डॉ. जयदेव पंचवाघ
मेंदूशी संबंधित आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आज अत्यंत उत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पण त्यासाठी गरज असते ती त्या आजारांची लक्षणं वेळेवर ओळखता येण्याची. अर्थात या उत्कृष्ट तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्याची वाटदेखील काही कमी खडतर नव्हती.
इसवी सन १८८४ सालाच्या शेवटच्या भागात मेंदूच्या शस्त्रक्रियाशास्त्रातील अत्यंत उल्लेखनीय अशी घटना घडली. मेंदूच्या आत झालेली गाठ काढण्याची पहिली शस्त्रक्रिया या दिवशी लंडनमध्ये करण्यात आली. दुर्दैवाने जंतुसंसर्गामुळे मॅनेन्जायटिस होऊन हा रुग्ण तीन आठवडय़ांनी दगावला, परंतु मेंदूच्या आत झालेली गाठ ही शस्त्रक्रियेने काढता येण्याची शक्यता जगाला त्या दिवशी सर्वात प्रथम दिसली.
मेंदूतली गाठ नेमकी कुठं आहे हे दाखवण्यासाठी लागणारा सी.टी. स्कॅन आणि एमआरआय या दोनही तपासण्या त्या दिवसापासून जवळजवळ १०० वर्ष दूर होत्या. जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून शस्त्रक्रियेदरम्यान देण्यात येणारी प्रतिजैविक अँटिबायोटिक्स तयार होण्यास अजून ६० वर्ष लागणार होती आणि आज ज्या मायक्रोस्कोपमधून या शस्त्रक्रिया केल्या जातात तोसुद्धा पुढची ५०-६० वर्ष तरी जग पाहणार नव्हतं. या ठळक गोष्टी वगळता इतर अनेक अडथळे त्या वेळी होतेच.
डॉक्टर रिकमन बेनेट या चेताविकार तज्ज्ञाने या या रुग्णाला तपासलं होतं. अनेक दिवस तीव्र डोकेदुखीने त्याला सतावलं होतं. त्याचबरोबर शरीराच्या उजव्या भागातली शक्ती कमी होते आहे असं जाणवू लागलं होतं. १८८४ च्या आधीच्या ५०-६० वर्षांत मेंदूतल्या काही केंद्रांची कार्य काय असतात हे थोडं फार स्पष्ट झालं होतं. डॉ. जॅकसन आणि डॉ. फेरिअर या चेतासंस्थेच्या शास्त्रज्ञांच्या अतुलनीय कार्यामुळे मेंदूतील विविध केंद्रांचा पहिला ‘नकाशा’(मॅप) या काळात तयार झाला होता. या नकाशाच्या आधारावर आणि रुग्णाची लक्षणं आणि तपासणीवरून मेंदूतली गाठ कुठं असेल याचं ढोबळ अनुमान लावणं उत्कृष्ट चेताविकारतज्ज्ञांना हळूहळू शक्य होत होतं.
डॉ. बेनेट यांच्या या रुग्णाला डोकेदुखीबरोबर हळूहळू उजव्या बाजूच्या कमजोरीचा त्राससुद्धा वाढत गेला. सर्व प्रकार बघता जर काहीच केलं नाही तर हा रुग्ण दगावेल यात कोणालाच शंका राहिली नाही. डॉक्टर रिकमन यांनी त्याकाळचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर गोडली यांच्याशी संपर्क साधला आणि रुग्णांच्या लक्षणांविषयी सविस्तर चर्चा केली. ज्या अर्थी रुग्णाच्या उजव्या भागातील शक्ती कमी होत गेली होती त्याअर्थी ही गाठ मेंदूच्या डाव्या बाजूच्या विशिष्ट भागात निर्माण होत असावी असा अंदाज या दोघांनी बांधला. इतर कोणतीही साधनं नसताना फक्त अत्यंत तपशीलवार आणि अचूक चेता तपासणीच्या आधारावर या गाठीच्या मेंदूमधील ठिकाणाचा अंदाज या दोघांनी लावला होता. सी.टी. स्कॅन व एमआर आय तर सोडाच, पण साधा एक्स-रेसुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हता. या निदानाच्या जोरावरच शस्त्रक्रिया पार पाडण्याचं त्यांनी ठरवलं. अर्थात सर्व गोष्टींची रुग्णाला व नातेवाईकांना कल्पना देऊनच त्यांनी हे पाऊल टाकलं होतं. या जगातील सर्वप्रथम ब्रेन टय़ूमर शस्त्रक्रियेचा वृत्तान्तसुद्धा अत्यंत तपशिलात शब्दांकित करून ठेवलेला आहे. दिवस होता २५ नोव्हेंबर १८८४.
