श्रुती तांबे
समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र.
ज्या भागवतधर्माच्या अनुयायांनी महाराष्ट्राला भूषण मिळवून दिलं, मराठी भाषा उन्नत केली, त्या महाराष्ट्रातील आजचे काटेकुटे आपल्याला दिसण्याइतकी आपली दृष्टी भावनिक उमाळ्यापलीकडे जाऊ शकणारी आणि मर्मज्ञ तटस्थतेनंही बघणारी असायला हवी..
भारतीय द्वीपकल्पात येणारा पाऊस आणि त्याचं चक्र हे वैशिष्टय़पूर्ण आहे. पावसाच्या या चक्राशी लोकांचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पातळ्यांवरचं जगणं आणि भावजीवनही बांधलेलं आहे. मोसमी पावसाच्या लहरी आणि दुबळ्या शक्यतेवर तगणारा, हेलकावणारा हा महाप्रचंड भूभाग आणि त्यावरचे अब्जावधी लोक. रिमझिम पावसापासून ते महापुरात सारं काही गिळणाऱ्या, समुद्र झालेल्या नद्यांपर्यंत सर्जनाचे, जीवनाचे सगळे रंग या तीन-चार महिन्यांत भारतात दिसतात. या ऋतूत सर्जनाच्या शक्यता दृश्य होतात.
त्याचवेळी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातल्या लक्षावधी भाविकांना पंढरीची ओढ लागते. लहान-थोर, राव-रंक आपापल्या दिंडय़ांसह एक महिना घर, शेत, प्रपंच सोडून गात-नाचत समूहानं शेकडो कोस पायी चालत वारीला निघतात. कोरडवाहू जमिनीच्या टीचभर तुकडय़ावर राबणारी लाखो माणसं पावसाच्या लहरीवर दरवर्षी न थकता जगण्याचा डाव मांडतात. निसर्गानं तो डाव उधळला, तर कसंबसं तगून राहतात- पुन्हा पुढच्या वर्षी डाव मांडण्यासाठी. चिकाटीनं तगून राहताना, डाव फसला तरी न मोडण्याचं बळ समूहमनाला मिळतं, ते विठ्ठलभक्तीतून!
ज्ञानेश्वरांनी भागवतधर्माची पताका रोवली. पुढे एकनाथांनी या भक्तीमार्गाचं अधिक सविस्तर निरूपण केलं. जन्मदत्त जातीच्या, श्रीमंत-गरीब पार्श्वभूमीच्या, स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे जाऊन, पोथ्यावाचन किंवा देवळातली षोडशोपचार पूजा न करताही भगवंताजवळ केवळ भक्तीमुळे कोणालाही पोहोचता येईल, अशी समतावादी, मुक्तीदायी मांडणी महाराष्ट्रात भक्तीसंप्रदायानं केली. ही हिंदूधर्माच्या कर्मठ प्रवाहावरची विद्रोही प्रतिक्रिया होती. त्यात जसे ज्ञानेश्वरांसारखे वाळीत टाकलेले ब्राह्मण होते; तसेच अठरापगड जातीतले बहुजन समाजातले कुणबी, वाणी, माळी, सोनार, धोबी, शिंपी, महार असेही होते. या सर्वानी देवाजवळ जाण्यासाठी हरिनाम अभंगातून गाण्याचा मार्ग सर्वासाठी खुला केला. ज्ञानेश्वरांनी आणि एकनाथ, नामदेव, तुकाराम, चोखोबा, निळोबा, शेख मोहम्मद, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, बहेणाबाई आणि इतर किती तरी जणांनी रुजवलेला हा भक्तीमार्ग संसार आणि अध्यात्म यांची एकत्र कास घालायला सांगणारा आणि म्हणून सामान्य स्त्रीपुरुषांना जमण्याजोगा, परवडण्याजोगा होता. त्यामुळे या काळातील भक्तीचळवळीतील संतांच्या काव्यातून आपल्याला तत्कालीन पिकं, भाज्या, त्यांचे व्यवसाय, जाती आणि त्याद्वारे होणारं शोषण, त्या काळात पडलेले दुष्काळ, नात्यागोत्यातले आणि समाजातले अंर्तसबंध हे स्पष्टपणे आणि रोखठोकपणे दिसतात. कारण त्यांचं जगणं प्रत्यक्ष संघर्षांचं आणि मातीशी जोडलेलं होतं. वैदिक परंपरेतल्या दैवतांपेक्षा बहीणभाऊ, सखा आणि मायबाप वाटणारा विठ्ठल जवळचा वाटणारा होता. हा भागवतधर्म लाखो लोकांनी गेल्या सात शतकांत ‘महाराष्ट्रधर्म’ केला. सगळ्या मनुष्यप्राण्यांना समान लेखणारी, प्राणी-पक्ष्यांनाही सोयरे मानणारी एक नवी नैतिकता भागवतधर्माने अनुयायांना दिली.
