आज चीनमध्ये या युद्धाबाबत फारसे बोलले जात नाही. ती एक घटना होऊन गेली, एवढेच त्याला महत्त्व आहे. मात्र दोन्ही राष्ट्रांचे संबंध बोलणी करूनच सुधारू शकतात याला चीन बांधील आहे. चीनच्या परराष्ट्रीय धोरणात एक आक्रमकता जाणवते ती आर्थिक बळाच्या आधारे. त्याचप्रमाणे आपला ऐतिहासिक वारसा सिद्ध करण्याच्या गरजेपोटी. दक्षिण चीन समुद्राबाबत किंवा शेजारी राष्ट्रांबाबतची धोरणे याचाच भाग आहेत.
चीनचा जागतिक दृष्टिकोन काय आहे? चिनी अभ्यासक किंवा चीनमधील सर्वसामान्य जनता चीनकडे कशी बघते? त्यांच्या दृष्टिकोनातून भारताकडे कसे पाहिले जाते? त्यांच्याकडील आजच्या समस्या कोणत्या आहेत? आज माओचे किती महत्त्व आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत चीनमधील एक ज्येष्ठ अभ्यासक आणि ग्वांगझू येथील विद्यापीठात ‘चिंडिया’ (चीन व भारत) विभागाचे प्रमुख जिया हाइतो सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्याशी झालेल्या वार्तालापातून त्यात काही अधिकृत तर काही खासगी गप्पा ‘चीनला समजून घ्या’ हा त्यांचा प्रयत्न आहे हे जाणवते.
ओबामा यांची भारत-भेट म्हणजे चीनला दिलेला इशारा होता का, त्यानंतर लगेचच सुषमा स्वराज यांचे चीनला जाणे आणि येत्या मे महिन्यात मोदींच्या भेटीची तारीख निश्चित करणे या पाश्र्वभूमीवर जिया हाइतो यांनी सांगितलेल्या आणि न सांगता काही सूचित केलेल्या चीनच्या दृष्टिकोनाकडे बघण्याची गरज आहे.
संस्कृती
आपल्या चार हजार वर्षांपासूनच्या इतिहास व संस्कृतीबाबत गर्व असलेली ही जनता आहे. हा इतिहास म्हणजे एकाच हान वंशाच्या लोकांच्या अखंडित राजवटीचा इतिहास आहे, हे ते सांगतात. आजदेखील चीनची ९० टक्के प्रजा ही हान वांशिक सजातीय आहे. चीनच्या या संस्कृतीला पहिले आव्हान १८४२ च्या अफू युद्धा (Opium War) नंतर झाले. तिथपासून चीनची उतरती कळा सुरू होते. १८४२ पासून १९४९ च्या कम्युनिस्ट क्रांतीचा कालखंड हा वसाहतवादी तसेच बाह्य़ आक्रमणांचा सामना करण्यात गेला.
१९४९ मध्ये चीन हा एक स्वतंत्र क्रांतिकारी राष्ट्र म्हणून जगासमोर येतो, परंतु तो कालखंड हा चीनच्या दृष्टीने अत्यंत बिकट होता. १९४९ नंतरच्या काळातील सोव्हिएत रशिया व चीन यांच्यातील बंधुत्वाबाबत आपण ऐकतो. या दोन कम्युनिस्ट राष्ट्रांच्या दरम्यानचे लष्करी करार, आर्थिक सहकार्य याबाबतदेखील बोलले जाते. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. स्टॅलिनने चीनवर टाकलेल्या दबावामुळे चीनला कोरियन युद्धात सहभागी व्हावे लागले. या शीतयुद्धाच्या काळात या दोन्ही देशांचे संबंध मैत्रीचे नव्हते, तर चीन हा सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली होता. स्टॅलिनपेक्षा क्रुश्चेव्हची धोरणे अधिक घातक होती. १९५० च्या दशकात तैवानशी झालेल्या संघर्षांत तसे भारताबरोबर अक्साई चीनमधील चकमकीबाबत सोव्हिएत रशियाने चीनला पाठिंबा दिला नव्हता. पुढे १९६० च्या दशकात दोघांमध्ये सीमेवर चकमकीदेखील झाल्या.
