बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथम आणि रिओमध्ये मात्र चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेळाडूंची कामगिरी खालावली तरी चिनी जनतेने मात्र खेळाडूंना दोष न देता याचे खापर तेथील सोयीसुविधा, सदोष पंचगिरी, भोजनव्यवस्था यावर फोडले. लोकांच्या या खिलाडूवृत्तीने सरकारची चिंता मात्र मिटली..
ऑलिम्पिक पदतालिकेतील स्थान हे जागतिक पटलावरील देशाच्या तुलनात्मक शक्तीचे निदर्शक असल्याचा सार्वत्रिक समज आहे. देशातील खेळ-संस्कृती आणि नागरिकांचे एकंदरीत सामाजिक आरोग्य यांच्याशी ऑलिम्पिकमधील यशापयशाचा संबंध जोडण्यात कुणाला फारसे स्वारस्य नसते. त्याऐवजी, देशाचे जागतिक राजकारणातील स्थान ठरवण्याच्या काही ठळक निर्देशांकांमध्ये ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकांचा समावेश असतो. ऑलिम्पिकसारख्या महाकाय स्पर्धाचे आयोजन करण्यात मानण्यात येणारी धन्यतासुद्धा या मानसिकतेचा परिणाम आहे. पाश्चिमात्य भांडवली देशांप्रमाणे आपणसुद्धा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास सक्षम आहोत हे सिद्ध करण्याची स्पर्धा विकसनशील देशांमध्ये लागलेली असते. ही मानसिकता जशी भारतात आहे तशीच चीनमध्येसुद्धा आहे; किंबहुना जागतिक राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या सर्वच देशांमध्ये ही मानसिकता बघावयास मिळते. त्यामुळेच आर्थिक समस्यांनी ग्रस्त ब्राझीलने यंदाचे ऑलिम्पिक यशस्वी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. खरे तर ऑलिम्पिकचे आयोजन ढासळल्याचा किंवा आयोजनात मोठय़ा कमतरता आढळल्याचा एकही दाखला या स्पध्रेच्या इतिहासात सापडत नाही. तरीसुद्धा ऑलिम्पिकचे ‘यशस्वी’ आयोजन हा देशाच्या शिरपेचातील मानाचा तुरा समजला जातो.
सन २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या माध्यमातून चीनने मोठय़ा दिमाखात हा मान मिरवला होता. सन २००८ मध्ये चीनने केवळ ऑलिम्पिकचे आयोजनच केले नव्हते, तर पदकतालिकेत ५१ सुवर्णासह प्रथम क्रमांक पटकावला होता. जागतिक पटलावर सर्वोच्च स्थानाकडे चीनची वाटचाल सुरूझाल्याची ही नांदी असल्याबद्दल चिनी सरकार आणि जनतेत एकमत झाले होते. या पाश्र्वभूमीवर रिओ ऑलिम्पिकमधील चिनी खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथम स्थान आणि सन २०१२ मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये द्वितीय स्थान मिळवल्यानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एवढेच नाही तर दुसरे स्थान तुलनेने अगदीच चिमुकल्या असलेल्या ग्रेट ब्रिटनने पटकावले हे चीनला जास्त बोचले. रिओ इथे ग्रेट ब्रिटनने २७, तर चीनने २६ सुवर्ण जिंकले आहेत. ‘शिन्हुआ’ या चिनी सरकारच्या अधिकृत वृत्तसंस्थेने ‘हा एक विनोद आहे! जो देश आजवर पदकतालिकेत चीनच्या वर कधीच नव्हता तो दुसऱ्या स्थानावर आहे’ असे ट्वीट केले होते. जनतेतून संतप्त पडसाद उमटण्याच्या आधीच सरकारलासुद्धा जे काही घडले ते आवडले नसल्याचे सांगण्याचा हा प्रयत्न होता. चिनी खेळाडूंच्या तुलनेने सुमार झालेल्या कामगिरीचे संतप्त पडसाद उमटतील अशी त्या देशाच्या सरकारला भीती होती, तर चीनच्या विरोधकांना ते अपेक्षित होते. मात्र चीनच्या जनतेने ना सरकारविरुद्ध ब्र काढला ना खेळाडूंना दूषणे दिली. सरकारी यंत्रणांच्या धाकामुळे सरकारविरुद्ध कुणी काही बोलले नाही ही शक्यता गृहीत धरली तरी अपयशी खेळाडूंची सोशल मीडियावर िधड काढणे शक्य होते. मात्र तसे घडले नाही. याउलट चिनी जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंची पाठराखणच केली. लोकांनी दाखवलेल्या या परिपक्वतेने चिनी सरकारला आश्चर्याचा अनपेक्षित धक्का बसला, तर चीनच्या विरोधकांना बुचकळ्यात पाडले. परिणामी, ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्थेने आपले ट्वीट काढूनसुद्धा टाकले.
