रामप्रेमभावानं ओथंबलेल्या पावलांनी मग भरत वनाकडे जायला निघाले. त्यांच्याबरोबर मंत्रीगण, ऋषीगण, अयोध्यावासी आणि आप्तजनही होते. त्यांनी बरोबर राज्याभिषेकासाठीच्या तिलकाची तयारीही केली होती. वाटेवरचं वर्णन तर बरंच आहे. पण पहिलीच भेट झाली ती निषादराजाशी. निषादाच्या कानी वार्ता आली की भरत सैन्यासह वनाकडे निघाला आहे, तेव्हा त्याला स्वाभाविकपणे वाटलं की वनातही रामांना सुखानं राहता येऊ नये यासाठी भरत निघाला आहे. तिथं तो रामांचं काही अहित करील, या विचारानं निषादानं भरताशी लढण्याची आणि स्वत:च्या मृत्यूचीही तयारी ठेवली होती. पण नंतर जेव्हा त्याला समजलं की, भरत रामांना अयोध्येला परत नेण्यासाठी निघाले आहेत तेव्हा भरतांविषयीच्या प्रेमानं त्याचं मन उचंबळून आलं. भरतांनाही जेव्हा समजलं की निषाद राज हा रामाचा सखा आहे, तेव्हा त्यांनी धावत जाऊन निषादराजाला मिठीच मारली. निषाद राजा संकोचून सांगत होता की, मी तुमच्यापुढे सामान्य आहे. तुमचा दास आहे.. पण तरीही ‘‘प्रेम सदा बस प्रेम निहारा।। नहिं बडम् छोट न नियम बिचारा।।’’ प्रेममय झालेल्याचं लक्ष केवळ प्रेमाकडेच असतं. ते कोणतेही भेद जाणत नाही की जुमानत नाही. भरतांचं हे वनगमनाचं वर्णन अत्यंत विस्तृत आणि भावमय आहे. ते आटोपतं घेत थोडं पुढे जाऊ.. तर मग भरत वनात जो कोणी समोर येई त्याला प्रेमपूर्वक दण्डवत करीत आणि विचारत की, ‘‘प्रभू राम, सीतामाई आणि लक्ष्मण कुठे आहेत, काही माहीत आहे का?’’ भरतांच्या नुसत्या दर्शनानंही पाहणाऱ्याच्या चित्तावर भावसंस्कार होत असे आणि तो भरतांच्या त्या प्रेमानं भारावून जात असे. अखेर भरतांना प्रभु कोणत्या वनात आहेत, हे समजलं. प्रभुभेटीची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतसे भरत भावाविष्ट होऊ लागले. अयोध्येच्या सैन्यासह आणि इतक्या जनसागरासह भरतजी जेव्हा प्रभु राम जिथं राहात होते त्या कुटीकडे निघाले तेव्हा वनातले प्राणीही भेदरून रामांच्या आश्रयासाठी त्या कुटीकडे धावले. दूरवरून उडत असलेली धूळमाती आणि जनावरांचं भेदरून आपल्याकडे येणं पाहून प्रभु मुग्ध झाले. भरतजींच्या आगमनाची गोष्ट अंतर्यामी रामांना समजली होतीच, पण पाठोपाठ धावत आलेल्या काही वनजनांनी ती खबर मोठय़ा आतुरतेनं सांगितली. ती ऐकताच भरतप्रेमाच्या जाणिवेनं रामांचे डोळे भरून आले. शरीर रोमांचित होऊन थरथरू लागलं. लक्ष्मणानं फक्त तो कंप आणि डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि भरतांच्या येण्यानं आपल्या प्रभुंना क्रोध आला आहे, या भावनेनं लक्ष्मणही क्रोधित झाला! कारण रामापुढे त्यांना घर-दार, माता-पिता इतकंच नव्हे आपल्या देहाचीही पर्वा नव्हती. वनात प्रभुंच्या सुखात बाधा येईल, अशी कोणतीही गोष्ट घडू द्यायची नाही, ही जणू लक्ष्मणाची प्रतिज्ञा होती. केवळ त्याच हेतूनं आपण वनात आलो आहोत, तेव्हा त्या कर्तव्यात कुचराई होऊन चालणार नाही, असाच लक्ष्मणांचा भाव होता. त्यामुळे भरतांच्या आगमनानं क्रोधित होऊन लक्ष्मण बोलू लागले. जणू क्रोधच शब्दाचा देह धारण करून त्यांच्या मुखातून प्रकटू लागला होता. त्याच स्वरात ते म्हणाले की, ‘‘हे प्रभु, तुम्ही सगळ्यांनाच तुमच्यासारखे निष्कपट मानता. तुम्हाला चांगल्या-वाईटातला फरकच कळत नाही. भरत खरं तर सत्संगरत होता, तुमच्या चरणीं त्याचा प्रेमभाव होता, पण आता सत्तेच्या मदानं तो बदललेला दिसत आहे!’’
चैतन्य प्रेम