चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार? चीनने आíथक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. मात्र साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार चिनी समाजात पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.
चीनमध्ये आर्थिक सुधारणांची सुरुवात झाल्यानंतर सामाजिक संरचनेत सर्वाधिक बदल घडलेत; किंबहुना बदलाची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. माओ-काळात चिनी समाज ढोबळमानाने दोन गटांमध्ये रचनाबद्ध झाला होता. माओच्या उत्तरार्धात शेतीच्या सामूहिकीकरणाने एकत्रित झालेला ग्रामीण समाज व त्यांना निर्देश/आदेश देणारी साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची साखळी हा संख्यामानाने सर्वाधिक मोठा गट अस्तित्वात आला होता. कारखान्यांतील कामगार आणि त्यांच्यावर साम्यवादी पक्षाने बसवलेले व्यवस्थापक हा माओच्या धोरणांमुळे अस्तित्वात आलेला दुसरा गट होता. या दुसऱ्या गटाचे अस्तित्व प्रामुख्याने शहरी भागात आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये होते. पहिल्या गटाची प्रमुख जबाबदारी स्वत:सह दुसऱ्या गटासाठी अन्नधान्याचे उत्पादन करणे ही होती. दुसऱ्या गटाच्या दोन जबाबदाऱ्या होत्या. एक तर, चीनसारख्या विशाल देशात मूलभूत भौतिक संरचना उभारण्यासाठी त्यांना औद्योगिक उत्पादन करायचे होते. म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानतळे, बंदरे, सरकारी इमारती, महाविद्यालये व मोठी इस्पितळे बांधण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री त्यांना पुरवायची होती. दुसरे म्हणजे, सर्व बाजूंनी ‘शत्रू देशांनी वेढलेल्या’ चीनच्या संरक्षणासाठी आवश्यक ती सुसज्जता बाळगता यावी यासाठी संशोधन आणि उत्पादन त्यांना करायचे होते. मोबदल्यात चीनच्या राज्यसंस्थेने दोन्ही गटांना शिक्षण आणि मूलभूत आरोग्य सुविधा मिळतील याची तजवीज केली होती. शिवाय, शहरी भागात दुसऱ्या गटासाठी राहण्यासाठी घर आणि निवृत्तीनंतर पेन्शन असे महत्त्वपूर्ण सामाजिक कल्याण कार्यक्रम लागू केले होते.
पहिल्या गटातील किती जणांना दुसऱ्या गटात प्रवेश द्यायचा हे गरजेनुसार राज्यसंस्था निर्धारित करत होती. दोन्ही गटांमध्ये संवाद घडायची शक्यता नव्हती आणि तशी आवश्यकतासुद्धा नव्हती. साम्यवादी पक्ष ही दोन्ही गटांच्या मधोमध उभी असलेली भिंत होती, ज्यावर राज्यसंस्थेचा डोलारा उभा होता. पहिल्या गटाला या भिंतीची एक बाजू दिसायची तर दुसऱ्या गटाला दुसऱ्या बाजूचे दर्शन व्हायचे. साम्यवादी पक्षाला मात्र दोन्ही गटांमध्ये काय घडतंय हे स्पष्ट दिसायचे. सन १९७०च्या मध्यापासून राज्यसंस्थेच्या निदर्शनास येऊ लागले की दोन्ही गट त्यांच्या जबाबदाऱ्यांचे निर्वाहन करण्यात अपुरे ठरत आहेत. माओसह चीनच्या साम्यवादी पक्षातील अनेक नेत्यांना जाणवू लागले की पहिल्या गटात, म्हणजे ग्रामीण जनतेत, प्रचंड असंतोष धुमसतो आहे, ज्यामुळे साम्यवादी पक्षाची भिंत ध्वस्तसुद्धा होऊ शकते. या जाणिवेची परिणती डेंग शियोपगचे नेतृत्व मान्य होण्यात झाली. डेंगने राबवलेल्या आर्थिक सुधारणांनी वर उल्लेखलेल्या दोन्ही गटांतून नवे-नवे प्रवाह तयार झाले आणि चीनच्या सामाजिक संरचनेचे विविधीकरण होऊ लागले.
