श्रद्धा कुंभोजकर

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

मूल्यं आणि ज्ञानाची शिदोरी अनौपचारिकपणेदेखील पोहोचवली जाते. तर औपचारिक ज्ञानाचं प्रमाणीकरण करणं आणि ते पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे अधिकार अशा दोन्ही गोष्टींची जबाबदारी शिक्षणक्षेत्राची असते. या दोन्ही प्रकारच्या ज्ञानव्यवहारात व्यक्तीला आपली विवेकबुद्धी वापरावी लागतेच..

मुंग्यांची रांग सरळ रेषेत जात असते. तिच्या मध्येच बोटं फिरवून मुंग्यांचा माग पुसला, तर त्या सैरभैर होतात. कशामुळे? तर सलगपणे जाताना त्या जी माहिती विशिष्ट गंधामधून एकमेकींना देत असतात, तिची साखळी मध्येच निखळल्यामुळे. अर्थात् जरासं अडखळल्या, तरी इकडेतिकडे त्या गंधाचा माग काढून मुंग्या परत आपला मार्ग शोधतातच. माहिती, ज्ञान या गोष्टींची एक सलग अशी साखळी असते. आणि तिचे दुवे निखळले, तरी प्रयत्नांती सापडतात. प्रागैतिहासिक काळातली भीमबेटकामधील आदिमानवाची गुंफाचित्रं असोत, इनामगावच्या उत्खननात सापडलेली मातीची भांडी असोत वा ऐतिहासिक काळात जुन्नरजवळील नाणेघाटामध्ये राणी नागनिकेनं कोरून घेतलेला शिलालेख असो, ही ऐतिहासिक साधनं म्हणजे आपल्या भूतकाळाविषयीच्या माहितीची साखळी सलग ठेवायला मदत करणारे दुवे आहेत. हे दुवे विवेकाच्या सूत्रात गुंफणं गरजेचं असतं. आपलं सामाजिकीकरण आणि शिक्षण या प्रक्रिया म्हणजे आधीच्या पिढय़ांकडे असणारी ज्ञानाची, मूल्यांची शिदोरी पुढच्या पिढय़ांकडे पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा भाग असतो.

ज्ञान ही अनेक पिढय़ांच्या श्रमांमधून निर्माण झालेली गोष्ट असते. म्हणजे आपल्यापर्यंत जरी एखादं इतिहासकालीन नाणं पोहोचलं, तरी ते घडवणाऱ्या त्या काळातल्या टांकसाळी, धातूचं ज्ञान, राज्यव्यवस्थेचं नाण्यांच्या निर्मितीवरचं नियंत्रण, वजनामापांचं, लिपीचं ज्ञान अशा अनेक गोष्टी त्या नाण्यासोबत पोहोचत असतात. ते नाणं त्यातल्या धातूच्या लोभापायी न वितळवणाऱ्यांचे श्रमदेखील आपल्या ज्ञानाला हातभार लावत असतात. आपल्यापर्यंत पोहोचलेल्या या ज्ञानाची शिदोरी पुढच्या पिढय़ांकडे सोपवणं ही जशी आपली जबाबदारी असते, तसंच ती शिळी, कालबाह्य़ तर झाली नाही ना, हे सतत तपासणं, त्यासाठीची उपाययोजना करणं हीदेखील आपलीच जबाबदारी असते. उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादा रोग झाला आहे असं निदान करून औषधं सुचवणाऱ्या डॉक्टरांवर आपण रागावलो, हल्ले केले, तर त्यातून आपलंच अज्ञान दिसून येतं. त्याचप्रमाणे आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे ज्ञान पोहोचवत आहोत, त्यामधल्या त्रुटी सांगणं, ते सुधारण्याचे, अद्ययावत करण्याचे प्रयत्न करणं ही खरं तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी असते. त्यातही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांकडे तर ही जबाबदारी अधिकच असते हे समजून घेतलं पाहिजे.

गरज भासली तर कालबाह्य़ झालेल्या प्रस्थापित ज्ञानाच्या विरोधी सूर मांडण्याचं कर्तव्य आणि सामुदायिक प्रयत्नांतून निर्माण झालेल्या औपचारिक ज्ञानाचं प्रमाणीकरण करून ते पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे अधिकार अशा दोन गोष्टींची जबाबदारी ज्ञानव्यवहारामध्ये असणाऱ्या प्रत्येकावर विशेषत्वानं येत असते.

