संमेलनाध्यक्षाची माळ गळय़ात पडली म्हणजे भरून पावलो, अशी बहुतेक साहित्यिकांची भावना असते आणि त्यासाठी साहित्य महामंडळ वा स्थानिक संयोजन समितीने केलेल्या भल्याबुऱ्या कृतींचा ते मूकपणे स्वीकार करतात.. गेल्या काही वर्षांतील या अनुभवाला अपवाद ठरणारे विश्राम बेडेकर, दि. बा. मोकाशी, विद्याधर पुंडलिक हे तिघेही दिवंगत साहित्यिक .. अर्थात तडजोड न स्वीकारणाऱ्या, तत्त्वाशी प्रामाणिक राहाणाऱ्या मोजक्याच साहित्यिकांनी ही जमात आजही टिकवली आहे..  
सुरुवातीपासूनच विविध वादांच्या गर्तेत सापडलेल्या चिपळूणच्या साहित्य संमेलनाचं सूप अखेर वाजलं. त्यातील एक महत्त्वाचा, साहित्य व्यवहाराशी अतिशय निगडित मुद्दा म्हणजे, मान्यवर साहित्यिकांची घाऊक गैरहजेरी. अर्थात मान्यवर कोणाला म्हणायचं, याही मुद्दय़ावरून वाद निर्माण होऊ शकतो. पण गेल्या शतकात या विशेषणाला निर्विवादपणे पात्र असलेल्या काही साहित्यिकांचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
मुंबईत १९८६ मध्ये झालेल्या हीरक महोत्सवी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कै. विश्राम बेडेकर यांचं या नामावळीत अतिशय वरचं स्थान आहे. साहित्य निर्मितीच्या बरोबरीने, किंबहुना काकणभर जास्तच बेडेकर चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत रमले. पण ‘रणांगण’ ते ‘एक झाड आणि दोन पक्षी’पर्यंत त्यांची प्रत्येक साहित्यकृती मैलाचा दगड ठरली. साहित्य संमेलनाच्या निवडणूक पद्धती वेळोवेळी वादग्रस्त ठरल्या आहेत. निवडणूक मान्यच नसलेले मंगेश पाडगावकरांसारखे साहित्यिक त्यापासून दूर राहिले. बेडेकरांनी तितकी टोकाची भूमिका घेतली नाही. निवडीसाठी अनिवार्य असलेले उमेदवारी अर्ज भरण्याची अट त्यांनी मान्य केली. मात्र त्याचबरोबर बिनविरोध निवडून दिलं तरच अध्यक्ष होईन, अशी आपल्या बाजूने अट घातली. त्यावेळी त्यांच्या विरोधात प्रसिद्ध विनोदी लेखक प्रा.द.मा.मिरासदार यांनी अर्ज भरला होता. पण बेडेकरांचं ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व मान्य करून मिरासदारांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बेडेकरांची बिनविरोध निवड झाली. ही बातमी सांगून त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेलो तेव्हा ते हसत हसत म्हणाले, ‘‘आता काय प्रतिक्रिया देणार? तरीसुद्धा, हा मिरासदारांचा विनोद नसेल असं समजतो!’’
रूढार्थानं निवृत्तीचं जीवन जगत असतानाही बेडेकरांकडे चित्रपटाच्या पटकथा-संवाद लेखनासाठी विचारणा होत असे. ज्येष्ठ गायक- संगीतकार सुधीर फडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चित्रपटाच्या पटकथा- संवादांसाठी त्यांना गळ घातली होती. बेडेकरांनी ती स्वीकारली. मानधनाचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही अशा विषयाला हात घालता आहात की ज्याच्या व्यावसायिक यशाची खात्री देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही द्याल ते मानधन मान्य करेन.’’ यातही विशेष बाब म्हणजे, सुरुवातीपासून वेळोवेळी मिळालेली मानधनाची रक्कम ते बाबा आमटे यांच्या आनंदवनाला देणगी म्हणून पाठवत असत. लेखन सुरू झालं. पण सावरकरांची अंदमानातून सुटका झाल्यानंतर पुढील प्रसंग कसे लिहायचे, असा बेडेकरांना प्रश्न पडला. कारण त्यानंतर दीर्घ काळ सावरकर राजकीय मंचावरून बाजूला फेकले गेले होते. निव्वळ प्रचारकी किंवा उदात्तीकरणाच्या पद्धतीचा चित्रपट बेडेकरांना अभिप्रेत नव्हता. त्यांना त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय नाटय़ हवं होतं. फडकेंशी या मुद्दय़ावर झालेल्या चर्चामधूनही हा पेच न सुटल्यानं त्यांनी पटकथेचं काम सोडलं.
