जिआंग झेमिन व हु जिंताव प्रमाणे जिनपिंग यांची मांडणीसुद्धा वैचारिक सिद्धांताऐवजी वैचारिक संकल्पनेच्या श्रेणीत मोडणारी आहे. जगामध्ये समाजवादाचा प्रवास स्वप्नाळू मांडणी ते वैज्ञानिक विचारधारा असा झाला असला तरी, चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा प्रवास मार्क्सवादी विचारधारा ते स्वप्नाळू संकल्पना असा उलटय़ा दिशेने घडत असल्याचे दिसते आहे.
चीनच्या साम्यवादी पक्षाने अलीकडेच एका अधिकृत वक्तव्यात पक्षाचे महासचिव आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांचा कोअर लीडर, म्हणजे केंद्रवर्ती नेतृत्व, असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ असा की चीनच्या राज्यघटनेत जिनिपग यांनी केलेल्या चिनी स्वप्नांच्या मांडणीला लवकरच स्थान देण्यात येईल आणि त्यांची गणना देशाच्या आतापर्यंतच्या महान नेत्यांमध्ये केली जाईल. माओ त्से तुंगच्या काळापासून, राज्यव्यवस्थेची वैचारिक चौकट म्हणून नेत्यांनी मांडलेल्या विचारांचा राज्यघटनेत विशेष उल्लेख करण्यात येतो. चीनमधील ही प्रथा एकीकडे तेथील साम्यवादी पक्षासाठीचे विचारधारेचे महत्त्व अधोरेखित करते, तर दुसरीकडे यातून वैचारिक चौकटीतील सातत्य दर्शवण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात मार्क्स ते जिनिपग यांचे सद्धांतिक उल्लेख चीनच्या साम्यवादी पक्षाच्या वैचारिक चौकटीत सातत्याने होत असलेले बदल दर्शवतात. चीनमध्ये समाजवादी गणराज्याच्या स्थापनेनंतर निर्मिलेल्या राज्यघटनेत राज्यसंस्था ‘मार्क्सवादी-लेनिनवादी तत्त्वज्ञानावर आधारित समाज स्थापनेसाठी प्रयत्नशील असेल’ असे सांगण्यात आले होते. त्यानंतर माओ ने त्यात दुरुस्ती करत वैचारिक चौकटीचा ‘मार्क्सवाद-लेनिनवाद-माओ त्से तुंगचे विचार’ असा विस्तार केला. चीनमधील समाजवाद सोविएत युनियनपेक्षा वेगळा असेल आणि तो माओने मार्क्सवादाचा जो अर्थ लावला आहे त्यानुसार असेल याचे सूतोवाच माओने केले होते. समाजवादी शासन यंत्रणेच्या उभारणीला महत्त्व न देता लोकांच्या राजकीय चेतनेला सातत्याने उभारी देणे आवश्यक आहे असे माओचे म्हणणे होते. म्हणजे राजकीय विचाराला प्राधान्य हा माओचा आग्रह होता.
माओनंतर चीनचे सर्वोच्च नेतेपद प्राप्त झालेल्या डेंग शिओिपग याने ‘इकॉनॉमिक्स इन कमांड’ या सिद्धांताचा पुरस्कार केला. माओच्या उत्तरार्धात त्याचे मार्क्सवादाचे आकलन अतिरंजित (आणि स्वप्नाळू) झाले होते असा आरोप करत डेंगने ‘वस्तुस्थितीमधून सत्य शोधले पाहिजे’ असे सांगितले. प्रत्यक्ष आचरणात आणता येतील असे सिद्धांत मांडले पाहिजेत, म्हणजेच सिद्धांत व आचरण यांचा मेळ बसला पाहिजे असा डेंग याचा आग्रह होता. ‘समाजवाद म्हणजे सर्वानी गरीब राहायचे असे मुळीच नाही’ असे सांगत डेंगने ‘आधी काही जण श्रीमंत झाले तरी हरकत नाही’ अशी रोखठोक भूमिका घेतली. गरिबी दूर करण्यासाठी उत्पादन वाढवण्याचे आणि त्यासाठी प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे डेंगने रुजवले. प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि उत्पादन व्यवस्थापन प्रणाली खासगी क्षेत्रात विकसित होत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे हे त्यांनी साम्यवादी पक्षाला पटवून दिले. उंदीर पकडणारे मांजर काळे की पांढरे हे महत्त्वाचे नाही, मांजराने उंदीर पकडला पाहिजे असे डेंग याचे स्पष्ट मत होते. ‘प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे वास्तविक विश्लेषण करत विकासाचा आराखडा निर्धारित करणे’ हे मार्क्सवादाचे मूलभूत तत्त्व असल्याची मांडणी डेंग याने केली. डेंगच्या या विचारांना अधिकृत मान्यता देण्यासाठी साम्यवादी पक्षाने सन १९८२ मध्ये राज्यव्यवस्थेच्या वैचारिक चौकटीत ‘डेंग शिओिपगचे सिद्धांत’ अंतर्भूत केले. माओच्या सांस्कृतिक क्रांतीने चीनला आलेले आíथक मागासलेपण दूर करण्यासाठी डेंगने ‘चार आधुनिकीकरणाचा’ धडक कार्यक्रम राबवला. डेंगने चीनच्या आíथक विकासासाठी शेती, उद्योगधंदे, राष्ट्रीय सुरक्षा आणि विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांचे आधुनिकीकरण करण्याचा सपाटा लावला. ‘चिनी वैशिष्टय़ासह समाजवाद’ आणि ‘समाजवादी बाजारपेठ’ हे सिद्धांत डेंगच्या नेतृत्वात साम्यवादी पक्षाने राबवले.