रिओ ऑलिम्पिक सुरू होण्याच्या एक दिवस आधी आपले खेळाडू ३० ते ३६ सुवर्णपदके सहज जिंकतील असा विश्वास ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारधार्जिण्या वृत्तपत्राने व्यक्त केला होता. मात्र ऑलिम्पिकचा पहिला दिवस चीनसाठी पदकविहीन गेल्यांनतर सर्व सरकारनियंत्रित प्रसारमाध्यमांनी सावध भूमिका घेणे सुरू केले. ‘पदकतालिकेबाबत जनता आश्वस्त’ या मथळ्याखाली बातमी देत ‘ग्लोबल टाइम्स’ने चिनी लोकांच्या (सरकार व खेळाडूंच्या प्रति) सहिष्णुतेचे कौतुक केले. ‘चिनी लोक आता पूर्वीसारखे सुवर्णपदके मिळालीच पाहिजेत यासाठी आसुसलेले नसतात’ असे मत एका क्रीडातज्ज्ञाने या बातमीत व्यक्त केले. एवढेच नाही तर ‘राष्ट्रीय आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून ऑलिम्पिकमध्ये यश मिळालेच पाहिजे, असे आता चीनच्या लोकांना वाटत नाही. मागील काही वर्षांमध्ये चीनचे मागासलेल्या अर्थव्यवस्थेचे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत संक्रमण झाल्याचा हा परिणाम आहे,’ असे मत या तज्ज्ञाने व्यक्त केले. ज्याप्रमाणे अमेरिका किंवा ग्रेट ब्रिटनमध्ये क्रीडा क्षेत्रातील यशापयश राष्ट्रप्रेमाच्या दृष्टिकोनातून कमी आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून जास्त बघितले जाते तशी स्थिती चीनमध्ये निर्माण होते आहे, असे सांगण्याचा प्रयत्न या बातमीद्वारे करण्यात आला.
चीनने सन १९८४च्या लॉस एंजेल्स ऑलिम्पिकद्वारे या स्पध्रेत पुनरागमन केल्यापासूनच सुवर्णपदके जिंकण्यास सुरुवात केली होती. त्या वर्षी चीनने १५ सुवर्णासह चौथे स्थान पटकावले होते. अर्थात तत्कालीन सोव्हिएत गटाने लॉस एंजेल्स ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकल्याचा फायदा चीनला मिळाला होता. सन १९८८च्या दक्षिण कोरियातील सेऊल इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये चीनला केवळ ५ सुवर्णावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यानंतर, म्हणजे सन १९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकपासून, चीनची जागतिक क्रीडाविश्वात घोडदौड सुरू आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, जिमनॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग आणि निशाणेबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये चीनचे वर्चस्व आहे. याशिवाय, या वर्षी व्हॉलीबॉलमध्ये चीनच्या महिला संघाने सुवर्ण जिंकले, जो त्या देशातील क्रीडा रसिकांसाठी सर्वोच्च जल्लोशाचा क्षण ठरला. रिओ ऑलिम्पिकमध्ये चीनने जिंकलेले ते शेवटचे सुवर्ण होते. चीनला रिओ इथे लंडन ऑलिम्पिकपेक्षा १२ सुवर्णपदके कमी मिळाली. चीनच्या क्रीडाप्रेमींनी याचे खापर पंचांनी दिलेल्या ‘चुकीच्या’ निर्णयांवर फोडले. विशेषत: कुस्ती आणि नेमबाजी प्रकारांमध्ये चुकीच्या पंचगिरीने देश सुवर्णाना मुकला, असा टाहो सोशल मीडियावर बघायला मिळाला. याशिवाय, चीनच्या चमूने ऑलिम्पिक ग्राममध्ये अद्ययावत व्यवस्था उपलब्ध नसल्याच्या, बांधकाम ठिसूळ असल्याच्या आणि चिनी चवींचे पदार्थ न मिळाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर टाकल्या होत्या. चिनी प्रेक्षकांनी त्या उचलून धरल्या आणि ऑलिम्पिक समितीच्या गर-व्यवस्थापनाचा परिणाम चिनी खेळाडूंच्या कामगिरीवर झाल्याचा सूर आळवला. चीनच्या सरकारसाठी हे फारच सुखद होते. रिओ इथे उपस्थित चीनच्या केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सरकार खेळाडूंच्या बाजूने भक्कमपणे उभे असल्याचे आणि त्यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे वक्तव्य करत जनतेच्या सुरात सूर मिसळला. चीनच्या ऑलिम्पिक खेळाडूंची एक पिढी आता निवृत्तीच्या मार्गावर असून नवे खेळाडू त्यांची जागा घेत आहेत. या संक्रमण काळाचा परिणाम पदकतालिकेतील चीनच्या स्थानावर झाला, अशा प्रतिक्रियासुद्धा सोशल मीडियावर बघावयास मिळाल्या. ज्या खेळाडूंनी बीजिंग व लंडन येथे उत्तम कामगिरी बजावली होती ते रिओत प्रभावी ठरले नाहीत. याउलट नवोदित चिनी खेळाडूंनी सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली. देशाबाहेर, जागतिक प्रसार माध्यमांपुढे चिनी खेळाडूंनी दर्शवलेली ‘स्मार्ट’ वृत्ती देशातील दर्शकांना भावली. याबाबतीत चिनी खेळाडू अमेरिकी खेळाडूंसारखे वागण्यास शिकले असल्याचा समाधानभाव चिनी लोकांनी व्यक्त केला. आतापर्यंत चीनची सर्वागीण प्रगती साम्यवादी पक्षामुळे होत आली आहे आणि क्रीडा क्षेत्रातील यश त्याला अपवाद नाही असा प्रचार व्यवस्थितपणे राबवण्यात येत होता. प्रगतीचा आलेख चढता होता तोपर्यंत त्याचा फायदा साम्यवादी पक्षाला मिळाला. मात्र अर्थव्यवस्थेप्रमाणे क्रीडा क्षेत्राला ग्रहण लागल्याची चिन्हे असताना या ना त्या कारणाने जनमत साम्यवादी पक्षाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने ती परिस्थिती उत्पन्न झाली असती. लोकांच्या खिलाडूवृत्तीने सध्या तरी चिनी साम्यवादी पक्ष आणि सरकारच्या अंगावर आलेले शिंगावर बेतले आहे.
– परिमल माया सुधाकर
parimalmayasudhakar@gmail.com
लेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.