मुंबईच्या संमेलनानंतर गेल्या सुमारे पंचवीस वर्षांतील साहित्य संमेलनाध्यक्षांच्या नामावळीवर नुसती नजर टाकली तरी त्यापैकी फारच मोजके बेडेकरांच्या रांगेला बसू शकतील अशा दर्जाचे होते, हे कटू सत्य स्वीकारावं लागतं. त्यातही अशा प्रकारे आपल्या लेखनाबाबत तात्त्विक भूमिका घेणं हे जणू साहित्यिकांचं कामच नव्हे, असं अलीकडच्या काळात प्रकर्षांने जाणवू लागलं आहे. संमेलनाध्यक्षाची माळ गळय़ात पडली म्हणजे भरून पावलो, अशी बहुतेकांची भावना असते आणि त्यासाठी साहित्य महामंडळ किंवा स्थानिक संयोजन समितीने केलेल्या अनेक भल्याबुऱ्या कृतींचा ते मूकपणे स्वीकार करतात. महाबळेश्वर असो की चिपळूण याचाच अनुभव सर्वानी घेतला आहे.
बेडेकर हे तुटक वागणारे, काही प्रमाणात उद्धटपणाचा आरोप झालेले साहित्यिक होते. पण त्यांच्याशी गट्टी जमली तर वयाचं अंतर सहज पार करून ते भरपूर गप्पा मारत असत. त्याचबरोबर काही कारणामुळे, एखाद्याने ‘तुम्ही माझ्याबद्दल उगीचच गैरसमज करून घेतला आहे,’’ असं म्हटलं तर, ‘‘असेलही. पण माणसं पुस्तकासारखी वाचता येत असती तर मग भेटण्यातली गंमतच निघून गेली असती, नाही का!’’ असं खास साहित्यिकी प्रत्युत्तर देऊन गप्प करत असत.
‘सती’ची लढाई
प्रा. विद्याधर पुंडलिक हे अर्वाचीन मराठी साहित्यातील आणखी एक वजनदार नाव. वरकरणी कृश, सौम्य प्रकृतीचे वाटणारे पुंडलिक साहित्यविषयक भूमिकांबाबत अतिशय ठाम असत. स्वा. सावरकरांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या ‘सती’ या कथेवरून मोठं वादळ उठलं होतं. पुंडलिकांना काळं फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली. विचित्र योगायोग म्हणजे, स्वत: पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. सत्यकथेच्या दिवाळी अंकात (१९७४) ही कथा प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे संपादक श्री.पु.भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण त्यांनी तडजोडवादी भूमिका घेतली नाही.
प्रमुख दिवाळी अंकांत पुंडलिकांचे कथा-लेख हमखास वाचायला मिळत. त्यातही ते वाक्यरचना व शुद्धलेखनाबाबत अतिशय सावध. ‘अशी चूक झाली तर जेवताना दाताखाली खडा आल्यासारखं वाटतं, बघ’, अशी त्यांची उपमा असायची. त्यामुळे प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराची प्रूफं वाचायला मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न असे आणि खिळे जुळवून कंपोझिंग करण्याच्या त्या काळात छापखान्यांचे फोरमन ती शक्यतो पुंडलिकांच्या हाती पडू नयेत, याची काळजी घ्यायचे. साप्ताहिक ‘माणूस’च्या दिवाळी अंकात त्यांची आवर्जून उपस्थिती असे. तिथल्या छापखान्याचे फोरमन पाध्ये यांनाही त्यांच्या या सावध वृत्तीचा धसका होता. त्याबद्दल एकदा त्यांना सहज विचारलं तेव्हा पाध्ये हसत हसत म्हणाले, ‘अहो, ते प्रूफांत दुसरी कथा लिहितात’!  ही पुंडलिकांच्या अतिसावधपणावर टिप्पणी असली तरी त्यातून परफेक्शनिस्ट पुंडलिकही व्यक्त होत होते.
साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा. पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असं नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला.
आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण  त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही. मात्र मनापासून वाटलं तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचं आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचं व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपलं.  