डॉ. गॉडली यांनी मेंदूच्या आत झालेली गाठ सर्वप्रथम काढली असली तरी त्याआधी कवटीच्या आणि मेंदूच्या मधल्या भागातली गाठ १८७९ मध्ये डॉ. विल्यम मॅसवेन या स्कॉटिश सर्जनने काढली होती. त्याच्याही आधी, १८७६ मध्ये, विल्यम मॅसवेननेच एका तरुण मुलाच्या मेंदूतील फ्राँटल लोब या भागात गळू (पू भरलेली गाठ/ अबसेस) झाल्याचं निदान केलं होतं. परंतु त्याच्या नातेवाईकांनी परवानगी नाकारल्यामुळे मॅसवेनला या मुलावर शस्त्रक्रिया करता आली नाही.
काही महिन्यांनी हा दुर्दैवी मुलगा दगावल्यावर केलेल्या शवविच्छेदनात ही गाठ म्हणजे गळूच होता आणि तो गळू मॅसवेनने भाकीत केलेल्या ठिकाणीच होता हे दिसून आलं. मॅसवेनचं आजाराचं व त्या आजाराच्या मेंदूतील ठिकाणाचं निदान अचूक असल्याचं सिद्ध झालं. या सगळय़ा गोष्टींचा त्या मुलाच्या नातेवाईकांना पश्चात्ताप झाला आणि आपण शस्त्रक्रियेला परवानगी दिली असती तर कदाचित या मुलाचा जीव वाचता असता असं वाटल्यावाचून राहिलं नाही. पण तेव्हाच्या वैद्यकीय वातावरणाचा विचार करता त्यांची चूक झाली असं म्हणता येणार नाही. फक्त लक्षणं आणि तपासणीवरून मेंदूतील आजाराचं अचूक निदान करता येऊ शकतं याची लोकांना कल्पनाही करणं शक्य नव्हतं आणि त्या आधारावर कवटी उघडून शस्त्रक्रिया करून आपला मुलगा बरा होऊ शकेल ही शक्यता तर अतक्र्य कोटीतली वाटत होती.
त्यानंतर १८७९ साली डॉ. विल्यम मॅसवेनकडे दुसरी एक केस आली. ही तरुण मुलगी होती. या मुलीच्या उजव्या हातात व चेहऱ्याच्या उजव्या बाजूला वारंवार फिट यायच्या. म्हणजेच काही वेळाच्या अंतराने हे भाग अनियंत्रितपणे थडाथड उडायचे. डॉ. जॉन हगिलग्स जॅकसन यांच्या फिट किंवा एपिलेप्सीच्या संशोधनावरून मॅसवेनने या मुलीला मेंदूत डाव्या बाजूला फ्राँटल लोब या भागात गाठ असल्याचं निदान केलं. या वेळी मात्र त्या मुलीच्या नशिबानं तिच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रियेला परवानगी दिली. मॅसवेनने या मुलीवर शस्त्रक्रिया केली. मेंदूभोवतालचं जाड आवरण (डय़ूरा मेटर) उघडल्यावर त्यालाच आतून चिकटलेली ती गाठ मॅसवेनने काढून टाकली. हा इतिहासातला सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला गेलेला दिवस! ती मुलगी पुढची आठ वर्ष जगली.
आज ब्रेन टय़ूमर सेंटरमध्ये आम्ही मेंदूतील गाठींवर जी शस्त्रक्रिया करतो त्यात अविश्वसनीय वाटावं असं प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं. गेल्या पाच ते दहा वर्षांत या तंत्रज्ञानामध्ये अत्यंत झपाटय़ाने सुधारणा होत गेल्या आहेत. सर्वप्रथम म्हणजे मेंदूतील गाठीचं ठिकाण अत्यंत अचूकतेने एमआरआय आणि सिटी स्कॅनमध्ये दिसतं. मेंदूच्या अगदी खोलवरच्या भागामध्ये प्रखर प्रकाश पडेल आणि तिथले भाग अत्यंत स्वच्छ, सुस्पष्ट आणि अनेक पटींनी मोठे दिसतील अशा प्रकारचे न्यूरो मायक्रोस्कोप उपलब्ध आहेत. आणि आता तर यात कॉम्प्युटर नॅव्हिगेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचासुद्धा उपयोग होतो. असं अनेक प्रकारचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्यावर एक स्वतंत्र लेखच लिहिण्याची गरज आहे. असो.
