मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपातीचा सपाटा लावला; परंतु मालमत्तेस उठाव नाही, औद्योगिक उत्पादनांची विक्री नाही आणि भांडवलदार अंतर्गत कर्जाने बेजार ही स्थिती त्यामुळे रोखली गेलीच नाही.. असे चीनमध्ये घडले आणि घसरण सुरू झाली. ती सुरूच राहणे जगाच्या दृष्टीने चिंतेचे आहे..
जागतिक अर्थव्यवस्थेचे आज कधी नाही इतके लक्ष चीनकडे आहे. याचे कारण गेल्या महिन्यातील चीनच्या कामगिरीची आकडेवारी प्रकाशित झाली असून तीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाच घोर लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले वर्षभर चीनची बाजारपेठ तप्त होती. या काळात शांघाय आणि त्याच्याशी संबंधित शेंघेन भांडवली बाजाराच्या निर्देशांकांत जवळपास १२६ टक्के आणि ९६ टक्के इतकी वाढ झाली. या चिनी आनंदात अर्थ निरीक्षक न्हाऊन निघत असताना त्या महादेशाच्या मे महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली आणि सगळ्यांच्या माना पडू लागल्या. एप्रिल महिन्यात चीनचा सेवा क्षेत्रासाठीचा हा निर्देशांक ५३.४ होता. मे महिन्यात तो ५३.२ इतका खाली आला. वरवर पाहता ही घसरण क्षुल्लक वाटली तरी चिनी अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता ती प्रचंड आहे. चीनमध्ये पच्रेसिंग मॅनेजर्स इंडेक्स नावाने ओळखला जाणारा हा निर्देशांक दरमहा प्रसृत केला जातो आणि तो किमान ५० वा वर असणे हे अर्थव्यवस्थेत धुगधुगी असल्याचे मानले जाते. हा निर्देशांक ५० टक्क्यांपेक्षा खाली घसरला तर ते अर्थव्यवस्थेचे आकुंचन दर्शवते. हा निर्देशांक गेले सलग तीन महिने घसरत असून ही घसरण कमी असली तरी ती रोखता आलेली नाही. परिणामी तो आणखी किती घसरणार या प्रश्नाने समस्तांना घेरलेले आहे. हे झाले सेवा क्षेत्राच्या निर्देशांकाचे. औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकाचीही अशीच परिस्थिती आहे. तो एप्रिल महिन्यात ५०.१ इतका होता. मे महिन्यात तो ५०.२ इतका वाढला. याचा अर्थ औद्योगिक उत्पादनात या काळात वाढ झाली असे नाही. हे कमी म्हणून की काय चीनच्या निर्यातीने या काळात नांगी टाकली आणि जवळपास १० टक्क्यांनी ती कमी झाली. आता इतके सगळे साचून आल्यावर भांडवली बाजार टिकून राहता तरच नवल.
तेव्हा या चिंता वाढवणाऱ्या आकडेवारीमुळे भांडवली बाजारातही एकदम घबराट पसरली आणि चीनचे दोन महत्त्वाचे बाजार कोसळले. गेल्या आठवडय़ाभरात हे दोन बाजार इतके गडगडले की त्यामुळे गुंतवणूकदारांचे ३५,००० कोटी डॉलर धुतले गेले. ही घसरण काळजी वाढवणारी आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात चीनचे माजी अध्यक्ष हु जिंताव यांच्या काळच्या घसरणीची आठवण जागी झाली. त्यांच्या काळात २००७ सालातील ३० मे याच दिवशी हे दोन बाजार कोसळले होते. त्या वेळी या गडगडण्यामागे कारण होते ते जिंताव यांनी भांडवली बाजारातील उलाढालीवर केलेली जवळपास ३०० टक्क्यांची करवाढ. त्यामुळे त्या वेळी भांडवली बाजाराचे कंबरडेच मोडले गेले. त्या वेळी बाजारपेठेस सावरण्यास पुढचे पाच महिने संघर्ष करावा लागला. याही वेळी आता तसेच होणार का, या प्रश्नाने भांडवली बाजारांना घेरले असून परिणामी हा बाजार उभारी धरण्याच्या मन:स्थितीत नाही. याचा फटका प्रचंड प्रमाणावर गुंतवणूकदारांना बसला आहे. याचे कारण गेल्या चार वर्षांत जितके गुंतवणूकदार या बाजारात आले नाहीत तितके या एकाच वर्षांत आले आहेत. ही संख्या साधारण तीन कोटी इतकी आहे. आता हे सगळेच डोक्याला हात लावून बसले असून त्यांचे मनोबल वाढेल अशी परिस्थिती अद्याप तरी अर्थक्षितिजावर नाही. गेल्या वर्षभरात या दोन चिनी भांडवल बाजारातील उलाढालीने न्यूयॉर्क बाजारालाही काही काळ मागे टाकले. परंतु आता या सगळ्याचा हिरमोड होतो की काय, अशी परिस्थिती आहे. हे वातावरण लक्षात घेता चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर कपातीचा सपाटा लावला आहे. गेल्याच महिन्यात पीपल्स बँक ऑफ चायनाने आपली सहा महिन्यांतील तिसरी व्याज दर कपात जाहीर केली. हेतू हा की अर्थव्यवस्थेला गती यावी, मालाला उठाव यावा आणि एकूणच गुंतवणूक चक्र पुन्हा फिरू लागावे. परंतु यातील काहीही करण्याच्या मन:स्थितीत चिनी गुंतवणूकदार नाही. म्हणजे मालमत्तेस उठाव नाही, औद्योगिक उत्पादनांची विक्री नाही आणि भांडवलदार अंतर्गत कर्जाने बेजार असा हा प्रकार आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून २०१४ सालच्या ७.४ टक्के इतक्या विकास दराच्या तुलनेत चीनचा यंदाचा विकासदर ७ टक्क्यांवर घसरेल असा अंदाज व्यक्त होत आहे. तसे झाल्यास चीनचा हा पाव शतकातील नीचांकी विकास दर असेल.
आपणही दखल घ्यावी अशी ही बाब. वेगाने विस्तारणाऱ्या चिनी अर्थव्यवस्थेने गेल्या दोन दशकांत मोठय़ा प्रमाणावर मध्यमवर्गाचा विस्तार केला. या काळात चीनने औद्योगिक उत्पादन क्षमतेत राक्षसी म्हणावी अशी वाढ केली. इतकी की ज्या वेळी २००८ साली चीनने ऑलिम्पिक्स सामने भरवले त्या वेळी जगात तयार होणारा पोलादाचा कण न् कण चीनने शोषून घेतला. त्या काळात जवळपास ४२०० कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक चीनने खेळ सोयीसुविधा निर्मितीत खर्च केली. त्या वेळी पोलाद असो वा तांबे वा अन्य कोणता घटक. त्याच्या किमती चीनच्या भूमिकेवर अवलंबून राहत. ही महाप्रचंड उभारणी आणि सामन्यांच्या यशस्वितेसाठी केला गेलेला तितकाच प्रचंड खर्च यामुळे चीनमध्ये कारखान्यांची क्षमता मोठय़ा प्रमाणावर वाढत गेली. त्या वेळच्या राज्यकर्त्यांचा हेतू हा की चार पसे खुळखुळू लागलेल्या मध्यमवर्गास या वाढत्या औद्योगिक उत्पादनाची साथ मिळाल्यास या उत्पादनांसाठी देशांतर्गतच बाजारपेठ तयार होईल. परिणामी चीनला अर्थव्यवस्था विस्तारासाठी पूर्णत: निर्यातीवरच अवलंबून राहावे लागणार नाही. हा अंदाज चुकला. त्यामुळे कारखान्यांची क्षमता तर वाढली, बाजारपेठा औद्योगिक उत्पादनांनी फुलून गेल्या. परंतु त्यास उठावच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. सोप्या भाषेत यास मंदी असे म्हणतात. परंतु तशी ती आली असे अद्याप अधिकृतपणे मानले जात नसून त्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. म्हणूनच चिनी अर्थव्यवस्थेचा फुगा जरा जास्तच फुगला असे अद्यापही मानले जात नसून या परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा बाळगली जात आहे. याचे कारण चीनने गेल्या काही वर्षांत जगाच्या औद्योगिक गतीचे इंजिन असणाऱ्या अमेरिकेशीच स्पर्धा सुरू केली असून हे इंजिन बंद पडू नये, अशीच सगळ्यांची इच्छा आणि प्रार्थना आहे.
तसे ते पडले तर जगाची अर्थव्यवस्था मटकन बसल्याशिवाय राहणार नाही. चिनी अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड आहे आणि त्याची आपणास हवी तितकी कल्पना आहे. भारतातील समस्त बँका जरी एकत्र केल्या तरी त्या एका बँक ऑफ चायनाचादेखील मुकाबला करू शकणार नाहीत. संपूर्ण भारताचे एकंदर पोलाद उत्पादन पाच कोटी टन इतके आहे. परंतु चीनमध्ये १३ पोलाद कंपन्या अशा आहेत की त्यांची क्षमता संपूर्ण भारतीय पोलाद कारखान्यांपेक्षा अधिक आहे. या दोन उदाहरणांवरून चिनी अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात यावा. तेव्हा अशा परिस्थितीत चीनच्या उदाहरणावरून आपण बरेच काही शिकण्यासारखे आहे. तसे शिकणार असू तर त्यातील सर्वात मोठा धडा असेल तो देशांतर्गत बाजारपेठा, क्रयशक्ती आणि त्या जोडीने उत्पादन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न करण्याचा. त्यासाठी गरज- आणि प्रतीक्षाही- आहे ती आर्थिक सुधारणांची. १९९१ पर्यंत आपल्या मागे असलेला चीन आज आपल्या किती तरी पुढे गेला तो केवळ या सुधारणांमुळे. चीनचा हा ड्रॅगन तूर्त डगमगत असला तरी तो ड्रॅगन आहे, याचे विस्मरण होऊन चालणार नाही.