दास डोंगरी राहतो
पुण्यातील पुंडलिकांच्या घराच्या मागच्याच बाजूला व्यक्तिमत्त्वात कमालीची ऋजुता भरलेले दि. बा. मोकाशी यांचं घर होतं. एखाद्या देवळाच्या आवारात दोन देव गुण्या-गोविंदाने नांदत असावेत तसं ते वाटायचं. स्वाभाविकपणे एका ठिकाणी गेल्यानंतर दुसऱ्याही ठिकाणी पुणेरी पद्धतीने का होईना, हाक मारली जायची. स्वच्छ धुतलेला पांढरा लेंगा-झब्बा आणि गरजेनुसार हातात लहानशी कापडी पिशवी घेतलेल्या दिबांच्या वामनमूर्तीचा बहुतेक वेळा सर्वत्र सायकलवरून आणि उतारवयात पायी संचार असे. साप्ताहिक ‘माणूस’मध्ये त्यांनी लिहिलेलं ‘संध्याकाळचं पुणं’ हे सदर एकेकाळी अतिशय लोकप्रिय होतं. चेहऱ्यावर प्रसन्न स्मित घेऊन दिबा ‘माणूस’ कार्यालयात यायचे. वहीच्या आकाराच्या कागदांवर लिहिलेला मजकूर सोपवायचे. मान्यताप्राप्त लेखक असूनही त्यांना त्यावरच्या पहिल्या प्रतिक्रियेची उत्सुकता असायची. विनोबा भावे आणीबाणीत  ‘सरकारी संत’. आमच्यासारखे तरुण त्यांची स्वाभाविकपणे टवाळी करत. पण भारतीय तत्त्वज्ञानातील विनोबा हे चमकता तारा असल्याचा दिबांचा निष्कर्ष आणि तो पटवून देण्याचाही ते मनापासून प्रयत्न करत.
‘माणूस’चे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी परकीय अन्न मदतीला विरोध नोंदवण्यासाठी १९६७ च्या जानेवारी महिन्यात वेरुळपासून मुंबईपर्यंत ‘कैलास ते सिंधुसागर’ अशी पदयात्रा काढली होती. सुमारे दोन महिने चाललेल्या या पदयात्रेत दिबा सहभागी झाले. त्यावर आधारित त्यांची लेखमाला त्या काळात ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाली. पुढे त्याचं ‘अठरा लक्ष पावलं’ हे अतिशय रोचक शैलीतील पुस्तक निघालं. एखाद्या लेखकाने अशा तऱ्हेने पदयात्रा करत त्या प्रदेशाचा भूगोल, निसर्ग, समाजव्यवस्था आणि व्यक्तींच्या गाठीभेटींवर आधारित लेखन करणं मराठीमध्ये दुर्मीळच. यातील आणखी गमतीचा भाग म्हणजे, पदयात्रेमागची भूमिका स्पष्ट करणाऱ्या पत्रकातील भाषा, सूर पसंत पडलेला नसतानाही ‘प्रदेश पाहायला निघालेला लेखक’ या भूमिकेतून दिबा त्या पदयात्रेत सर्व तऱ्हेची गैरसोय सोसून सहभागी झाले होते.
दिबांची आर्थिक स्थिती तशी बेताची. पण त्याचं भांडवल करून सरकारी लाभ त्यांनी कधीच उपटले नाहीत आणि त्याबाबतचा नैतिक अहंकारही मिरवला नाही. साहित्य संमेलनं किंवा सार्वजनिक सभा-समारंभांमध्येही ते अभावानेच दिसत. एकूणच त्यांची वृत्ती ‘दास डोंगरी राहतो..’ अशी होती. अशा वृत्तीचा कोणी साहित्यिक अगदी गेल्या शतकाच्या उत्तरार्धात वावरत होता, यावर आज कदाचित कोणाचा विश्वासही बसणार नाही.
आजच्या जमान्यात बेडेकर, पुंडलिक, दिबांसारखे साहित्यिक उरलेलेच नाहीत, असं नाही. चिपळूणच्या संमेलनात अतिशय मोजक्या आणि नेमक्या शब्दात अभावग्रस्तांचं दु:ख मांडून व्यासपीठावरील राज्यकर्त्यां माय-बापांना साकडं घालणारे वसंत आबाजी डहाके किंवा शंकर वैद्य यासारख्या कवींनी आपली साहित्यिक-वैचारिक निष्ठा कसोशीनं जपली आहे. पण आता अशी माणसं झपाटय़ानं अस्तंगत होत असलेल्या जमातीसारखी झाली आहेत, याचं दु:ख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा