धूम्रपानामुळे कर्करोग होतो, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. तंबाखू आणि सिगारेटच्या कंपन्याच, नाइलाजाने आणि कायद्याच्या धाकाने का होईना, पण तशी जाहिरात करीत असतात. तरीही लोक तंबाखूसेवन आणि धूम्रपान करतातच. जगात सिगारेटच्या सहा मोठय़ा कंपन्या आहेत. त्या दर वर्षी सुमारे ५०० अब्ज डॉलरचा व्यवसाय करतात आणि ३५ अब्ज डॉलरचा नफा कमावतात. ही आकडेवारीही दोन वर्षांपूर्वीची आहे. मधल्या काळात हा नफा वाढलाच असेल. याचा अर्थ लोकांमधील धूम्रपानाचे प्रमाण वाढतेच आहे. परिणामी त्यामुळे मरणारांचे प्रमाणही वाढतेच आहे. आता याला जबाबदार कोण? धूम्रपानामुळे कर्करोग होतो हे माहीत असूनही धूम्रपान करणारे लोक, की तशी कल्पना आधीच देऊन आपला माल विकणाऱ्या कंपन्या? प्रश्न अवघड आहे. एखादी गोष्ट आपल्या आरोग्यास हानीकारक आहे हे माहीत असूनही तुम्ही ती घेता, तेव्हा त्याच्या परिणामांची जबाबदारी तुमच्यावरच असते, असे सर्वसामान्य सामान्यज्ञान सांगते. परंतु अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एका न्यायालयाने या तर्कालाच सुरुंग लावला. हा नेहमीचा युक्तिवाद बाद ठरवत या न्यायालयाने सिगारेटचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यापासून होणाऱ्या हानीस जबाबदार ठरवले. अतिरेकी सिगारेटसेवनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला सुमारे १.४४ लाख कोटी रुपये एवढी नुकसानभरपाई संबंधित कंपनीने द्यावी, असा आदेश या न्यायालयाने दिला. सगळ्याच सिगारेट कंपन्यांना ठसका लागेल असा हा निकाल आहे. या निकालाने अमेरिकेत खटल्यांचे मोहोळच उठणार आहे. ते का, हे समजून घेण्यासाठी या खटल्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल. मायकल रॉबिन्सन हा गृहस्थ एका हॉटेलच्या बसचा चालक होता. दिवसाला एक ते तीन पाकिटे तो ओढायचा. वयाच्या ३६व्या वर्षी सिगारेट ओढत ओढतच तो गेला. ही घटना १९९६मधली. त्यावर त्याची पत्नी सिंथिया न्यायालयात गेली. आर जे रेनॉल्ड्स ही अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची सिगारेट कंपनी. कॅमल, कूल, पॉल मॉल, विन्स्टन हे गाजलेले ब्रँड या कंपनीचेच. तिच्याविरोधात सिंथियाने खटला दाखल केला. १९९४ मध्ये बडय़ा तंबाखू कंपन्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अनेक खटल्यांचा एक भाग म्हणून तो चालला. त्यावर तंबाखू कंपन्यांनी सर्वाना मिळून १४५ अब्ज डॉलर नुकसानभरपाई द्यावी असा आदेश न्यायालयाने २००० मध्ये दिला. पण हा ऐतिहासिक निकाल फ्लोरिडाच्या उच्च न्यायालयाने धुडकावून लावला. मात्र त्या वेळी न्यायालयाने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. एक – या खटल्यातील दावेदारांना स्वतंत्रपणे खटले भरता येतील. आणि दोन – सिगारेट कंपन्या चुकार असून, त्या तयार करीत असलेल्या सिगारेटमुळे आजार होतात हे आधीच्या खटल्यातील निष्कर्ष योग्य आहेत. त्यामुळे सिंथिया हिने २००८ मध्ये आर जे रेनॉल्ड्सविरोधात खटला भरला. सिगारेटमध्ये घातक रसायने आहेत हे या कंपन्यांना माहीत होते. सिगारेटचे व्यसन लागते हेही त्यांना ठाऊक होते. तरीही त्या ‘खोटेपणाने’, ‘खराब’ माल विकत होत्या असा तिचा दावा होता. न्यायालयाने तो मान्य केला. त्यावर कंपनीने बरीच आदळआपट केली. सर्वोच्च न्यायालयात अपील करू अशी धमकी दिली. तेथे काहीही होऊ शकेल. अखेर हा बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्याचा प्रश्न आहे आणि त्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. फ्लोरिडातील या निकालाने संपूर्ण जगभरात एक चांगला संदेश जाण्याची शक्यता मात्र निर्माण झाली, हे शंभर टक्के खरे, पण तो संदेश लोकांच्या लक्षात किती राहतो हा भाग वेगळा. अखेर मार्लबरो सिगारेटच्या जाहिराती करणारे पाच रांगडे रुबाबदार नट धूम्रपानामुळे जिवास मुकले, हा भयावह तपशील लक्षात राहण्याऐवजी लोकांच्या ध्यानात राहतात त्या सिगारेटच्या मर्दानी जाहिरातीच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा