चैतन्य प्रेम
अनाचाराचं प्रायश्चित्त म्हणून ‘शांत हो श्रीगुरुदत्ता’ हे काव्य जन्माला आलं. आता ‘प्रायश्चित्त’ म्हणजे काय? तर प्रायश्चित्त हे चुकीचं परिमार्जन म्हणून घेतलं जातं तसंच ती चूक पुन्हा न करण्याच्या ग्वाहीचं स्मरणही त्यात अभिप्रेत असतं. म्हणजेच प्राय: चित्त सदाचारात राहणं, ज्यानं साधलं पाहिजे तेच खरं प्रायश्चित्त असतं. तेव्हा हे काव्य वरकरणी दत्तगुरूंची विनवणी करणारं भासत असलं तरी ते प्रत्यक्षात साधकाला त्याच्या लघुत्वाची आणि तरीही त्याला सहज प्राप्त झालेल्या व्यापक कृपेची आठवण करून देतं. म्हणजेच आपल्यासारख्या सामान्य जिवालाही सद्गुरूंचा बोध आणि सहवास सहज प्राप्त झाला आहे, त्या सहवासाचं मोल विसरल्यामुळेच हातून चूक घडली आहे. ती चूक सुधारलीच पाहिजे, ही तीव्र जाणीव त्यावेळी तरी जागी होते. त्यामुळे हे काव्य साधकाची आंतरिक जागृती निर्माण करणारं आणि ती कायम राखणारं आहे. आता काही जण याचा पाठभेद ‘अहो शांत श्रीगुरुदत्ता’ असा करतात. कारण काय? तर दत्तगुरू शांतिस्वरूपच आहेत. मग त्यांना अशांत कोण करणार, अशी त्यांची भावना असते. त्या भावनेचाही आदर केला पाहिजे. आता हा पाठभेद अतिशय अधिकारी व्यक्तीनं केला आहे, पण कधी कधी साधकही स्वतच्या मनोदशेला वळण देण्याच्या सद्हेतूनं स्तोत्रातला एखादा शब्द स्वत:पुरता बदलतात. समर्थाची ‘करुणाष्टकं’ म्हणताना मीसुद्धा ‘तुजवीण मज वाटे सर्व संसार वोझे’चं ‘तुजवीण मज वाटो सर्व संसार वोझे’ असा पाठभेद करतो. कारण एका भगवंतावाचूनचा सर्व संसार खोटा, डोईजड कुठं वाटतो हो! तर, दत्तगुरू अशांत कसे होतील, या भावनेनं ‘अहो शांत श्रीगुरुदत्ता’ हा पाठभेद काही जण करतात. पण मला वाटतं की, तो परमात्मा एकाच वेळी फुलापेक्षाही कोमल आणि वज्रापेक्षाही कठोर नाही का? तेव्हा अशांतरूप धारण करूनही त्याच्या मूळ शांतिस्वरूपात तसूभरही फरक पडत नाही! या अनुषंगानं केशवदत्त महाराज यांच्या एका विवरणाचं स्मरण होतं. धुळ्याजवळ सोनगीर नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथं एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर गोिवद महाराज म्हणून एक विलक्षण सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या समाधिस्थानी खूप प्रसन्न वाटतं बरं. तर त्यांचे हे शिष्य. ते ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करत. त्यांनी नृसिंह अवताराचं विवेचन करताना असं म्हटलंय की, ‘प्रल्हादाच्या प्रेमातून प्रकटलेल्या मूर्तीत दाहक उग्रज्वाला का निर्माण व्हाव्यात? कारण विश्वनियमनात जी एक शक्ती आहे तिला शांतीसाठी क्रांतीची आवश्यकता आहे!’ पुढे म्हणतात, ‘प्रेमातून प्रकटलेली मूर्ती प्रेममय झाली. उग्रतेचे कार्य पूर्ण झाल्यावर उग्रता प्रेमात निमाली!’ तेव्हा साधकांच्या हितासाठीच सद्गुरूही कठोर रूप धारण करतात. त्यांच्या त्या कठोरतेमागेही अपरंपार प्रेम आणि जीवहिताची कळकळच असते. त्या जीवहितासाठीच दत्तगुरूंनी अशांत रूप धारण केलं होतं. त्यांची विनवणी करताना पहिल्या चरणात श्रीवासुदेवानंद सरस्वती म्हणतात :
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता॥ध्रु.॥
तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हितकर्ता।
तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूची त्राता॥
भयकर्ता तू भयहर्ता॥
दंडधर्ता तू परिपाता॥
तुजवांचुनि न दुजी वार्ता॥
तू आर्ता आश्रय दत्ता॥
शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता!!