ख्रिस गेल नावाचे वादळ पुन्हा एकदा घोंघावले. त्याची पुणे वॉरियर्सविरुद्धची खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी असली तरी तोंडचे पाणी पळवणारीही होती. क्रिकेटमध्ये असे होऊ शकते का, आपण जे काही बघतोय त्यावर विश्वास बसत नव्हता. गेलची ही झंझावाती पहिली खेळी नक्कीच नव्हती, पण एवढे मोठे वादळ यापूर्वी आले नव्हते, हेदेखील तेवढेच खरे आहे. गेल सर व्हिव रिचर्ड्सच्या भूमीतला, त्याचा वारसा पुढे चालवणारा. यापूर्वीही गेलच्या अशाच भन्नाट खेळ्या साऱ्यांनीच अनुभवल्या आहेत. गेली दोनतीन वर्षे आयपीएलमध्ये तो सातत्याने धावांची टांकसाळ उघडताना दिसतो. त्याच्यापुढे कोणता गोलंदाज आहे किंवा कोणता संघ आहे याचे दडपण त्याच्यावर नसते, कारण कोणताही चेंडू सीमापार टोलवण्याचा विश्वास आणि धमक त्याच्यामध्ये आहे. त्याने ते सिद्धही करून दाखवले. ट्वेन्टी-२० हा क्रिकेटचा प्रकारच मुळात मारझोडीचा. प्रत्येक चेंडू हा टोलवण्यासाठीच असतो, चेंडूला सन्मान द्यायचा नसतो, हे ट्वेन्टी-२० चे ब्रीदवाक्य असावे आणि याची पुरेपूर अमलबजावणी गेल करताना दिसतो. ट्वेन्टी-२० च्या संस्कृतीमध्ये बसणारा चोख खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. पुणे वॉरियर्स हा आयपीएलमधला काही दादा संघ नक्कीच नाही. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही त्यांची हाराकिरी बऱ्याच वेळा पाहायला मिळाली आहे. गेलने पुण्यासारख्या कमकुवत संघासमोर नाबाद १७५ धावांची खेळी साकारली तरी त्याचे मोल कमी होत नाही. परंतु क्रिकेटप्रेमींनी (किंवा गेल-प्रेमींनी) जरा आठवून पाहावे, गेलचा कधीकधीचा खेळ लक्षात राहिला. तो आपल्याला जास्त आठवतो ते आयपीएलच्या खेळींमधला. आयपीएलमध्ये त्याच्या बऱ्याच खेळ्या अविस्मरणीय अशाच आहेत, पण वेस्ट इंडिजकडून खेळताना गेलच्या तुम्हाला कोणत्या खेळी आठवतात, हे जरा तपासून पाहा. पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यातले त्याचे शतक आठवते, संघात पुनरागमन केल्यावर कसोटी सामन्यातील त्याचे दीडशतक आठवते, पण यापुढे काहीच आठवत नाही. याचे कारण देशासाठी एवढय़ा सातत्यपणे गेल खेळलेलाच नाही, मग इथे एवढा सातत्यपूर्ण का खेळतो, याचे उत्तर आर्थिक गणितामध्ये दडलेले आहे. दोनेक वर्षांपूर्वी याच गेलला वेस्ट इंडिजच्या संघातून काढून टाकले होते. तेव्हा त्याला चिंता नव्हती, कारण आयपीएलमध्ये त्याचे चांगलेच बस्तान बसलेलेच होते. आयपीएलमधल्या नावलौकिकामुळे त्याने बिग बॅश लीग आणि श्रीलंकेतील लीगमध्ये खोऱ्याने पैसे ओढले होते. वेस्ट इंडिज मंडळाने त्याला संघात पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्यावर आडमुठेपणा करीत गेलने मी काही सामन्यांसाठी उपलब्ध नाही, असे सांगितले होते. कारण एवढे पैसे लीगमध्ये मिळत असताना देशासाठी घाम कोण गाळेल, अशीच भावना त्याच्या मनात असावी. पूर्वीची पिढी नक्कीच अशी नव्हती. त्यांच्याकडे अफाट गुणवत्ता होती, पण नशिबी एवढा पैसा नव्हता. त्या वेळी त्यांना काही देशांच्या स्थानिक सामन्यांमध्ये खेळण्यासाठी पैसे मिळायचे, पण त्या वेळीही कौंटीचा सामना असतानादेखील मुंबईतली कांगा लीग खेळायला सुनील गावस्कर आवर्जून यायचे. तो काळ वेगळा होता म्हणा. त्या वेळी देश हाच देव ही भावना मनात होती. आता पैसा हा देव झाल्यामुळे संघ, खेळ आणि देश दुरावले आहेत, पण याची फिकीर कोणाला.
गेलची टांकसाळ..
ख्रिस गेल नावाचे वादळ पुन्हा एकदा घोंघावले. त्याची पुणे वॉरियर्सविरुद्धची खेळी डोळ्याचे पारणे फेडणारी असली तरी तोंडचे पाणी पळवणारीही होती. क्रिकेटमध्ये असे होऊ शकते का, आपण जे काही बघतोय त्यावर विश्वास बसत नव्हता.
First published on: 25-04-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris gayle runs mint