चैतन्य प्रेम
परमात्म्याचा आंतरिक संगानं भक्ती फुलतेच, पण त्याच्या वियोगदग्ध भावनेनंही भक्तीप्रेमाचं विराट रूप उलगडतं, हे संतचरित्रांतूनही दिसतं. अर्थात या वियोगभक्तीची खरी व्यापकता, खोली आणि धग नुसती वाचून कळत नाही. मीराबाई म्हणतात, ‘‘घायल की गति घायल जाण, जो कोई घायल होय!’’ जो अंतरंगातून परमात्म्यापासून दुरावल्याची वेदना अनुभवत आहे, तोच वियोगभक्तीतली व्याकुळता जाणू शकतो. समर्थ म्हणतात, ‘‘जळत हृदय माझे जन्म कोटय़ानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी!’’ यातला हृदयाचा दाह, हा श्लोक अनेकवार वाचूनही जाणवतोच, असं नाही. तरीही संत चरित्रांच्या परिशीलनाने साधकाच्या चित्तावर संयोग आणि वियोगभक्तीचे सूक्ष्म भावसंस्कार झाल्याशिवाय राहात नाहीत. ‘श्रीअवध भूषण रामायण’ ग्रंथात या दोन्ही भक्तींचं अद्भुत दर्शन घडतं. रामकथेत लक्ष्मणाची संयोग भक्ती आहे, तशीच भरताची वियोगभक्तीही आहे. लक्ष्मण सावलीसारखा प्रभुंसोबत होता. त्याचा दिनक्रम पाहिला तरी त्याच्या सेवेचं स्वरूप लक्षात येईल. ‘श्रीअवध भूषण रामायणा’त म्हटलं आहे की, ‘‘स्वाँस स्वाँस रामहिं सुख हेतू।। इहइ लखन जीवन क्रम सेतू।।’’ म्हणजे लक्ष्मणाचा प्रत्येक श्वास हा प्रभुंच्या सुखासाठीच व्यतीत होत होता. त्याच्या जीवनाचा तोच एकमेव क्रम होता. ‘‘जप तप व्रत साधन कछु नाहीं।। त्याग मूर्ति बस सेवा राही।। स्वाँस स्वाँस सिय राम समाई।। सर्बस भाव अनुज रुचि राई।।’’ बाकी काही जप, तप, व्रत, साधन तो जाणत नव्हता. केवळ प्रत्येक श्वास प्रभुला समर्पित करीत त्यांना आवडेल ते सर्व भावे करायचं, एवढंच तो जाणत होता! ‘लक्ष्मण’ हे नावही अत्यंत मार्मिक आहे. साधकाच्या मनाचं लक्ष्य काय असावं, हे लक्ष्मण-चरित्र सांगतं! लक्ष्मणाप्रमाणेच प्रत्येक श्वास प्रभुंच्या सुखासाठीच व्यतीत झाला पाहिजे, आपल्या जीवनाचा तोच एकमेव क्रम असला पाहिजे, ही प्रेरणा लक्ष्मणाचं चरित्र साधकाला देतं. आता प्रत्येक श्वास प्रभुच्या सुखासाठी व्यतीत होणं म्हणजे काय? तर परमात्मा जसा व्यापक, त्रिगुणातीत, शुद्ध, निर्लिप्त आहे, तसं साधकाचं जगणं असलं पाहिजे. त्यानं मनानं व्यापक होण्याचा तसंच भ्रम, मोह आणि आसक्तीनं जगात चिकटण्याची वृत्ती थोपवण्याचा अभ्यास केला पाहिजे. सद्गुरूंना आवडेल असंच वर्तन, अर्थात संकुचित आचार, विचार आणि उच्चारापासून मुक्त करील असंच वर्तन साधकानं प्रयत्नपूर्वक बाणवलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही साधना नाही, कोणताही जप नाही, तप नाही, व्रत नाही! प्रभुंच्या कुटीबाहेर लक्ष्मण रात्री पहारा देत. कसा? तर, ‘‘सावधान धनु बाण चढाई।। प्रभु सुख बिघन देर होइ जाई।। होइ न प्रभु सुख एकउ बाधा।। डूबा वीर सनेह अगाधा।।’’ लक्ष्मणजी धनुष्याला बाण लावून सावध असत. प्रभुसुखात कुणी विघ्न उत्पन्न केलं तर त्याचा प्रतिकार करण्यात धनुष्याला बाण लावण्याइतकाही वेळ वाया जाऊ नये, हा त्यामागचा हेतू! प्रभुंच्या वाटय़ाला एकही दु:ख येऊ नये, याच विचारात हा वीर सदैव बुडाला असे. म्हणजे साधकाचं लक्ष सदैव आपल्या प्रत्येक कृतीकडे असलं पाहिजे. त्यांच्या प्रेमाची प्रतारणा होईल, अशी कोणतीही कृती घडू नये, याबाबत साधकानं सदैव दक्ष असलं पाहिजे.
chaitanyprem@gmail.com