छत्तीसगढमधील सत्तास्पर्धा उघडपणे बाहेर येणे तसे स्वाभाविकच होते. सत्तेत सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसणाऱ्या रमणसिंग यांच्याविरुद्ध त्यांच्याच मंत्रिमंडळातील त्यांचे क्रमांक दोनचे सहकारी उपमुख्यमंत्री ब्रिजमोहन आगरवाल यांनी जाहीरपणे उघडलेली आघाडी आता नव्याने चर्चेत येऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले बहुमत मिळाले, त्यामुळे रमणसिंग यांच्यावरील पक्षनेतृत्वाचा विश्वास ढळला नाही आणि मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात पडली. या कारणाने हे आगरवाल महाशय संत्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना राज्यातील नोकरशाहीला नीट हाताळता येत नसल्याची टीका जेव्हा त्यांनी केली, तेव्हा रमणसिंग यांनी शांत राहणे पसंत केले होते. पण त्यामुळे आगीत तेलच पडले आणि ती वेगवेगळ्या मार्गाने पसरू लागली. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने रमणसिंग शक्तिप्रदर्शन करताच सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून आल्याबद्दल आगरवाल यांनी स्वत:चेही जाहीर शक्तिप्रदर्शन घडवले. सार्वजनिक बांधकाम खाते आपल्या मर्जीतील सहकाऱ्याकडे सोपवून रमणसिंग यांनी या साऱ्या प्रकाराचा वचपा काढला, तेव्हा ते युद्ध जाहीर फलकांतून व्हायला सुरुवात झाली. आगरवाल आणि रमणसिंग यांच्यातील हे भांडण विकोपाला जाता कामा नये, यासाठी पक्षाच्या नेत्यांना आता प्रयत्न करणे भाग आहे. राज्याच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता, भाजपचे काय होईल, अशी चिंता करणाऱ्या राजकीय विश्लेषकांना ९० पैकी ४९ जागा जिंकून भाजपने आतापर्यंत केलेल्या कामाची मिळालेली पावती दिली आहे. सत्तेच्या स्पर्धेत शेवटपर्यंत लढणाऱ्या काँग्रेसला ३९ जागांवर समाधान मानावे लागले आणि जिंकण्याच्या मनीषेवर पाणी सोडावे लागले. सत्तेत असलेल्या पक्षातील प्रत्येकालाच महत्त्वाचे पद मिळावे, असे वाटत असते. रमणसिंग आणि आगरवाल यांच्यातील अशी धुसफूस देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळते. अगदी महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यातील शीतयुद्ध हे माध्यमांचे हुकमी शस्त्र असते. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळून आपलाच मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा राष्ट्रवादीने गेल्या तीन निवडणुकांत बाळगली होती. छत्तीसगढमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली. रमणसिंग हे बाहेरचे असल्याचा जो प्रचार त्यांच्याच पक्षातील लोकांनी सुरू केला, त्याचे उत्तर देण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. आगरवाल यांचे पंख कापून त्यांना त्यांची जागा दाखवू देण्यास पक्षाच्या नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवण्याची ते वाट पाहत होते. त्यानंतर खातेबदल करताना त्याचा परिणाम सगळ्यांनाच दिसला. परंतु जाहीरपणे फलकयुद्ध करणारे आगरवाल हे एकमेव असल्याने, त्यांच्यामागे असंतुष्टांची किती मोठी फळी उभी आहे, हे कळण्यास वेळ लागेल. येडीयुरप्पांचे बंड मोडून काढता काढता धाप लागलेल्या भाजपला छत्तीसगढमधील हा असंतोष वेळीच शमवणे आवश्यक ठरणार आहे. रमणसिंग यांनी सावधपणे पावले उचलली नाहीत, तर त्यांनाही या रोषाचे बळी व्हावे लागेल. राजकारण म्हणजे पाठीत खंजीर खुपसून पद मिळवणे ही जी काँग्रेसी पद्धत आहे, ती भाजपमध्येही वापरली जाऊ लागली आहे, असाच या साऱ्या घटनांचा अर्थ आहे.
छत्तीसगढी चढाओढी
छत्तीसगढमधील सत्तास्पर्धा उघडपणे बाहेर येणे तसे स्वाभाविकच होते. सत्तेत सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसणाऱ्या रमणसिंग यांच्याविरुद्ध त्यांच्याच मंत्रिमंडळातील त्यांचे क्रमांक दोनचे सहकारी
First published on: 27-12-2013 at 02:12 IST
TOPICSरमण सिंह
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh bjp leader brijmohan agarwal target raman singh