गेल्या ८ मार्चच्या पहाटे जणू हवेत विरून गेलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचे गूढ अखेर उकलले. म्हणजे त्या विमानाचे नेमके काय झाले, हे समजले. क्वालालम्पूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बीजिंगच्या दिशेने झेपावलेल्या या विमानाच्या गायब होण्यामागे अपहरणापासून दहशतवादी हल्ल्यापर्यंत विविध शक्यता वर्तविण्यात येत होत्या. मात्र मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्या म्हणण्यानुसार या विमानास अपघात झाला आणि ते हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात कोसळले. विमानात २२७ प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. त्या सर्वाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. गेले १६ दिवस या विमानाचा पत्ताच लागत नसल्याने या सर्वाच्या नातेवाइकांच्या मनात कोठे तरी अंधूकशी आशा तेवत होती. रझाक यांच्या घोषणेमुळे ती उलघाल संपली असेल. परंतु आता प्रश्न निर्माण झाला आहे तो रझाक यांनी कशाच्या आधारे ही घोषणा केली? त्यांच्या म्हणण्यानुसार इन्मारसॅट या ब्रिटिश कंपनीने पुरविलेल्या उपग्रहीय माहितीच्या सखोल विश्लेषणातून ही बाब निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत हे विमान कोणत्या दिशेने गेले हेच नक्की होत नसल्याने त्याचा शोध तरी कुठे घ्यायचा, हा प्रश्नच होता. पण इन्मारसॅटने दिलेल्या माहितीमुळे ते आता नक्की झाले आहे. हिंदी महासागराच्या दक्षिण भागात आता शोधमोहीम केंद्रित करता येईल. चीनचा मात्र मलेशियाने काढलेल्या निष्कर्षांवर शंभर टक्के विश्वास बसल्याचे दिसत नाही. हा निष्कर्ष ज्या माहितीच्या आधारे काढला, तिचे नीट विश्लेषण केल्याशिवाय ते मान्य करण्यास चीनची तयारी नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तसे स्पष्ट केले आहे. यामागे चीनची आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबतची काळजी किती आणि राजकारण किती हे समजण्यास मार्ग नाही. मात्र मलेशिया आणि चीनमधील सध्याचे संबंध लक्षात घेता, या दुर्घटनेचा वापर मलेशियावर दबाव आणण्यासाठी चीन करणारच नाही, असे म्हणता येणार नाही. मलेशिया आपल्याकडील माहिती देत नाही, असा आरोप चीनने यापूर्वीच करून टाकला होता. वस्तुत: हे विमान गायब झाल्यानंतरची विविध देशांची प्रतिक्रिया ही मानवतावादीच होती. तब्बल २६ देश या ना त्या प्रकारे या विमानाच्या शोधासाठी झटत होते. एक विमान रडारवरून अचानक गायब व्हावे आणि अत्याधुनिक यंत्रांनाही त्याचा थांगपत्ता लागू नये हे जणू आपणांस, आपल्या प्रगतीस मिळालेले आव्हान आहे अशा पद्धतीने या देशांच्या विविध यंत्रणा या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. आपापली विमाने, युद्धनौका, उपग्रह यांचा वापर, त्यावरील खर्चाकडे लक्ष न देता, याकामी करण्यात येत होता. मानवता आणि सहकार्य हीच भावना त्यात होती. मलेशिया आपल्याकडील माहिती देत नाही, असे चिनी नेते म्हणत असले तरी मलेशियाच्या म्हणण्यानुसार त्यात अजिबात तथ्य नाही. उलट आमच्यासाठी या विमानाचा शोध ही एवढी महत्त्वाची गोष्ट आहे, की त्याकरिता आपल्या राष्ट्रीय सुरक्षेस बाधा येऊ शकेल, अशा प्रकारची माहितीही आपण दिलेली आहे, असे मलेशियाचे म्हणणे आहे. तेव्हा चीनच्या राष्ट्रीय चारित्र्यास धरूनच हा कांगावखोरपणा आहे, असे म्हणता येईल. हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले हे आता जाहीर करण्यात आले असले, तरी ते कशाने झाले हे गूढ मात्र कायमच आहे. प्रत्यक्षात त्या विमानाचे अवशेष आणि मुख्य म्हणजे त्याचे ‘ब्लॅक बॉक्स’ सापडेपर्यंत ते उकलणारही नाही. तोपर्यंत त्याचा शोध घेण्याचा निर्धार चीनने व्यक्त केला आहे. यानिमित्ताने मलेशियाला कोंडीत पकडण्याची आयतीच संधी चीनला मिळाली आहे. चीन ती दवडील अशी शक्यता नाही.

Story img Loader