जागतिक कलासमाज हा साऱ्यांनाच सामावून घेणारा आहे, असं एकदा मानलं की प्रश्न सुटत नाहीत. नवे प्रश्न येतात. या कथित जागतिक कलासमाजाचं तात्त्विक एकीकरण सोयीसोयीनंच झालंय आणि आजच्या जागतिक कलासमाजातल्या बऱ्याच घटकांना भौतिक पातळीवर एकत्र आणणारा व्यवहार तर थेट आर्थिक हिशेबांनाच प्राधान्य देणारा असतो. तरीही ‘जागतिक कलासमाज’ असं आपण म्हणतो, म्हणत राहतो.. ते का? ‘जागतिक कलाधंदा’ असं का नाही म्हणत? याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.. चीनच्या उदाहरणानिशी!
‘आर्ट पब्लिक’ या इंग्रजी शब्दप्रयोगाचं ‘कलेचा समाज’ हे शब्दश: भाषांतर आहे. ‘कला आपल्या(च) अधिक जवळची’ हा असा समज असलेले लोक स्थानिक पातळ्यांवर, म्हणजे एखाद्या गावात, एखाद्या राज्यात भले हास्यास्पद ठरत असतील, पण जागतिक पातळीवर असेच लोक- म्हणजे ‘आर्ट पब्लिक’मध्ये मोडणारे अ-सामान्यजन कलेचा व्यवहार तर ठरवतातच आणि व्याख्याही ठरवतात. या लोकांचं जाळं किंवा त्यांची उतरंड भक्कम नाही किंवा कधी नसतेच, हे फार बरं असतं. त्यामुळे नव्यानव्या ऊर्मी असलेले लोक या समाजात येण्यासाठी वाव मिळतो, ‘आर्ट पब्लिक’ वाढत जाण्याची शक्यता कायम राहते. हे सारं एका परीनं चांगलंच. पण याचा बोचरा अर्थ असा की, तुम्ही पहिल्यापहिल्यांदा भले या ‘कला म्हणजे अमुक’ असं सध्यापुरतं ठरवणाऱ्या लोकांच्या विरुद्ध बोलत-लिहीत असलात, तरीदेखील थोडं सातत्य, थोडा प्रभाव दाखवलात तर लगेच तुमच्या प्रभावक्षेत्रातले हे लोक ‘अच्छा, तूही आमचाच की!’ असं म्हणत तुम्हाला आपलंसं करतात. एकंदरीत कला ही जागतिकच कशी, तिचे कप्पे पाडणं कसं अशक्यच, अशी आदर्शवादी वाक्यं म्हणत-म्हणत तुम्हीही त्यांचा भाग होऊन जाता.
समाज असाच घडतो, असं कुणी(ही) म्हणेल. एखाद्या मोठय़ा, बृहद् समाजाचं सदस्यत्व मिळण्याचे निकष खूप उदार असणं, त्यातून समाज विविधरंगी होत जाणं आणि तरीही भेद कायम राहणं, त्यातून उपसमाजांना स्वत:च्या अस्तित्वाचं भान येणं, त्यांनी वेगळेपण दाखवायचा प्रयत्न करणं.. हे असं घडतंच, हे भारतीयांना आणि हिंदूंना सांगण्यासाठी कुणा समाजशास्त्रज्ञाची गरज नाही. कित्येक शतकांपासून हा अनुभव आपण घेतोच आहोत. एक मोठा समाज ज्यांना ‘हिंदूंमधला एक पंथ’ म्हणतो, ते स्वत:ला एका कमी संख्येच्या ‘धर्मा’चे सदस्य मानतात, ही हिंदू समाजातली वस्तुस्थिती कुठल्याही आग्रहाविना समजून घेतली; तर कलेचा समाज कसा असतो हे अगदी सहज कळू शकेल.
कसा असतो कलेचा समाज? ते जे सहज कळू शकेल, ते काय आहे? याचं एका शब्दातलं उत्तर आहे- अनेकान्तवादी!