भारत
याच कालखंडात भारताबरोबर सीमेबाबत तसेच तिबेटबाबत वाद पुढे आले. तिबेट हा चीनचा भाग आहे हे एक ऐतिहासिक सत्य आहे. तिबेट स्वायत्त होते, स्वतंत्र कधीच नव्हते. १९५४ मध्ये भारताने हे अधिकृतपणे मान्य केले. (भारतात या तिबेटबाबतच्या कराराचा उल्लेख ‘पंचशील करार’ म्हणून केला जातो). म्हणूनच भारताचा तिबेटबाबत, विशेषत: दलाई लामांबाबतच्या भूमिकेबाबत चीनमध्ये असंतोष आहे. सिक्कीम भारतात विलीन झाले, याला सुरुवातीला चीनने मान्यता दिली नव्हती. मध्यंतरी जेव्हा ही मान्यता दिल्याचे संकेत दिले, तेव्हा भारतीय वृत्तसंस्थांनी त्याचे वर्णन ‘देवाण-घेवाण’ म्हणून केले. भारताने तिबेट हा चीनचा प्रांत आहे हे मान्य केल्यामुळे चीनने सिक्कीमबाबत भूमिका बदलली असे सांगण्यात आले. हाइतो यांनी या विचारांवर आक्षेप घेतला. कारण भारताने तिबेट चीनचा भाग आहे, हे १९५४ मध्येच मान्य केले होते.
१९६२ च्या युद्धाबाबत हाइतो काही गोष्टींबाबत स्पष्ट भूमिका घेतात. १९१४ चा सिमला करार हा चीनने कधीच मान्य केला नव्हता. म्हणून चीनने त्या करारानुसार आखलेल्या मॅकमोहन रेषेला मान्यता देण्याचा प्रश्न नव्हता. अक्साई चीनचा प्रदेश १९५४ पर्यंत भारतीय नकाशांमध्ये भारताचा दाखविला गेला नव्हता, तर त्या क्षेत्रामध्ये सीमारेषा आखल्या गेल्या नाहीत असा उल्लेख होता. हा प्रदेश तिबेटचा भाग आहे म्हणून तो चीनचाच आहे, ही चीनची भूमिका आहे. १९५४ मध्ये भारताने ही सीमारेषा नव्याने आखली. अशा परिस्थितीत अक्साई चीनमध्ये चिनी ‘घुसखोरी’ होते हे भारताचे विधान योग्य वाटत नाही. १९६२ मध्ये चीनने युद्ध का सुरू केले या प्रश्नाचे उत्तर हाइतो यांनी टाळले. मात्र त्या वेळची चीनची अंतर्गत परिस्थिती पाहिली, तर चीन युद्ध करणे शक्य नव्हते असे ते सांगतात. एकीकडे अमेरिकेशी उघडउघड वैर, तैवानमधील अनिर्णीत प्रश्न, सोव्हिएत रशियाशी तणावपूर्ण संबंध आणि दुसरीकडे १९५९ नंतर चीनमध्ये असलेला भयानक दुष्काळ या परिस्थितीत चीन युद्धाचा विचार कसा करील, असा उलट प्रश्न केला गेला. आज चीनमध्ये या युद्धाबाबत फारसे बोलले जात नाही. ती एक घटना होऊन गेली, एवढेच त्याला महत्त्व आहे. मात्र दोन्ही राष्ट्रांचे संबंध बोलणी करूनच सुधारू शकतात याला चीन बांधील आहे.
