वेषांतर आणि शब्दज्ञान एवढय़ानं काहीच साधणार नाही. वृत्त्यांतर आणि ज्ञानानुभव यानंच साधेल आणि त्यासाठी आजची आपली मनोरचना बदलावीच लागेल. आपल्या सवयींना मुरड घालावी लागेल. श्रीमहाराज सांगतात, ‘‘परमार्थ वेषांतरात नसून वृत्त्यंतरात आहे. अगदी ठरावीक पद्धतीने वेष केला परंतु वृत्ती सुधारली नाही तर परमार्थ नाही. तसेच पुस्तकी ज्ञानांतही तो नाही. त्याला कृतीशिवाय, आचरणाशिवाय मार्ग नाही. जे अनुभवाशिवाय समजणार नाही ते शब्दाने कसे पटवून देता येईल?’’ (बोधवचने, क्र. ९०१). परमार्थाचा जो अनुभव आहे तो व्यापक आहे. जो संकुचित आहे त्याला तो कसा साधेल? त्यासाठी उपाय एकच जो संकुचित आहे त्यानं व्यापक व्हायची साधना केली पाहिजे. मी भयाच्या पकडीत असताना निर्भयतेचा अनुभव कसा घेईन? मी द्वैताच्या पकडीत असताना अद्वैताचा अनुभव कसा घेईन? दुखाच्या कचाटय़ात असताना परमानंदाचा अधिकारी कसा होईन? ते होणं, हे ध्येय मात्र आहेच. मग त्यासाठी सुरुवात माझ्या सवयींना नख लावण्यापासून झाली पाहिजे. आपल्याला अनंत सवयी आहेत. त्यातल्या काही स्थूल रूपानं दिसतात, काही अतिशय सूक्ष्म असतात. सवयी मोडायच्या, आंतरिक परिवर्तन साधायचे तर आतमध्येच उतरावे लागते. मनाकडेच वळावे लागते. त्यामुळे अध्यात्मशास्त्र हे मानसशास्त्रच आहे! या ‘मानसशास्त्रा’चा विचार आता आपण सवयींपासून सुरू करणार आहोत. आपल्याला अनेकानेक सवयी जडल्या आहेत आणि त्या सर्वच स्वार्थमूलक आहेत. त्या सवयींच्या पूर्तीचे ठिकाण आहे घर! श्रीमहाराज सांगतात, ‘‘माणूस प्रपंचात जसा तयार होईल तसा जंगलात जाऊन तयार होणार नाही. प्रपंच शिक्षणाकरिता आहे’’ (बोधवचने, क्र. ८६४). ‘‘आपला प्रपंच विश्वातील एक भाग आहे. तो अभ्यासाकरताच आहे. ज्याने प्रपंच जिंकला त्याने जग जिंकले. ज्याने आपल्याला जिंकले त्याने प्रपंच जिंकला. मी देवाचा दास झालो तर मीजिंकला जाईल’’ (बोधवचने, क्र. ८६२). ‘‘घरातल्याइतके बाहेर स्वार्थी संबंध नाहीत. म्हणून घरामध्ये नि:स्वार्थ होणे कठीण असते. घर जिंकणे हा पहिला मार्ग आहे’’ (बोधवचने, क्र. ८६३). या वचनांमध्ये अत्यंत सखोल अर्थ भरून आहे. आपला प्रपंच, आपलं घर हे आपल्या सवयीचं हक्काचं ठिकाण आहे. हा प्रपंच म्हणजे ‘मी’ आणि ‘माझे’चा पाया आहे. त्यात राहूनच सवयींना मुरड घालायचे अर्थात ‘मी’पणा सोडण्याचे प्रयत्न सुरू करता येतील. आपला ‘मी’पणा कधीच नष्ट होत नाही पण जगात वावरताना आपण तो चलाखीने लपवतो. बाहेरच्या जगातली प्रत्येक कृती ही या ‘मी’पणाच्याच ओढीतून होत असली तरी आपण स्वार्थ लपवू पाहातो आणि आपल्या कृतीला तात्त्विक आधार असल्याचे भासवतो. घरात मात्र आपला ‘मी’पणा उघडाच पडतो. घरात नि:स्वार्थ होण्याची सवयच आपल्याला नसते. त्यामुळे घर जिंकायला महाराज सांगतात. आता हे जिंकणे आहे कसे?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा