भाजपचे आताचे राजकारण पाहता या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाविषयी शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. अनेक पक्षांतून ओवाळून टाकलेल्यांना पदरी घेऊन तत्त्व आदी मुद्दय़ांची पगडी  भाजपने खुंटीवर टांगून ठेवली असून अन्य सत्तालोलुप पक्षांप्रमाणे इतरांना टोप्या घालण्याचा सामुदायिक कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
जनता विद्यमान राजवटीस कंटाळलेली आहे म्हणजे आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा विरोधकांचा समज झालेला दिसतो. गेले जवळपास तीन आठवडे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे मुखंड युती करावी की न करावी, केल्यास किती जागा लढवाव्यात, कोणत्या लढवाव्यात आणि आश्रित अशा विरोधकांना किती द्याव्यात आदी मुद्दय़ांचे दळण दळण्यात मश्गूल आहेत. आपले सरकार जणू येणारच या भम्रात ही मंडळी असून मतदारांना गृहीत धरल्यास काय होते याचा ताज्या पोटनिवडणुकांनी घालून दिलेला धडा शिकण्याची त्यांची इच्छा नाही. आता तर या सत्तातुरांनी आपापल्या दिवंगत आजोबा आणि दिवंगत काकांनाच वेठीला धरत ही युती पुढच्या पिढीकडे नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तेव्हा कु. ठाकरे, कु. तावडे वा कु. फडणवीस अशा शालेय नेत्यांनी महाराष्ट्राच्या भल्याबुऱ्याची चर्चा करण्यास कोणाची हरकत नसावी. तसेही या पक्षांत जे काही सुरू आहे, त्या कथित चच्रेचा स्तर शालेय म्हणावा असाच आहे. तेव्हा या वयाने वाढलेल्या नेत्यांनी चर्चा केली काय आणि त्यांच्या बालवर्गीय नातवंडांनी केली काय, गुणात्मक असा फरक पडण्याची शक्यता फारशी नाही.
एरवी या राजकीय बाललीलांसाठी शिवसेना ओळखली जाते. परंतु २५ वर्षांच्या साहचर्यामुळे ही बाललीलांची व्याधी भाजपलादेखील झालेली दिसते. भाजप या व्याधीने ग्रस्त आणि त्रस्त झाल्याचे अनेक पुरावे मिळतात. यातील पहिला नमुना म्हणजे पंकजा मुंडे. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या. राजकारणातील घराणेशाहीच्या विरोधात धुराळा उडवीत भाजपने राजकारणात आपले बस्तान बसवले. परंतु भाजपनेदेखील पुढे तीच वाट चोखाळली. आपले ते प्रामाणिक राजकारण आणि इतरांची ती घराणेशाही असे मानणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनेदेखील आपापल्या पक्षातील नेत्यांच्या पोराबाळांची व्यवस्था लावून देण्यातच धन्यता मानली. त्यातूनच राजकारणाच्या दलदलीत प्रस्थापितांच्या घरातच या आणि अशा पंकजा उमलल्या. मुंडे यांच्या निधनानंतर या पंकजा चांगल्याच पालवल्या आणि थेट घोडय़ावर बसूनच राजकारणात आल्या. या पंकजांनी गेले काही दिवस म्हणे संघर्ष यात्रा काढली होती. खरे तर हे प्रकरण दखल घ्यावे या लायकीचे नाही. परंतु या निमित्ताने भाजपस जो मंत्रचळ झालेला आहे, तो दाखवून देणे आवश्यक ठरते. तेव्हा प्रश्न असा की या पंकजाबाई कसला संघर्ष करीत आहेत? आणि त्याहूनही महत्त्वाचा मुद्दा हा की हा संघर्ष कोणासाठी? सर्व प्रकारची राजकीय सुखसुविधा भोगून, पंचतारांकित राजकारण करावयाचे आणि वडिलांच्या नावाची सहानुभूती मिळवण्याच्या उचापतीस संघर्ष यात्रा म्हणावयाचे, हा निर्बुद्ध दांभिकपणा झाला. तो या पंकजाबाईंपुरताच झाला असता तर समजण्यासारखे होते. ते त्यांच्यापुरते ठीकच. परंतु भाजपच्या नेत्यांनी त्यात िशगे मोडून नाचायची काही गरज नव्हती. या कथित संघर्ष यात्रेमुळे जणू आपल्या पक्षाचा पुनरुद्धार होणार असल्यासारखे भाजप नेत्यांचे वर्तन होते. त्यामुळे अनेक नेत्यांनी या यात्रेत आपली उपस्थिती लावून दिवंगत मुंडे यांच्या सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. ते एक वेळ समजण्यासारखे. परंतु पंकजा मुंडे यांच्या चक्री संघर्ष यात्रेस टेकू दिल्याने त्यांचे मोठेपण सिद्ध होत नसून भाजपच्या नेत्यांची शालेय पातळीच त्यातून दिसते याचे भान भाजप नेत्यांना राहिले नाही. या पक्षाच्या विनोद तावडे यांनी तर हुच्चपणाचा कहरच केला. या पंकजाताई थेट मुख्यमंत्री होण्याच्याच योग्यतेच्या आहेत, असा साक्षात्कार विनोदभाऊंना संघर्ष यात्रेच्या एका दर्शनानेच झाला. महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्रिपद इतके सहजसाध्य कधी नव्हते. विनोद तावडे यांच्या उदार अंत:करणाच्या दर्शनाने स्वर्गातदेखील मुंडे यांना भरून आले असेल. कदाचित भाजपस सत्ता स्थापनेची संधी मिळालीच तर देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी पंकजाताई मुख्यमंत्रिपदी बऱ्या असा विचार तावडे यांनी केला नसेलच असे नाही. असो. अन्य नेत्यांपकी देवेंद्र फडणवीस यांचा विवेक एरवी सहजासहजी स्थानभ्रष्ट होत नाही. परंतु पंकजाताईंचा सुखासीन संघर्ष पाहून त्यांच्याही विवेकाने दगा देण्यास सुरुवात केली असे म्हणावे लागते. खरे तर फडणवीस यांचाही विवेक घसरू शकतो याची चुणूक मुंडे यांच्या अन्त्यविधीप्रसंगीच आली होती. मुंडे यांच्या पाíथवास अग्नी दिला जात असता ‘परत या, परत या मुंडेसाहेब परत या’ अशा अरविंद सावंती शिवसेनी घोषणा देणाऱ्यांत फडणवीस आघाडीवर होते. ते पाहून अनेकांचा हात आपोआपच कपाळाकडे गेला असेल. आताही पंकजाताईंच्या तारांकित संघर्ष यात्रेने फडणवीस यांना आलेले भारलेपण पाहता अनेकांची हीच भावना झाली असेल.
वास्तविक भाजपचे आताचे राजकारण पाहता या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाविषयी शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे हे मान्य करावे लागेल. गेल्या आठवडय़ात या पक्षाने अर्धा डझन गणंगांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. अनेक पक्षांतून ओवाळून टाकलेल्यांना भाजपने आपल्या पदरी घेऊन पवित्र केले. परंतु त्यातून भाजपची अशा गणंगांची भूक भागली नसावी. कारण त्यानंतर राम कदम, वसंत वाणी, प्रशांत ठाकूर अशा नामांकितांनाही भाजपने आपल्या पक्षात घेतले. नगरपालिकेचा अभियंता असो वा विधिमंडळातील पोलीस कर्मचारी, त्याच्या श्रीमुखास भडकावणे हाच या कदम रामाचा मनसे कार्यक्रम राहिलेला आहे. आपल्या मतदारसंघात हे कदम वा अन्य मंडळी फार काही विधायक कामांसाठी ओळखली जातात असेही नाही. तेव्हा त्यांना आपले म्हणून भाजपने काही गुणात्मक साध्य केले आहे असे नाही. आपल्याकडे नरेंद्र मोदी नावाची निवडणुका जिंकून देणारी जादूची कांडी आहे असा आतापर्यंत भाजपचा दावा होता. तो खरा असेल तर या असल्या भाकडभरतीचा मोह भाजपस होता ना. किंवा अलीकडच्या पोटनिवडणूक निकालांमुळे भाजपचाच या जादूच्या कांडीवरील विश्वास उडाला असावा. असेही असेल की या पलीकडे जाऊन केवळ निवडणूक जिंकणे यालाच महत्त्व द्यावयाचे भाजपने ठरवले असावे. तसे झाल्यास एकेक जागा जिंकणे महत्त्वाचे ठरते. ही राजकीय पक्षांची गरज असते. तेव्हा भाजपने प्रामाणिकपणे ती गरज मान्य करावी आणि अरुण गवळी, पप्पू कलानी, सुरेशदादा जैन आदी उर्वरित मान्यवरांनादेखील आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना पवित्र करावे. नाही तरी या अशा धर्मातरांची सवय भाजपला आहेच. हे राजकीय धर्मातर. ते करावयाचे ठरल्यास लव्ह जिहाद यासारखा चटपटीत शब्दप्रयोग भाजपवाले शोधून काढतीलच.
तेव्हा वास्तव हे की भाजपनेदेखील तत्त्व आदी मुद्दय़ांची पगडी खुंटीवर टांगून ठेवली असून अन्य सत्तालोलुप पक्षांप्रमाणे इतरांना टोप्या घालण्याचा सामुदायिक कार्यक्रम हाती घेतला आहे. तेव्हा या पक्षाचे हे उद्योग पाहून कोणाचीही प्रतिक्रिया उल्लू बनाविंग.. झाल्यास गर ते काय?

Story img Loader