याचं उदाहरण पाहायचं तर सूर्य पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असतो असा प्रस्थापित विचार असतानादेखील कोपर्निकसने त्याच्या विरुद्ध जाऊन पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सूर्यकेंद्री सिद्धान्त मांडला. परंपरेविरुद्ध विचार मांडल्याबद्दल त्याच्या पुस्तकावर बंदी घातली गेली. सूर्यकेंद्री विचार मांडणारी नऊ वाक्यं गाळल्यानंतरच उरलेलं पुस्तक वाचण्याची उदार परवानगी आजपासून बरोबर चारशे वर्षांपूर्वी – १६२० मध्ये –   दिली गेली होती. कोपर्निकसच्या सिद्धान्ताचं समर्थन केल्याबद्दल गॅलिलिओलादेखील चर्चच्या धर्मसभेनं नजरकैदेची आणि भलतेसलते विचार प्रसृत न करण्याची शिक्षा ठोठावली. यावर अशी आख्यायिका आहे, की शिक्षा ऐकल्यावर गॅलिलिओ पुटपुटला होता, ‘‘तरीदेखील ती (पृथ्वी ) फिरतेच!’’

कालबाह्य़ विचारांना विरोध करण्याची, त्यांच्यासोबत वाद मांडत तत्त्वबोध घडवण्याची भारतीय इतिहासातील परंपरासुद्धा अतिशय प्रेरक आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चरकसंहितेमध्ये शिकण्या-शिकवण्याच्या बरोबरीचं स्थान ‘तद्विद्यसंभाषा’ म्हणजे तज्ज्ञांसोबतच्या वादचर्चेला दिलेलं आहे. हरिभद्र सूरी यांच्या ‘धूर्ताख्यान’ या ग्रंथामध्ये तर पौराणिक कल्पनांना उघड विरोध न करता उपहासात्मक पद्धतीनं त्यांतील विसंगती उलगडून दाखवल्या आहेत. मुघल राजपुत्र दारा शुकोहनं लिहिलेल्या ‘मजमा उल बहरीन’ अर्थात् ‘समुद्रसंगम’ या तत्त्वज्ञानाविषयीच्या संस्कृत ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो तत्त्वज्ञानाच्या दोन मतप्रवाहांचा समन्वय करण्याची भूमिका मांडतो, ‘ज्ञानिनो: द्वयोरपि मतसमुद्रयो: इह संगम:’

या वाद मांडण्याच्या कर्तव्यासोबतच शिक्षण क्षेत्रामधील व्यक्ती आणि संस्थांकडे औपचारिक ज्ञानाच्या प्रमाणीकरणाचे आणि ते पुढच्या पिढीकडे पोचवण्याचे अधिकार असतात. या अधिकारापोटी योग्य ते नियम पाळून आणि समाजात घडणारे बदल लक्षात घेऊन नवीन ज्ञानाला मान्यता देणे, असलेल्या ज्ञानाची पातळी तपासणे, ती सुधारण्यासाठी मदत करणे अशी कर्तव्यं असतातच. शेतकरी अनौपचारिक पद्धतीने आपापल्या बागेत आंब्याची कलमं करतात; परंतु कृषी विद्यापीठ जेव्हा एखाद्या कलम करण्याच्या पद्धतीला मान्यता देतं, तेव्हा ती पद्धत वैज्ञानिक निकषांवर तावूनसुलाखून घेतलेली आहे याची खात्री समाज बाळगतो. किंवा जखम झाल्यावर हळद लावण्याची पारंपरिक माहिती असेल, तरीही हळदीचे वैद्यकीय गुणधर्म शास्त्रीय पद्धतीनं तपासून ते वनस्पतिशास्त्रज्ञांनी प्रमाणित केले की त्याला विज्ञानाचा दर्जा मिळतो. विद्यापीठाचा, तज्ज्ञांचा हा अधिकार त्यांची योग्यता तपासून समाजानं त्यांना दिलेला असतो. ज्ञानाच्या प्रमाणीकरणाचे अधिकार असतानाही अयोग्य ज्ञानाला मान्यता देणं, पातळी न तपासताच ज्ञान आहे असं प्रमाणित करणं आणि ज्ञानाची पातळी सुधारण्यासाठी मदत न करणं हे ज्ञानशास्त्रीय दृष्टीनं पाहिलं तर कर्तव्यापासून ढळणं आहे.

हे झालं औपचारिक ज्ञान आणि मूल्यांबाबत. अनौपचारिक ज्ञानाच्या आणि मूल्यांच्या साखळीमध्ये कुटुंब, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, जात, राष्ट्र, वर्ग, धर्म अशा अनेक समूहांचे सदस्य म्हणून दरेक व्यक्ती ही  दुव्याची भूमिका निभावत असते. या सगळ्या ओळखींच्या आधारानं सामाजिकीकरणाची प्रक्रिया घडत राहते, की ज्यातून मूल्यं आणि ज्ञानाची शिदोरी पोहोचवली जाते. अर्थात् या अनौपचारिक ज्ञानाच्या क्षेत्रातसुद्धा व्यक्तीला आपली विवेकबुद्धी वापरावी लागतेच. संत तुकाराम सांगतात- सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता।

पण बहुमत पाहिलं तर ते कधीकधी ज्ञानमार्गविरोधी-  अँटी इंटलेक्च्युअल भूमिका घेताना दिसतं. काही ज्ञानवंतांनी समाजाला अप्रिय वाटेलशी भूमिका घेतली, समाजाला तुच्छतेची वागणूक दिली, किंवा समाजापासून फटकून राहिले, की एकूणच ज्ञानव्यवहाराचं किरकोळीकरण करण्याची अहमहमिका लागल्याचं जगभर दिसून येतं. ‘शिकून कुणाचं भलं झालंय?’ असा बिनदिक्कत दृष्टिकोन लोकप्रिय होऊन ज्ञानाची परंपरा खंडित करेल की काय अशी शंका येते. इंग्रजीत याला थ्रोइंग द बेबी आउट विथ द बाथवॉटर- म्हणजे आंघोळीच्या सांडपाण्यासोबत आंघोळ घातलेलं बाळदेखील फेकून देणं असं म्हणतात. ज्ञानप्रवाहाला गढूळ करणाऱ्या गोष्टींवर टीका जरूर व्हायला हवी, अतिगंभीर विद्वत्तेची थट्टादेखील व्हायला हवी. प्रत्यक्ष ऋग्वेदामध्ये (७.१०७) अतिरात्र यज्ञाच्या वेळी सोमाभोवती जमलेल्या पुरोहितांची तुलना तळ्याकाठी जमलेल्या बेडकांबरोबर केलेली दिसते. परंतु पुढच्याच सूक्तामध्ये ‘सुविज्ञानं चिकितुषे जनाय सत् च असत् च’ असं म्हणून चिकित्सा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असेल त्याला सत् आणि असत् यांच्यात विवेक करणं सहज शक्य आहे अशी विवेक आणि ज्ञानलालसेची स्तुतीदेखील केलेली आहे.

ज्ञानाची वाट सर्वानी चोखाळावी या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार एन. टी. बनसोडे यांनी ‘माझा दामू झाला प्रधान’ हा आंबेडकरी जलशासाठीचा लोकप्रिय वग १९४६ मध्ये लिहिला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतला मारुती आपल्या दामोदर नावाच्या मुलाला एका काजीच्या सल्ल्यानुसार शिक्षण देतो. या शिक्षणामुळे आणि अंगच्या हुशारीमुळे दामू भद्रावती नगरीचा प्रधान म्हणून नेमला जातो. ही आनंदाची बातमी देणारं पत्र वाचून दाखवायला गावातले मत्सरी अभिजन तयार नसतात. काजी पत्र वाचून दाखवतात आणि मग मारुती आनंदानं सांगतो, ‘जरी मुलाला शिक्षण द्याल, झोपाळ्यात झोके मजेत घ्याल, वतनाचा सोडा अभिमान, या लिहन्यानं केलं बघा छान..’

ज्ञानमार्गाकडे वाटचाल करतानाचे अधिकार, कर्तव्यं, विवेकाची गरज हे सगळं विचारात घेतलं तर  ज्ञानमार्गविरोधी भूमिकेच्या व्यत्ययामुळे ही रांग काहीशी अडखळेलही, पण पुन्हा ती अखंडित चालू राहील असा विश्वास वाटतो. कारण ज्ञान ही मुक्तिदायी शक्यता खुल्या करणारी अनन्य गोष्ट आहे.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com