प्रयत्नवादी की नियतीवादी?
माणसाला जगायला हवी असलेली श्रद्धा कधी मैत्री-माया-क्षमा-करुणा अशी रूपंही घेते. पण त्या सामूहिक श्रद्धेचे स्वरूप कोणते; तिचे परिणाम कोणते; ती श्रद्धा त्या समूहाला धाडस देते, स्वतंत्र करते की अधिक दुबळं करते, हे महत्त्वाचं. म्हणूनच कोणत्या प्रकारची श्रद्धा माणसाला नियतीवादी करते आणि कोणत्या प्रकारची प्रयत्नवादी करते, हे प्रश्न पुढे येतात. त्या नियतीवादातून त्या समूहाला अधिकाधिक असहाय वाटतं का, असे महत्त्वाचे समाजशास्त्रीय प्रश्न निर्माण होतात. भारतासारख्या- आजही कोटय़वधी लोक अतिशय गरीब असणाऱ्या देशात- तर समाजशास्त्रानं हे प्रश्न विचारायलाच हवेत. फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमिल दुरखिम यांनी दुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या अभ्यासातून मानवी समाजातील आदिम धर्माच्या उदयाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. ‘काही वस्तूंना पवित्र ठरवून केलेले विधी आणि ठेवलेले विश्वास म्हणजे धर्म’ अशी व्याख्याही त्यांनीच दिली. ‘रेन डान्स’सारख्या प्रथा खरोखर पाऊस पाडत नसला तरी, पाऊस आलाच नाही आणि दुष्काळ पडला- पण सुखदुखा:त आपण सारे एकत्रच आहोत, अशी समुदायभावना तो नृत्यविधी करून देतो, असं त्यांनी दाखवून दिलं आहे.
कार्ल मार्क्सच्या धर्मविषयक विचारांइतकी दुसऱ्या कुठल्याही विचारवंताच्या धर्मविषयक विवेचनाची गैरअर्थ काढून बदनामी क्वचितच झाली असेल! ज्या समाजात स्तररचना असते; सत्ता, संपत्तीचं कायम विषम वाटप आढळतं, त्या समाजातील धर्मसंस्था विषमतेचं प्रतिबिंब असते. अशा ठिकाणी धर्मसंस्था विषमता केवळ टिकवतच नाही, तर जैसे थे वादी वृत्ती वाढवत नेते. म्हणजेच विषमतेवर आधारलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं टाळता येतं, असं मार्क्सचं म्हणणं होतं. तुकारामांच्या अभंगातून दुष्काळाच्या झळा बसलेले शेतमजूर, सावकारी आणि गहाणखत जमिनी दिसतात. तुकारामांसारख्या बहुजनांनी केलेली ज्ञाननिर्मिती सनातन्यांना सहन न होऊन त्यांनी बुडवलेल्या अभंगांच्या वह्य आणि तुकारामांनाही मरण पत्करावं लागणं- हे एकीकडे ज्ञानमीमांसेच्या पातळीवरचा संघर्ष दाखवतात, तर दुसरीकडे धर्मसंस्थेच्या पातळीवरचा. परंतु ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांनी निर्भयपणे ज्ञानाच्या पातळीवर आणि आचाराच्या पातळीवर आव्हान दिलं, म्हणून आज एकविसाव्या शतकात महाराष्ट्र वैचारिकतेचा, समताविचाराचा टेंभा मिरवतो. परंतु आता यापुढे वारकरी समाज ही चिकित्सक ज्ञानमीमांसेची, धर्मसुधारणेची आणि खुल्या चर्चेची परंपरा पुढे नेईल ना, हा प्रश्न विचारायला हवा.
‘माऊली-भावने’चा विसर
तरी शेवटी काही कूटप्रश्न राहतातच.. वारीहून गावी परतल्यावर कान्होपात्रा, शेख मोहम्मद, चोखोबांविषयी ऐकून निर्माण झालेला भक्तीभाव असा कसा आटतो? पुन्हा मध्ययुगातले जन्मानं कोण मोठा, कोण लहान सांगणारे तथाकथित सरंजामी संस्कारच गावरहाटी ताब्यात का ठेवतात? गावातल्या तथाकथित हलक्या जातीतल्या मिसरूड फुटलेल्या पोरानं शीळ घातली, कॉलेजात शिकणारी तथाकथित वरच्या जातीतली मुलगी त्याच्याशी बोलली, तर ‘तिला फूस लावली’ आणि त्यांचं ‘प्रकरण’ आहे, असा खराखोटा बभ्रा झाला की त्याला पार संपवण्यापर्यंत उच्च जातींचा दुरभिमान बळावतो, तेव्हा वारीतली ‘माऊली भावना’ कशी आठवत नाही? ज्ञानोबांचं नियमित गायलेलं पसायदान कसं विसरलं जातं? ‘भक्तीत तल्लीन व्हावं, देवापाशी सारे समान’ ही शिकवण जाते तरी कुठे? की आज वारीला नव्यानं जाणाऱ्या, विशेषत: तरुणांसाठी वारी ही कोणी तरी प्रायोजित केलेली केवळ तात्पुरती झिंग म्हणून पाहिली जाते का?