हा शब्द फार भारी. किती तरी उदारमतवादी. सर्वानाच कवेत घेणारा. पण कलेच्या समाजातही अंतर्गत तेढ असू शकतेच. अनेकान्तवादी आहोत म्हणून मतभेद नाहीत, असं कसं होईल? मतभेद असतातच. शिवाय, कलेच्या क्षेत्रात हे मतभेद फक्त वैचारिकच असतात, असं मानणं म्हणजे स्वत:ला फसवणं ठरेल. कलाकृतींचं व्यावसायिक यश हे, कलासमाजातल्या किती जणांचा पाठिंबा तुमच्या कलाकृतीला असू शकतो, यावर अवलंबून असल्यानं या मतभेदांना व्यावसायिक धारदेखील चढतेच. ‘यांची जास्त चलती आहे’ किंवा ‘हे फार खपतं हल्ली’ अशा नापसंतीदर्शक सुरात अनेक कलाकृतींच्या यशाचं वर्णन करणारे कलावंत/ समीक्षक मुंबईत वा महाराष्ट्रात (आपली सर्वाची स्थानिक पातळी तीच आहे, म्हणून आपल्याला) कुठेही भेटू शकतात, ते याच दुधारी मतभेदांमुळे.
जागतिक पातळीवर मात्र हे मतभेद निष्प्रभ करण्यासाठी निरनिराळे प्रयोग होऊ शकतात. म्हणून जग फार चांगलं आणि आदर्शवादी, असंही अजिबात नसतं. कलाक्षेत्रातला हा जो काही उदारपणा आहे, त्याहीमागे आर्थिक हिशेब असू शकतातच. चीनचा जागतिक कलासमाजातला समावेश, हे याचं उत्तम उदाहरण ठरेल. साधारण १९९२ नंतर (म्हणजे तियानान्मेनमध्ये तरुणांवर रणगाडे फिरवून झाल्यानंतर चीननं युरो-अमेरिकी भांडवलाचं स्वागत करण्याची भूमिका घेतली, त्यानंतर) चिनी कलावंतांची चित्रं युरो-अमेरिकी कला प्रदर्शनांत दिसू लागली! हे कलाकार ‘ढ’ होते असं अजिबात नाही, पण या प्रदर्शनांमध्ये चिन्यांना स्थान देणारे जे विचारनियोजक (क्युरेटर) किंवा म्युझियमचे अधिकारी वगैरे होते, त्यांनी चिन्यांचं जे अफाट कौतुक चालवलं होतं, ते वाचून ‘हे सारं आत्ताच कसं काय दिसू लागलं यांना?’ असा संशयवादी प्रश्न कुणालाही पडलाच असता. तो पडून विचारला जाण्याअगोदरच चिनी चित्रांवर अमेरिकन कलाबाजाराच्या उडय़ा पडल्या होत्या आणि ‘हे आता आपलेच’ असं जणू काही जागतिक कलाक्षेत्रानं ठरवून टाकलं होतं.
भारतीय चित्रांना परदेशी लिलावांत मोठा भाव किंवा तत्सम बातम्या १९९०च्या दशकाच्या अखेरीस येऊ लागल्या. ज्ञानेश्वर नाडकर्णी हे तेव्हाचे मराठीतले ज्येष्ठ कलासमीक्षक होते. त्यांनी असं विश्लेषण केलं की, परदेशांतले भारतीय लोक हेच यांपैकी अनेक चित्रांचे ग्राहक होते. जी चित्रं बिगरभारतीयांनी विकत घेतली, ती अगोदरच मोठं यश मिळालेल्या (सूझा, हुसेन आदी) चित्रकारांची होती. भले! म्हणजे नाडकर्णीनीसुद्धा ‘स्थानिक कलासमाज’ आणि ‘जागतिक कलासमाज’ यांच्यामधलं अंतर सांगूनच एका स्थित्यंतराच्या पूर्वस्थितीचं विश्लेषण केलं होतं. भारत जगाच्या कलाबाजारात आला तो चीनच्या नंतर, हे निराळं सांगायला नकोच. शिवाय, आज चीननं जागतिक कलाबाजारात चांगलीच मुसंडी मारली आहे. त्याद्वारे चीन हा, ‘जागतिक कलासमाजा’त मोठा आवाज असलेला देश होऊ शकला असता. पण तसं झालं नाही. चिनी कलावंत एकेकटे चालतील, चीनमधल्या ‘आर्ट फेअर’ (दृश्यकलांचा व्यापारमेळा) किंवा ‘बिएनाल’ (दृश्यकलेची द्वैवार्षिक प्रदर्शनं- बायएनिअलचा रूढ उच्चार) यांचं महत्त्व व्यवहारात वाढत गेलं खरं, पण या चिनी जत्रा-उरुसांना वैचारिक क्षेत्रात प्रतिष्ठा अद्यापपर्यंत मिळालेली नाही.