पहिल्या गटातून सधन व मध्यम वर्गाचे शेतकरी, छोटय़ा उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारा व त्यांचे व्यवस्थापन करणारा वर्ग आणि शेतीत बारमाही रोजगार व पर्याप्त उत्पन्न नसलेला छोटा शेतकरी-शेतमजूर असे तीन मुख्य प्रवाह पुढे आले. यापकी शेवटचा, म्हणजे तिसरा प्रवाह, गरिबी रेषेच्या वर-खाली लोंबकळत आहे. त्याला शहरी, विशेषत: किनारपट्टीच्या भागातील, नव्या उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी मिळाल्यात, पण त्यातून त्याचे शोषणसुद्धा वाढले. माओकालीन दुसऱ्या गटातून नव-उद्योजक व व्यवस्थापकांच्या एका मोठय़ा वर्गाचा उदय झाला. यासोबतच सरकारी उद्योगांमधील आर्थिक सुधारणांमुळे एकीकडे आधीच्या सोयीसुविधांचे छत्र गमावलेले व रोजगाराबाबत असुरक्षित झालेले कामगार आणि दुसरीकडे गच्छंती होऊन बेरोजगार झालेले कामगार अस्तित्वात आले. जे कामगार बेरोजगार झाले त्यांच्यापकी बहुतेक गरिबी रेषेच्या खाली गेलेत. या सर्व प्रक्रियांचा परिणाम म्हणजे चीनमध्ये ठळकपणे ‘आहे रे’ वर्ग आणि ‘नाही रे’ वर्ग अस्तित्वात आले आहेत. ‘आहे रे’ वर्गाचा आर्थिक सुधारणांना आणि म्हणून साम्यवादी पक्षाला, भरघोस पाठबा आहे. ‘नाही रे’ वर्गात परिस्थितीचे आकलन, संघटना आणि नेतृत्व या सगळ्यांचीच वानवा आहे. एकीकडे, संपूर्ण ‘नाही रे’ वर्ग ‘आहे रे’ वर्गाकडे ईष्रेने बघतो, तर दुसरीकडे ‘नाही रे’ वर्गातील गट एकमेकांकडे शत्रुत्वाच्या किंवा संशयाच्या भावनेने बघतात. ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी येणारे शेतमजूर हे सरकारी कारखान्यातून गच्छंती झालेल्या कामगारांचे स्पर्धक असल्यामुळे शत्रू होतात. त्याच वेळी, शहरातील सोयीसुविधांमध्ये त्यांचा वाटा वाढल्याने किंवा वाटा वाढण्याच्या भीतीने अद्याप सरकारी उद्योगांमध्ये कार्यरत कामगार त्यांच्याकडे संशयाने बघतात. साम्यवादी पक्षाच्याच आर्थिक सुधारणांनी तयार झालेल्या ‘नाही रे’ वर्गाने अद्याप उठाव का केला नाही याचे उत्तर या परिस्थितीमध्ये आहे. नजीकच्या भविष्यात या वर्गाचा उद्रेक घडण्याची शक्यता कमीच आहे. चीनमध्ये सार्वत्रिक निवडणुका आणि ‘लोकशाही व्यवस्थेच्या’ स्थापनेची मागणी करणारे छोटे छोटे गट आणि काही विचारवंत आहेत. चीनमधून पाश्चात्त्य देशांमध्ये स्थायिक झालेले काही अभ्यासकसुद्धा या प्रकारची मागणी करत असतात. मात्र त्यांच्यापकी कुणीही ‘नाही रे’ वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडणारी मांडणी करत लोकशाहीची मागणी केलेली नाही. याउलट, ‘नाही रे’ वर्गाच्या उठावाची धास्ती असल्याने साम्यवादी पक्षाने सुनियोजितपणे या वर्गातील विविध गटांमध्ये वैचारिक व संघटनात्मक कार्य हाती घेतले आहे. विविध गटांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर साम्यवादी पक्षाच्या जन-संघटनांमार्फत पुढाकार घेण्याचे पक्षाच्या नेत्यांचे निर्देश आहेत. याशिवाय, अशा कामगारांशी सहानुभूती असणाऱ्या मध्यम वर्गाच्या गरसरकारी संघटनांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षा इत्यादी मुद्दय़ांवर त्यांच्यासोबत काम करण्याची मुभासुद्धा आहे. एकंदरीत, ‘नाही रे’ वर्गातील असंतोष पेट घेणार नाही इतपत काळजी साम्यवादी पक्षातर्फे घेण्यात येत आहे.
चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की, समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार? चीनने आर्थिक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. झालेच तर, साम्यवादी पक्ष संपन्न गटांच्या अधिक संपन्नतेकडील वाटचालीत अडथळा ठरू शकतो. विशेषत: साम्यवादी पक्षाने ‘नाही रे’ गटाची स्थिती सुधारण्यास प्राधान्य दिले तर ते ‘आहे रे’ गटाला न रुचणारे आणि त्यांच्या वर्ग-हिताविरुद्ध जाणारे असेल. यामुळे साम्यवादी पक्षाला दूर सारून राज्यसंस्था हाती घेण्याची महत्त्वाकांक्षा या ‘आहे-रे’ वर्गात निर्माण होऊ शकते. या महत्त्वाकांक्षेला पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठबा मिळणार हे ओघाने आलेच. तत्कालीन सोव्हिएत संघात याच प्रकारची प्रक्रिया घडली होती. मात्र चीनमधील घडामोडींच्या अभ्यासकांचे या प्रकारच्या शक्यतेबाबत एकमत नाही. एक तर चीनमध्ये आर्थिक सुधारणांची प्रक्रिया आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध गटांचे राज्यसंस्थेमार्फत व्यवस्थापन ही प्रक्रिया मागील ३५ वर्षांपासून सुरू आहे. परिणामी, साम्यवादी पक्षाला नव्या सामाजिक गटांचे ज्ञान व आकलन आहे आणि त्यांच्या आकांक्षांना आत्मसात करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया पक्षात सुरू आहे. सोव्हिएत संघात ही संपूर्ण उठाठेव जेमतेम पाच वर्षांत झाली होती. पूर्व युरोपीय देशांप्रमाणे साम्यवादी पक्षाविरुद्ध उठाव होण्यासाठी ज्या नागरी समाजाच्या (सिव्हिल सोसायटी) पुढाकाराची गरज आहे तो चीनमध्ये परिपक्व झालेला नाही, किंबहुना साम्यवादी पक्षाने त्या नागरी समाजालासुद्धा आत्मसात केले आहे. चीनच्याच साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार हा पक्ष म्हणजे चिनी समाजातील रक्तवाहिन्या आहेत. समाजाचा प्रत्येक घटक, प्रत्येक अंग साम्यवादी पक्षाने आतून व्यापलेले आहे. जोपर्यंत रक्त-शुद्धीकरणाची आणि नवे रक्त तयार होण्याची प्रक्रिया अविरत सुरू आहे, चिनी समाजात साम्यवादी पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.
परिमल माया सुधाकर
parimalmayasudhakar@gmail.com