भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांनी इस्रायल हे स्वतंत्र राष्ट्र जगाच्या नकाशावर अवतरले. त्याला आता ६६ वर्षे झाली, पण तेव्हापासून आजतागायत तेथे हिंसा, त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंसा, त्याची प्रतिक्रिया म्हणूनही हिंसा असे चक्र सुरू आहे. हा खरे तर पॅलेस्टिनी अरब विरुद्ध इस्रायल असा संघर्ष. पॅलेस्टिनींच्या दृष्टीने तो स्वातंत्र्यलढा आहे, तर इस्रायल त्याला फुटीरतावादी बंड मानते. बहुसंख्य अरब हे मुस्लीम आणि इस्रायल हा ज्यूंचा देश असे असले तरी या संघर्षांच्या केंद्रस्थानी धर्म ही बाब नव्हती. आज मात्र तसे म्हणता येणार नाही. जेरुसलेममधील एका ज्यू प्रार्थनास्थळी- म्हणजे सिनेगॉगमध्ये परवा झालेल्या हत्याकांडाने इस्रायल-पॅलेस्टिन संघर्ष धार्मिक वळणावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे सहा महिन्यांपासून जेरुसलेममध्ये हा उद्रेक सुरू आहे. इस्रायलव्याप्त वेस्ट बँकमधील काही दहशतवाद्यांनी तीन ज्यू तरुणांचे अपहरण करून त्यांना ठार मारले. त्याचा बदला म्हणून काही ज्यूंनी एका पॅलेस्टिनी मुलाला जिवंत जाळले. ही घटना जुलैमधली. तेव्हापासून ५० दिवस गाझा पट्टीतील घरे, माणसे यांची धुळधाण इस्रायलने केली होती. पण संघर्षांला वैराचे स्वरूप आले आणि त्याला खतपाणी मिळत राहिले की चकमकींना कशामुळे आणि कोणामुळे सुरुवात झाली अशा गोष्टींना काहीच अर्थ उरत नसतो. जेरुसलेममधील आताच्या हिंसाचारामागे तेथील धार्मिक स्थळांवर मालकी कोणाची हा वाद आहे. तीन मोठय़ा धर्माना जोजविणारी ही भूमी धार्मिक वादातून रक्तरंजित होत आहे आणि इस्रायली व पॅलेस्टिनी नेत्यांचीही हतबलता अशी की ते थांबविणे आता त्यांच्याही हाती नाही. चौदा वर्षांपूर्वी इस्रायलमध्ये दुसरा इंतिफादा झाला. पण ते हल्ले बहुतांशी संघटित होते. विचारपूर्वक योजना आखून केलेले होते. त्यामुळे त्यांचा मुकाबला करणे हे इस्रायली लष्कर आणि गुप्तचर संघटनांना शक्य झाले. २००४ नंतर ते बंडही शमले. या वेळचा संघर्ष मात्र पूर्णत: वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याला धार्मिक कट्टरतेचा रंग तर आहेच, पण तो असंघटित आहे. शिवाय तो देशांतर्गत आहे. जेरुसलेमचे ढोबळ दोन भाग. एक इस्रायलव्याप्त पॅलेस्टाइनचा आणि दुसरा इस्रायलचा. या भागांमध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिक राहतात. त्यांना विशिष्ट ओळखपत्रे दिलेली आहेत. त्याआधारे ते तेथे मुक्त संचार करू शकतात. त्यातील कोणी तरी उठतो आणि हल्ला करतो. सिनेगॉगमधील हत्याकांड घडविणारे तरुण हे इस्रायली नागरिकच होते. बंदुका आणि मोठे सुरे घेऊन ते प्रार्थनागृहात घुसले आणि समोर दिसेल त्याला मारत सुटले. पोलिसांच्या गोळ्यांना तेही बळी पडले. त्याआधी काही दिवस एका माथेफिरूने अशाच प्रकारे आपल्या वाहनाखाली काही पादचाऱ्यांना चिरडले होते. असे हल्ले रोखणे हे अवघड काम असते. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल सरकारने ताबडतोब त्या हल्लेखोरांची घरे बुलडोझर लावून पाडून टाकली. हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना अशी शिक्षा मिळाली की पुढचे शहाणे होतील हा त्यामागचा उद्देश. पण तो सफल होताना दिसत नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देण्याची जी घोषणा पुन्हा केली आहे, त्यातच त्यांच्या आधीच्या योजनांचे अपयश समोर येते. परवाच्या हत्याकांडाचा निषेध पॅलेस्टाइन सरकारसह सगळ्या जगाने केला आहे. पण हमास या पॅलेस्टिनी बंडखोर संघटनेने मात्र त्यानंतर मिठाई वाटली. हे काही बरे लक्षण नव्हे. एकीकडे इसिससारखी संघटना मध्य-पूर्वेत हातपाय पसरू पाहत असताना इस्रायलही धार्मिक संघर्षांच्या वळणावर जाणे ही फारच गंभीर बाब आहे.

Story img Loader