त्याउलट, चीनबाहेर कुठेही (अगदी भारतातसुद्धा) मान आहे तो, सांग डाँग आणि आय वेवे या चिनी कलावंतांना- हे दोघेही चीनच्या अधिकृत धोरणांवर वेळोवेळी टीका करत असतात. आजचा जागतिक कलासमाज इतका बेरकी झालाय की, एखाद्या सार्वभौम देशाच्या अंतर्गत कारभारावर कुणी टीका केली म्हणून- केवळ म्हणून- त्याला मोठं ठरवायचं नसतं हे आजच्या जगातल्या संग्रहालय- अधिकाऱ्यांना, विचारनियोजकांना, समीक्षकांना आणि कलावंतांना, झालंच तर प्रेक्षकांनाही कळतं (थोडय़ाफार फरकानं). मग, आय वेवे हा मानवतावादी आहे, असं म्हटलं जातं. सांग डाँग हा चिनी ‘विकासा’नं माजवलेला हाहाकार त्याच्या फोटोंतून दाखवतो, पण त्याला फक्त ‘शहरी पर्यावरणाचा निराळा विचार करणारा चित्रकार’ असं म्हटलं जातं.
या दोघांखेरीज अनेक चिनी कलाकारांना बाजाराचा आश्रय मिळतो आहेच. हा बाजार अर्थातच युरोप-अमेरिकेत अधिक असल्याचं सध्या दिसतं. (हल्ली आशिया वरचढ ठरू लागली आहे.) त्याची चिंतासुद्धा जागतिक कलासमाजाच्या भाग असलेल्या काहींना वाटताना दिसते. ‘आर्ट इन अमेरिका’ या नियतकालिकाचे समीक्षक रिचर्ड व्हाइन यांनी यंदाच्या (२०१३ जून ते सप्टेंबर) व्हेनिस बिएनालबद्दल लिहिताना म्हटलं की, बिएनालेच्या काळात एकंदर ३५० चिनी दृश्यकलावंतांची कला व्हेनिसमध्ये पाहायला मिळते आहे. अधिकृत बिएनालेत आणि त्यानिमित्तानं होणाऱ्या खासगी प्रदर्शनांत हे कलावंत रिचर्ड यांनी मोजले, पण या बिएनालेत ज्या चिनी कलाकृतीची सर्वाधिक चर्चा झाली, ती आय वेवेचीच होती.
आय वेवे याला २०१० साली तत्कालीन चिनी सरकारनं ‘आत टाकलं’ होतं. प्रथम अगदी कोठडीतच. मग ‘सोडलं त्याला’ असा गाजावाजा करत नजरकैदेत. त्यापैकी कोठडीतले काही ‘देखावे’ आय वेवे यानं व्हेनिसच्या एका चर्चमध्ये मांडले. ट्रकवरले कंटेनर असतात, त्यापेक्षा थोडेसे लहान लोखंडी पेटारे, त्यांच्या आत प्लास्टर, फायबरग्लास आणि अन्य साधनं वापरून उभारलेला ‘देखावा’ (आपल्याकडे गणपतीत असायचे, तितक्याच यथातथ्यवादी- पण- गुळगुळीत पुतळ्यांचा. आय वेवेच्या कामातले पुतळे वास्तवापेक्षा निम्म्यानं लहान आकाराचे) आणि हे पेटाऱ्यांच्या आतले देखावे बघण्यासाठी कोठडीला असतात तशाच गजवाल्या खिडक्या. बाजूंना, वरती, वगैरे. प्रत्येक पेटाऱ्यात कोठडी आहेच, पण या सहा पेटारा-कोठडय़ांमधला आय वेवे निरनिराळ्या क्रिया करतोय. दिनक्रमच म्हणा ना. झोपणं, वाचणं, जेवणं, फेऱ्या मारणं, आंघोळ, संडास.. या सर्व वेळी चिनी शिपाई त्याच्यावर नजर ठेवून आहेत. अगदी संडासातसुद्धा.
हे आजचं उदाहरण- चित्र, चिनी चित्रं जागतिक कलासमाजाला केवळ ‘विकाऊ’ म्हणून नव्हे तर वैचारिक घुसळणीसाठीदेखील हवी आहेत, याचं निदर्शक. आय वेवे याच्या कामांना विक्रयमूल्य भरपूरच आहे, पण कोठडीत घडलेले – वा न घडलेले – प्रसंग अशा प्रकारे मांडून त्यानं धाडस तर दाखवलंच आणि ‘मी जो विचार करायचो तो या शिपायांच्या ‘नजरे’तून सुटलाच की नाही?’ असा – आय वेवेनं न सांगताही प्रेक्षकांनी ओळखलेला प्रश्नदेखील मांडला.
हे उदाहरण म्हणजे, जागतिक कलासमाजाचे विचार आणि व्यवहार यांचा गुंता दाखवणारी चिनी बोधकथा ठरो!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा