्हणून इतिहासाच्या दाखल्यांकडे डोळेझाक करत माणसांना साच्यांमध्ये कोंबायचे प्रयत्न होतात. अमुक देशाच्या, अमुक धर्माच्या, अमुक लिंगभावाच्या माणसांनी असेच वागले पाहिजे अशी दवंडी या एकजिनसी संस्कृतीच्या दाव्यांमागं असते.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त

इतिहासाचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com