चैतन्य प्रेम
गेली बरीच वर्ष आम्ही जप करीत आहोत, तरी अजून काही का साधत नाही, असा प्रश्न साधकांच्या चर्चेत येतोच. पण खरंच ‘साधायचं’ ते काय हो? काय साधलं म्हणजे जपाचं सार्थक झालं, असा आपला समज असतो? कुठला साक्षात्कार आपल्याला अभिप्रेत असतो? खूप जणांना रंग दिसणं, नाद ऐकू येणं या गोष्टी मोलाच्या वाटतात. त्या खोटय़ा नाहीत, पण त्यांच्यातही गुंतण्यात अर्थ नाही. वेदात परमात्म्यानं सांगितलं आहे की, ‘ तेज हे माझं आवरण आहे!’ समजा एक माणूस निळ्या रंगाचं मोठं कांबळं पांघरून वावरतो. तर त्याचं नुसतं कांबळं पाहणं म्हणजे त्याचं दर्शन आहे का हो? तसंच तेजाचं दर्शन हे परमात्म्याच्या आवरणाचं दर्शन आहे. जर तेजाचं दर्शन झाल्यानं, रंगांचं दर्शन झाल्यानं, नाद ऐकू आल्यानं आपल्याला इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, असं वाटत असेल, तर त्या नादरंगांनी आपण अहंकाराच्या चिखलात आणखीनच रूतलो म्हणायचं! मग त्या रंगांच्या अनुभूतीनं खरा आत्मलाभ झाला की आत्महानी झाली? तेव्हा साधनेनं काय साधलं की ध्येयपूर्ती झाली समजावं? हा प्रश्न साधना करणाऱ्या प्रत्येकानं स्वत:ला विचारला पाहिजे. साधनेनं खरं जर काही साधायचं असेल, तर ती सद्गुरूमयताच. दुसरं काहीही नाही. ती साध्य होईपर्यंत काही आंतरिक पालट मात्र निश्चितच होत गेला पाहिजे. हा जो पालट आहे त्याच्या काही खुणा सांगता येतात. त्यातली पहिली खूण म्हणजे, मनातली अस्थिरता कमी कमी होत जाणे. मन अस्थिर कशानं होतं? जोवर मनासारखं घडत असतं, तोवर मन अस्थिर होत नाही. म्हणजेच मनाविरुद्ध काही घडलं किंवा घडेल, अशी भीती वाटली की मन अस्थिर होतं. आता मनासारखं जे व्हावंसं वाटतं ते योग्य असतं का, श्रेयस्कर असतं का, याचीही बारकाईनं तपासणी केली पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि त्यांच्या बोधाचं चिंतन जसजसं वाढत जाईल तसतशी ही तपासणी अधिक प्रामाणिकपणे होऊ लागेल. जगाकडून असलेल्या आपल्या मनातल्या अपेक्षांमध्ये जसजशी घट होऊ लागते तसतशी मनातली अस्थिरता कमी होऊ लागते. अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंगाचं दु:खंही वाटय़ाला येऊ शकतं आणि ‘न होता मनासारिखे दु:ख मोठे,’ या सूत्रानुसार अपेक्षाभंगानं मनाचं दु:खं वाढत जातं. जग मला काय देणार की जे परमात्मा देऊ शकत नाही, हा भाव वाढू लागतो. मग जगातला वावर अपेक्षांच्या ओझ्यांपासून मुक्त आणि म्हणूनच अधिक सहज आणि सच्चा होऊ लागतो. दुसरी खूण म्हणजे चिंता आणि भीतीचं प्रमाण कमी होऊ लागतं. एकदा का मनातली अस्थिरता कमी होऊ लागली की आपोआप चिंता आणि भीतीचं प्रमाण घटू लागतंच. माणसाला अनेक प्रकारच्या चिंता असतात आणि भीतीही वेळोवेळी अनेकांगी असते. पण त्यात पैसा आणि मृत्यू या दोन गोष्टींभोवती चिंता आणि भीती अधिक प्रमाणात घोटाळत असते. आपली सांपत्तिक परिस्थिती खालावणार तर नाही ना, ही चिंता असते आणि मृत्यू हा आपल्यासकट प्रत्येकाला आज ना उद्या येणारच असला तरी आपल्यापेक्षाही आपल्या जवळच्या माणसांच्या मृत्यूची कल्पना आपल्याला जास्त भीतीदायक वाटत असते. आणि पैशापेक्षाही मृत्यूची भीती अधिक खोलवर परिणाम करणारी असते.
chaitanyprem@gmail.com