डेंग जियाओपिंग
१९७९ ते १९८९ ही वर्षे चीनसाठी कदाचित सर्वात चांगली होती. हा माओनंतरचा कालखंड होता. माओवादी अधिकारशाहीपासून सुटका झाल्याचा आनंद होता. भीतीचे दडपण कमी झाल्याची जाणीव होती आणि प्रथमच चीनमध्ये आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता दिसू लागली होती. माओंच्या विचारांविरुद्ध उघडपणे बोलायचे नाही. माओवादाचे पांघरूण अजूनही घ्यायचे, परंतु प्रत्यक्षात उदारमतवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था चालवायची हे डेंग जियाओपिंग यांचे धोरण होते. या कालखंडात चीनबाबतचे जागतिक पातळीवरील जनमत सकारात्मक होताना दिसून आले. चीन जागतिक राजकारणात सक्रिय होताना दिसून येतो.
चीनच्या या प्रतिमेस धक्का बसला तो तियानामेन चौकातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरुद्ध केलेल्या कारवाईचा. त्या आंदोलनाविरुद्ध लष्करी बळाचा वापर करण्याची कदाचित गरज नव्हती हा सूर आज दिसून येतो. म्हणूनच हाँगकाँगमधील नुकत्याच झालेल्या आंदोलनाविरुद्ध कारवाई करताना काळजी घेतली गेली होती.
आज सोव्हिएत विघटनानंतरच्या कालखंडात चीनमध्ये एक वेगळा आत्मविश्वास जाणवतो. अंतर्गत राजकारणात कम्युनिस्ट पक्षाची पकड अजूनही कायम आहे. ‘जनमत’ या संकल्पनेला चीनमध्ये मर्यादित अर्थ आहे. कारण मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि माध्यमे मर्यादित आहेत. आज चीनला इस्लामिक दहशतवाद जाणवू लागला आहे; तसेच ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याची जाणीव आहे. या दोन्ही गोष्टींबाबतची चिंता हाइतोंकडून अत्यंत सावधपणे व्यक्त करण्यात आली. हान वांशिक जनतेत बौद्ध धर्मीयांचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. चीनमध्ये आज सर्वसामान्य जनतेमध्ये धर्माबाबत आस्था आहे.
परराष्ट्रीय धोरणात एक आक्रमकता जाणवते ती आर्थिक बळाच्या आधारे. त्याचप्रमाणे आपला ऐतिहासिक वारसा सिद्ध करण्याच्या गरजेपोटी. दक्षिण चीन समुद्राबाबत किंवा शेजारी राष्ट्रांबाबतची धोरणे याचाच भाग आहेत. चीनचे हिंदी महासागराबाबतचे धोरण आणि आफ्रिकेतील गुंतवणूक हीदेखील याचमुळे.
चीनच्या जागतिक दृष्टिकोनाबाबत मांडणी करताना ज्या एका घटकाचा सतत उल्लेख केला जातो, तो म्हणजे चीनला वाटत असलेल्या असुरक्षिततेचा. आपण एका प्रतिकूल जागतिक परिस्थितीचे सतत बळी होतो आणि त्या परिस्थितीविरुद्ध झगडत होतो हे सांगितले जाते. जिया हाइतो याचा उल्लेख ‘Victim of International Environment’ असा करतात. त्या परिस्थितीत सोव्हिएत रशिया किंवा अमेरिकेकडूनचे धोके अधिक आहेत. तसेच अंतर्गत नैसर्गिक आपत्त्या आहेत. चीनबाबतचे हे सर्व विचार ऐकले की भारतातील एका चिनी अभ्यासकाने केलेली टिप्पणी लक्षात ठेवावी लागते- चीनची रणनीती समजायची असेल, तर क्लॉझविट्स वाचू नका, सून त्झू समजून घ्या.
-श्रीकांत परांजपे
*लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.
*उद्याच्या अंकात महेंद्र दामले यांचे ‘कळण्याची दृश्यं वळणे’ हे सदर