तीर्थक्षेत्रांना भेटी देणं हे मोठं पुण्याचं काम, असं अनेकांना प्रामाणिकपणे वाटतं. प्रारंभिक पातळीवर माणसाच्या मनात भावसंस्कार करण्यासाठी या गोष्टींचं महत्त्व आहे, यातही शंका नाही. पण अध्यात्माच्या पथावर खरी वाटचाल सुरू होते तेव्हा साधकाची या तीर्थाटणाकडे पाहण्याची दृष्टी बदलणं आवश्यक आहे. त्या तीर्थाटनात भाव नसेल, तर ते नुसतं तीर्थात भटकणं होतं, असं जनार्दन स्वामी स्पष्ट नमूद करतात. म्हणूनच ते ‘तीर्थाटण’ हा शब्द वापरत नाहीत, तर ‘तीर्थपर्यटन’ असा शब्द वापरतात! ते म्हणतात, ‘‘तीर्थपर्यटन कायसा करणें। मन शुद्ध होणें आधी बापा।।’’ नुसतं तीर्थक्षेत्रात भ्रमण करीत राहून काय उपयोग? आधी मन शुद्ध झालं पाहिजे. ते कशानं होईल? तर जनार्दन स्वामी सांगतात, ‘‘तीर्था जाऊनि काय मन शुद्ध नाहीं। निवांतची पाही ठायीं बैसे।।’’ तीर्थात जाऊन मन शुद्ध होईलं असं नाही. ते शुद्ध होण्यासाठी ठायीच निवांत बसलं पाहिजे. हा निवांतपणा म्हणजे व्यग्रता संपून एकाग्र होणं. शिष्याची भौतिक जगातली अनावश्यक तेवढी भटकंती थांबावी, कर्तव्याची सीमारेषा ओलांडून मोहाच्या प्रांतातली त्याची वणवण थांबावी, हाच सद्गुरूचा हेतू असतो. मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा बसल्या जागी परमतत्त्वाशी नित्यभेट होते, असं जनार्दन स्वामी सांगतात. ते म्हणतात, ‘‘मन शुद्ध जालिया गृहींच देव असे। भाविकासी दिसे बैसल्या ठायीं।। म्हणे जनार्दन हाचि बोध एकनाथा। याहुनि सर्वथा श्रेष्ठ नाहीं।।’’ आणि एकदा व्यग्रता संपली आणि एकाग्रता, अंतर्मुखता हा स्थायी भाव झाला मग कुठेही गेलं, तरी मनाची आंतरिक स्थिती अभंग राहाते. म्हणूनच तर ‘एकनाथी भागवता’चा प्रारंभ पैठणमध्ये झाला, पण नंतर ग्रंथपूर्तीच्या निमित्तानं नाथांचं काशीत दीर्घ वास्तव्य झालं तरी त्यांच्या निजात्मस्थितीत फरक पडला नाही. सद्गुरू कृपेनं जी आंतरिक स्थिती प्राप्त झाली तिचं वर्णन एकनाथांनी ज्या अभंगात केलं आहे, तो असा :

ध्येय ध्याता ध्यान।

अवघा माझा जनार्दन।। १।।

आसन शयनीं मुद्रा जाण।

अवघा माझा जनार्दन ।। २।।

जप तप यज्ञ यागपण।

अवघा माझा जनार्दन।। ३।।

भुक्ति मुक्ति स्थावर जाण।

अवघा माझा जनार्दन ।। ४।।

एकाएकीं वेगळा जाण।

अवघा भरला जनार्दन।। ५।।

सगळं काही माझा सद्गुरूच झाला आहे. ‘मी’ आणि ‘तो’ असा दोनपणा उरलाच नाही. ध्येय, ध्यान, ज्याचं ध्यान करावं तो आणि जो ध्यान करीत आहे तो, सारं काही माझा सद्गुरूच झाला आहे. त्या सद्गुरूशी ऐक्य पावल्यानं एका ‘मी’पणावेगळा झाला आहे, अहंभावावेगळा झाला आहे. सगळीकडे सद्गुरूच भरून आहे, ही जाणीव त्याला व्यापून उरली आहे. नाथ एका अभंगात म्हणतात, ‘‘सूर्य आहे डोळा नाहीं। तेथें पाहणें न चले कांहीं।। १।। सूर्य आणि दृष्टी दोन्ही आहे। परि दृश्य पाहणें नाहीं होय।। २।। सूर्य प्रकाशी रूपासी। एका जनार्दन स्वरूपासी।। ३।।’’ सूर्य आहे, पण दृष्टीच नसेल, तर दृश्य पाहणं होत नाही. सूर्य आणि दृष्टी दोन्ही आहे, पण पाहण्याची ओढच मावळली असेल, तरी दृश्याकडे मनाचं पाहणं होत नाही! सूर्य केवळ नश्वर जगाला दृश्यमान करतो, पण सद्गुरूरूपी सूर्य हा आत्मस्वरूपाचं दर्शन घडवतो. त्या दर्शनात एकनाथ एकरूप आहेत!

– चैतन्य प्रेम

 

Story img Loader