१८८४ साली चेताविकारतज्ज्ञांच्या तपासणीच्या आधारावरच ब्रेन टय़ूमर निदान व शस्त्रक्रिया होत असे. आज असा रुग्ण चेताविकारतज्ज्ञाकडे पोहोचतो तेव्हा उत्कृष्ट तपासणी गरजेची असतेच, परंतु उपचाराच्या पुढच्या पायऱ्यांसाठी अमूल्य तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. ब्रेन टय़ूमरची लक्षणं वेळेत ओळखून चेताविकारतज्ज्ञांकडे जाणं हे मात्र आजही कोणत्याही तंत्रज्ञानावर नाही तर त्या लक्षणांविषयीच्या जागरूकतेवर अवलंबून आहे. आणि म्हणूनच ही लक्षणे थोडी खोलात जाऊन सांगणं आवश्यक आहे.
मेंदूतील गाठींच्या लक्षणांचे पाच गट असतात. गाठीमुळे कवटीच्या आतील दाब वाढणं, गाठींमुळे फिट येणं, गाठींमुळे मेंदूतील विशिष्ट केंद्रांना इजा होऊन त्यांचं कार्य थांबणं, स्वभाव, व्यक्तिमत्त्व व वर्तणूक यांच्यात गाठींमुळे बदल होणं या लक्षणांबरोबरच लक्षणांची शेवटची शक्यता म्हणजे कधी कधी अगदी मोठय़ा आकाराची मेंदूतील गाठसुद्धा अगदी हळूहळू वाढत गेल्यामुळे फारशी लक्षणं निर्माण करत नाही. ती अपघातानेच दुसऱ्याच कारणासाठी एमआरआय किंवा सिटी स्कॅन केल्यावर लक्षात येऊ शकते. विशेषत: अगदी हळू वाढत जाणाऱ्या जातींच्या गाठींबाबत हे घडू शकतं.
या लेखाबरोबर जे छायाचित्र दिलेलं आहे त्या व्यक्तीवर साधारण १५ वर्षांपूर्वी आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. या गाठीचा आकार सहज एखाद्या क्रिकेट चेंडूएवढा आहे. पण या व्यक्तीला काही दिवस थोडं डोकं जड होण्यापलीकडे फार लक्षणं नव्हती!
आणखी दोन प्रकारची लक्षणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्या मेंदूत दिवसाला अर्धा लिटर या वेगाने मस्तिष्क जल म्हणजेच ‘सेरेब्रो स्पायनल फ्लुईड’ तयार होतं. ते मेंदूतील विविध पोकळय़ांमधून वाहत जाऊन शेवटी रक्ताभिसरणात शोषलं जातं. या पाण्याच्या वाहण्याच्या प्रवाहात अडथळा आणणारी गाठ जर तयार झाली तर हे पाणी मेंदूत साचून जलशीर्ष किंवा हायड्रोसिफॅलस होतं. यात निरनिराळी लक्षणं दिसू शकतात.
आणि सर्वात शेवटचं म्हणजे मेंदूतील गाठीतून अतिरिक्त संप्रेरकं स्रवल्यामुळे दिसणारी लक्षणं. मेंदूच्या तळाला असलेल्या पियुषिका ग्रंथीच्या गाठींमध्ये (पिच्युटरी टय़ूमर) हे घडतं. या प्रत्येक लक्षणावर अधिक खोलात जाऊन मी पुढच्या लेखात लिहिणार आहे. याचं कारण म्हणजे आज ब्रेन टय़ूमर बरा करण्यासाठी अत्युत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पण या गाठी बऱ्या व्हायच्या असतील तर त्यांचं निदान लवकर होणं गरजेचं आहे.. आणि ही गोष्टं सामान्य जनतेला ही लक्षणं व्यवस्थित माहीत असण्यावर अवलंबून आहे!
(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत. brainandspinesurgery60@gmail.com