चैतन्य प्रेम
अयोध्येच्या सिंहासनावर प्रभुंच्या त्या पादुका विराजमा झाल्या. भरतांना वाटत होतं की, ‘‘भरत हृदय अस भाव ललामू।। मानहुँ प्रगट स्वयं सिय रामू।।’’ जणू सीता आणि रामच या पादुकांच्या रूपानं विराजमान आहेत! राम म्हणजे परमात्मा आणि सीता म्हणजे त्याची शक्ती. थोडक्यात परमात्मशक्ती आणि भक्ती हीच पादुकांच्या रूपात विराजमान असते. मग भरतजी नंदिग्रामात राहू लागले. ज्या भूमीवरून प्रभु वनाची वाट चालत आहेत, त्या भूमीवर, त्या पातळीवर पाऊल ठेवण्याची आपली योग्यता नाही, या भावनेनं भरतांनी मोठा खड्डा खणून त्यात एक कुटी उभारली होती. तिथं ते रामांप्रमाणेच तापसी वेषात राहू लागले. रामांप्रमाणेच कंदमुळं खाऊन राहू लागले. आता माझे प्रभू कसे राहत असतील, याच विचारात त्यांचा दिवस सरत असे. मग कडाक्याचं उन पडलं असेल, तर ते त्या उन्हात बसत आणि सूर्याला प्रार्थना करीत की, सारा उष्मा मला दे, पण माझ्या प्रभूंना सुखद वाटेल, असा मेघांचा संभार जमव. कडाक्याची थंडी असे, तेव्हा त्या थंडीत बसत आणि प्रार्थना करीत की सारा थंडीचा त्रास मला द्या, माझ्या प्रभूंना नको. वियोगभक्तीचं विराट रूप भरतांच्या चरित्रात भरून आहे. तेव्हा लक्ष्मणाची संयोगभक्ती आणि भरतांची वियोगभक्ती ही साधकांना खूप काही शिकवणारी, साधनेबाबत सजग करणारी आहे. तेव्हा खऱ्या सद्गुरूच्या सहवासात असू किंवा त्यांच्याच आज्ञेवरून त्यांच्यापासून दूर प्रपंचात असू, मनानं जर त्यांच्या बोधाशी एकरूपता असेल, तर मग अखंड आंतरिक संयोग आहेच! या ंसंयोग-वियोग भक्तीची चर्चा आटोपती घेताना वियोगभक्तीच्या भावनेनं भरलेला तुकाराम महाराज यांचा एक अभंग पाहू. हा अभंग असा आहे :
बा रे, पांडुरंगा केव्हा भेट देसी।
जाहलो परदेशी तुजवीण।। धृ०।।
तुजवीण सखा मज नाही कोणी।
वाटते चरणीं घालू मिठी।। १ ।।
ओवाळावी काया चरणांवरोनी।
केव्हा चक्रपाणी भेटशील।। २।।
तुका म्हणे माझी पुरवावी आवडी।
वेगे घाली उडी नारायणा।। ३।।
अभंग अगदी सोपा भासणारा आहे. पण त्याचं जितकं मनन, चिंतन करीत जाऊ तसतसा तो अंतर्मुख करणारा आणि भावजागृती करणारा आहे. पांडुरंगाच्या प्रेमानं हृदय उचंबळून येत आहे, पण त्याच्या भेटीचा योग काही अद्याप आलेला नाही. म्हणून आर्तपणे तुकाराम महाराज विचारत आहेत की, ‘‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देसी?’’ या ‘बा रे’मध्ये जवळीकीची आस मांडणारा विरहार्त गोडवा आहे. एखाद्या मुलानं आपल्या मायला कळवळून आर्त हाक मारावी, तसा हा चरण आहे. पण दुसरा चरण आहे, तो साधकांना अंतर्मुख करणारा आहे. तो म्हणजे, ‘‘जाहलो परदेशी तुजवीण!’’ म्हणजे या जगात काही मन रमत नाही. असं होतं का हो? सद्तत्त्वापासून दुरावा उत्पन्न होताच, मन तळमळतं का हो? परमार्थ करीत असताना प्रपंचाची जशी सतत आठवण येते तशी प्रपंच करीत असताना परमार्थाची आठवण येते का? एका सद्गुरूप्रेमावाचून अन्य काही नको, या भावनेनं ओथंबलेला हा अभंग सांगतो की, जर त्याचा सहवास नसेल, तर मला परक्या देशात पडल्यासारखं वाटेल! तो भाव आपला आहे का? नव्हे सत्संगापासून दुरावताच जगमोहाच्या संगात आपण लगेच रमू लागतो.