आज महाराष्ट्राच्या जिल्ह्यजिल्ह्यंत छोटय़ामोठय़ा इतक्या पालख्या, देवस्थानांच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत, की एका अंदाजानुसार वर्षभरात कुठल्या ना कुठल्या पालखीसह जवळपास दररोज चार कोटी तरुण रस्त्यावरून चालत असतात. विविध ठिकाणच्या शिर्डीला जाणाऱ्या पालख्या, गजानन महाराजांच्या पालख्या, रामदासपादुका, शिवाय उत्तर भारताप्रमाणे पवित्र पाण्याच्या कावडी घेऊन जाणारे तरुण सगळे यात आले. यात प्रायोजित जॅकेट्स घातलेले तरुण, ट्रक्समधून हाकल्या जाणाऱ्या पालख्या-यात्रांचं प्रमाण वाढताना दिसत आहे; म्हणजेच उत्स्फूर्त भक्तीभावाऐवजी संघटित धर्मसंस्था आता विविध प्रकारे तरुणाईला रस्त्यावर उतरवत आहेत का?
अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव
वारीच्या प्रबोधनपरंपरेतल्या मवाळ, अंतर्मुख, मुक्तीदायी स्वरावर कर्कश सत्ताकेंद्रीकरणाच्या महत्त्वाकांक्षेचे कर्णे लावलेले काही महंत अनिष्ट प्रवृत्तींना गेली काही वर्ष वारीत शिरू देत आहेत, हे दुख:द आहे. काही हिंसेचं समर्थन करणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींनीही चलाखीनं यात घुसखोरी करून घेतलेली आहे.
कथित पुरोगामित्वाच्या नावाखाली उथळ स्वयंघोषित विश्लेषकांनी पसरवलेला वारीविषयीचा तुच्छतावाद जसा सर्वथा असमर्थनीय आहे, तसेच ‘वारी म्हणजे हिंदूधर्मरक्षण’ अशी भूमिका घेऊन वारकऱ्यांच्या वेषात शिरून स्वत:चा भागवतधर्मविरोधी कर्मठ अजेण्डा राबवणं हेही धिक्कारार्ह आहे. आक्रमक कर्मठवादाचा पुरस्कार करणाऱ्या लाखो पुस्तिका वाटणे, मार्गशीर्षांतल्या गुरुवारपासून ते राममंदिराच्या मुद्दय़ांपर्यंत वादग्रस्त विषयांवर विशिष्टच बाजूची राजकीय भूमिका रेटणाऱ्या सीडी, भाषणे, पुस्तिका सतत प्रसारित करण्यासाठी वारी आणि वारकऱ्यांचा वापर करणे अतिशय अयोग्यच नाही का?
पुढाकार वारकऱ्यांचा हवा
गावोगाव भागवतसप्ताहाच्या वेळीदेखील अशाच अनेक अनिष्ट भक्तीसंप्रदायविरोधी प्रथा रेटल्या जात आहेत. अनेक तथाकथित कीर्तनकार सगुणसाकार भक्ती आणि परमात्म्यासोबतचं एकत्व याऐवजी भलत्याच विषयांचं निरूपण वारकरी परंपरेपेक्षा वेगळ्या, उथळ शैलीत करत आहेत. स्त्रीविषयक शेरेबाजी अश्लाघ्य भाषेत करत आहेत, प्रच्छन्न राजकीय प्रचार करत आहेत. या सर्व दुर्दैवी गोष्टी तातडीनं रोखण्यासाठी सुजाण वारकरी संप्रदायानंच पुढाकार घ्यायला हवा.
विठुरायासमोर स्त्रीपुरुष, लहानथोर, जातीय असा भेद नाही, हे संतांनी सात शतकं अखंड बिंबवलं. त्यामुळेच महाराष्ट्रातलं विचारविश्व वाहतं राहिलं. ज्या भागवतधर्माच्या अनुयायांनी महाराष्ट्राला भूषण मिळवून दिलं, मराठी भाषा उन्नत केली, त्या महाराष्ट्रातील हे काटेकुटे आपल्याला दिसण्याइतकी आपली दृष्टी चिकित्सक व भावनिक उमाळ्यापलीकडे जाऊ शकणारी आणि मर्मज्ञ तटस्थतेनंही बघणारी असायला हवी.
लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त समाजशास्त्राचे अध्यापन करतात. लेखातील मते वैयक्तिक.
ईमेल : shruti.tambe@gmail.com