चीनमध्ये माओ ते डेंग हे संक्रमण प्रचंड उलथापालथीत घडले होते. याची पुनरावृत्ती होऊ नये याची व्यवस्थित काळजी डेंगने घेतली होती. सन १९९२ मध्ये डेंगच्या आशीर्वादाने जिआंग झेमिनला पक्षाचे सर्वोच्च पद प्राप्त झाले. डेंगच्या निधनानंतर जिआंग झेमिनने स्वत:चे प्रशासकीय व वैचारिक वर्चस्व प्रस्थापित केले. यासाठी जिआंगने ‘थ्री रेप्रेझेंट्स’ शीर्षकाखाली चीनच्या पुढील वाटचालीचा सिद्धांत मांडला. सन २००२ मध्ये या सिद्धांताला चीनच्या राज्यघटनेत स्थान देण्यात आले. मात्र जिआंगचा सिद्धांत मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरणारा नसल्याचे सांगत चीनबाहेरील मार्क्सवादी तत्त्ववेत्त्यांनी त्यावर प्रखर टीका केली. ‘थ्री रेप्रेझेंट्स’ विचारधारा नसून तीन वेगवेगळ्या संकल्पनांचे कडबोळे असल्याचे म्हटले गेले. यानुसार, चीनच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढील तीन बाबींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. एक, प्रगत उत्पादक शक्ती; दोन, चीनच्या प्रगत संस्कृतीला मार्गबद्ध करणे आणि तीन, चीनमधील बहुसंख्य लोकांच्या मूलभूत हितांचे रक्षण व संवर्धन करणे. ‘बहुसंख्य लोकांच्या हितांना’ प्राधान्य देण्याची स्पष्ट भाषा वापरणे म्हणजे समाजातील काही घटकांना दुर्लक्षण्याचे सूतोवाच करणे होते. माओच्या काळात याचा अर्थ व्यापारी व खासगी उत्पादक क्षमतेचे धनी यांना वगळण्यात आले असा लागला असता. मात्र जिआंगच्या काळात परिस्थिती पूर्ण बदलली होती. समाजातील ‘भांडवली घटकांसाठी’ प्रत्यक्ष साम्यवादी पक्षाची कवाडे खुली झाली होती. म्हणजे जिआंगला ज्यांच्या हितांकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नव्हते ते व्यापारी किंवा उद्योगपती नव्हते. याचा अर्थ ते दुर्लक्षित घटक एक तर वांशिक अल्पसंख्याक होते किंवा चीनच्या अचंबित करणाऱ्या औद्योगिक विकासात इंधन म्हणून उपयोगात येणारे असंघटित कामगार होते.
जिआंगनंतर साम्यवादी पक्ष व चीनची धुरा सांभाळणारे हु जिंताव यांना चीनमधील विषमता आणि औद्योगिक विकासात अंतर्भूत असणाऱ्या शोषणाची दखल घ्यावी लागली. हु जिंतावने ‘विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा’ पुरस्कार करत ‘शांती आणि संगत’ या दोन तत्त्वांवर आधारित प्रगती साध्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. हु जिंतावने मांडलेली संकल्पना अनेक अर्थाने महत्त्वाची होती. चीनच्या विविध समाज घटकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाची यात दखल घेण्यात आली होती. आíथक सुधारणांमुळे चीनमध्ये एकीकडे प्रादेशिक असमतोल निर्माण झाला आहे तर दुसरीकडे आíथक वर्गाची मजबूत पुनर्बाधणी झाली आहे या आरोपांना हु जिंताव यांच्या संकल्पनेने पुष्टी मिळाली. याशिवाय, विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याकडे लक्ष न दिल्याने चीनच्या नसíगक साधन संपत्तीची आणि एकूणच पर्यावरणाची अपरिमित हानी झाल्याची अप्रत्यक्ष कबुली या संकल्पनेच्या माध्यमातून देण्यात आली होती. भविष्यातील वाटचालीत समाज व पर्यावरण, चीनमधील सर्व प्रांत आणि समाजातील विविध घटक यांच्यात संतुलन, समानता व सहयोग प्रस्थापित करण्याची आवश्यकता हु जिंताव यांनी संकल्पित केली. या पाश्र्वभूमीवर सन २०१२ मध्ये सत्तेत आलेले क्षी जिनिपग चीनच्या पुढील मार्गक्रमणासाठी नवी मांडणी करतील हे अपेक्षितच होते. मात्र त्यांचा ‘चिनी स्वप्नपूर्तीचा’ आराखडा अद्याप धूसर आहे. अर्थव्यवस्थेला निर्यात केंद्रित न ठेवता चीनमधील ग्राहकांची क्रयशक्ती वाढवायची; चीनमधील प्रत्येक कुटुंबाला किमान ‘मध्यम वर्गाच्या’ पातळीवर आणायचे; आणि ‘बेल्ट व रोड संकल्पनेतून’ जागतिक अर्थव्यवस्थेला ‘चीनकेंद्रित’ करायचे या तीन ढोबळ उद्दिष्टांची साध्यता म्हणजे जिनिपग यांना अपेक्षित असलेली स्वप्नपूर्ती असे म्हणता येईल. मात्र जिआंग झेमिन व हु जिंताव प्रमाणे त्यांची मांडणीसुद्धा वैचारिक सिद्धांताऐवजी वैचारिक संकल्पनेच्या श्रेणीत मोडणारी आहे. जगामध्ये समाजवादाचा प्रवास स्वप्नाळू मांडणी ते वैज्ञानिक विचारधारा असा झाला असला तरी, चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा प्रवास मार्क्सवादी विचारधारा ते स्वप्नाळू संकल्पना असा उलटय़ा दिशेने घडत असल्याचे दिसते आहे.
परिमल माया सुधाकर
parimalmayasudhakar@gmail.com