‘माझं’ चित्त आहे, तोवर द्वैत आहे. म्हणून ‘मम चित्ता शमवी आता’चा भिडणारा एक अर्थ आहे की आता हे चित्तच शमवून टाक, मावळून टाक! वेगळेपणानं उरू देऊ नकोस. कारण ‘मी’ आणि ‘तू’ आहे तोवर ‘मी’च येनकेनप्रकारेण बलिष्ठ होऊ पाहतो. निदान माझ्यासारखा तुझा अन्य भक्त नाही, हा भाव तरी येतोच. तेव्हा हे द्वैतच मावळावं. हा ‘मी’ ज्याच्यात ओसरत असतो असा शिष्यच सद्गुरूला आवडतो. सातारच्या पेठेकाका यांचं एक फार मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात, ‘‘सद्गुरूंना दोन माणसं अधिक जवळची असतात. एक म्हणजे त्यांचं ‘अंतर’ जाणणारे आणि दुसरे त्यांच्यापासूनचं आपलं अंतर जाणणारे!’’ आणि गफलत अशी होते की त्यांचं ‘अंतर’ म्हणजे अंत:करण तर आपण जाणतच नाही, पण त्यांच्या प्रेममाधुर्यानं आपण त्यांच्या जवळचे झालो, असं पक्केपणानं मानू लागतो आणि मग त्यांच्या आणि आपल्यातलं अंतरही विसरतो! गुलाबराव महाराज यांनी आपल्या शिष्यांना एकदा जो बोध केला होता तो इथं संक्षेपानं नमूद करावासा वाटतो. महाराज म्हणाले की, ‘‘तुम्ही मला सामान्य जिवांहून वरिष्ठ आणि ज्ञानी मानता यात संशयच नाही. कारण तसे नसते तर तुम्ही माझ्याकडे आलाच नसता..’’ हे तरं खरंच आहे. सद्गुरू परमश्रेष्ठ वाटतो म्हणून तर आपण जातो. पण आपण पाहतो काय? तर त्याचा देह. मग त्या देहाला जे अनुकूल असेल ते करणं म्हणजे त्यांची सेवा, हाच भाव येतो. जर ते आजारी असतील तर, भक्तांना भेटण्याचा त्यांना त्रास होऊ शकतो, असं वाटून आपण त्यांना भेटणं टाळू लागलो किंवा दुसऱ्यांना भेटू देणं टाळू लागलो, तरी ते देहाचंच प्रेम! महाराज म्हणतात, ‘‘अशा रीतीने प्रेम देहाला धरून असल्यामुळे गुरुभक्तीचे खरे स्वरूप जी आज्ञापालनरूपी मर्यादामार्गीय भक्ती तिकडे तुमचे दुर्लक्ष होते.’’ मग महाराज नंद-यशोदेचा दाखला देऊन सांगतात, ‘‘नंद-यशोदेने अती तीव्रतर देहशोषणादि तपाने श्रीकृष्णाकरिता पूर्वजन्मी देह झिजवला. त्यामुळे पुढील जन्मात त्यांना श्रीकृष्ण तर मिळाले व त्याच्याकडून त्यांनी गायी राखण्याची सेवा करून घेतली. परंतु तपाचे सुकृत संपताच देव मथुरेस निघून गेले! तद्वत, अवतार समजून तुम्ही मजवर प्रेम करीत असलात तर तुम्ही त्या प्रेमबलाने मजकडून गायी राखण्यासारखी सांसारिक सेवा करवून घ्याल. ज्ञानी समजत असाल तर मला पुढे जन्मच येणार नाही. पण तुम्हाला मात्र तुमच्या भावनेने आणि आता मजवर केलेल्या प्रेमाने माझ्यासारखा अज्ञानी पुतळा मिळेल आणि तो तुमची सेवा करील!’’ महाराजांचा हा बोध शांतपणे परत परत वाचला तरच थोडा थोडा प्रकाश पडू लागतो. महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण गुरुकडे देहबुद्धीनंच पाहतो आणि आपल्या देहाच्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या आवडीनिवडी कल्पितो! आपल्या देहाच्या आरामाच्या कल्पना त्यांना लागू करतो आणि इथं फसगत सुरू होते. खरी गुरुभक्ती म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणं! त्या आज्ञापालनाची मर्यादा राखणं हीच भक्ती आहे. परमात्म्यानं आपल्या पोटी पुत्राचा जन्म घ्यावा, या भावनेनं नंद-यशोदेनं भक्ती केली होती. पण पुत्र होताच त्याला गायीगुरं राखण्याची सेवा दिली. तसं सद्गुरू मिळावा, यासाठी खरी धडपड केली जाते, पण तो मिळाल्यावर काय होतं? तर आपल्या भौतिक इच्छांच्या गायी राखण्यापुरतं त्याला आपण राबवू पाहतो! मग यातच जन्म सरेल, पुढचा जन्म येईल आणि त्या जन्मीही इच्छांच्या गायी राखण्यापुरता गुरू शोधला जाईल!
– चैतन्य प्रेम