अमेरिकेत मिळणाऱ्या बहुतांश बहुमानांमध्ये आता एका तरी भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश असतोच. भारतीय वंशाचे हे महत्त्व सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही कायम राहिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष यांचे कार्यालय व्हाइट हाऊसमधून नुकतेच सौर ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर काम करणाऱ्यांची ‘सोलार चँपियन्स ऑफ चेंज’ ही यादी जाहीर केली गेली. यात भारतीय वंशाचे अमेरिकन प्राध्यापक डॉ. राजेंद्र सिंग यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रसिद्धी माध्यमांपासून फार दूर असलेले हे नाव या यादीत येताच त्यांच्या संशोधनाविषयी सामान्यांमध्ये चर्चा होऊ लागली. डॉ. सिंग यांनी पर्यायी ऊर्जेवर मोठय़ा प्रमाणावर अभ्यास केला असून त्यांनी केलेल्या संशोधनांमध्ये सोलर सेलचे संशोधन हे सर्वात मोठे मानले जात आहे. त्यांच्या या संशोधनावर आधारित एका धडय़ाचा अनेक पाठय़पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर जगभर या संशोधनासाठी त्यांना विविध सन्मानही दिले गेले आहेत.
डॉ. सिंग हे मूळचे भारतीय असून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण भौतिकशास्त्रात आग्रा विद्यापीठातून पूर्ण केले. यानंतर त्यांनी भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत पदव्युत्तर पदवी शिक्षण मीरट विद्यापीठातून पूर्ण केले. यानंतर त्यांनी थेट कॅनडा गाठले. येथे सन १९७९मध्ये त्यांनी हॅमिल्टन येथील मॅकमास्टर विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पूर्ण केली. १९८० मध्ये ते ‘एनर्जी कन्झर्वेशन डिवायसेस’मध्ये वरिष्ठ संशोधक वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. तेथेच त्यांनी सोलार सेलचा शोध लावला. १९९२ मध्ये ते स्लेमसन विद्यापीठात पहिले डी. हौसेर बँक प्राध्यापक म्हणून इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकी विभागात दाखल झाले. यानंतर ते सन १९९६ ते १९९९ या कालावधीत स्लेमसन विद्यापीठातील पदार्थ विज्ञान आणि अभियांत्रिकी या विशेष कार्यक्रमाचे संचालक झाले. हे पद भूषवीत असतानाच सन १९९७ मध्ये विद्यापीठाने त्यांना सिलिकॉन नॅनोइलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या संचालकपदाचीही धुरा सोपवली. येथे त्यांच्या संशोधनांना आणखी वाव मिळत गेला आणि त्यांनी पर्यायी ऊर्जास्रोतांमध्ये विविध स्तरांवर जाऊन संशोधन केले. त्यांच्या जलद उष्मा प्रक्रिया आणि सेमी कंडक्टर उपकरण उत्पादन क्षेत्रातील मूलभूत संशोधनाचा फायदा या उद्योगाला इतका झाला आहे की, ते उद्योग आता अब्जावधी डॉलर्सची कमाई करत आहेत. डॉ. सिंग यांना त्यांच्या ऊर्जा क्षेत्रातील विविध संशोधनांबद्दल त्यांच्याच विद्यापीठाने १९९७ मध्ये उल्लेखनीय संशोधन पुरस्कार देऊन सन्मानित केले. गेली ३५ वष्रे शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रात वावरणारे डॉ. सिंग हे सध्या सिद्धान्त मांडून ते सिद्ध करून जगाला नवे काही तरी देणारे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून विज्ञान क्षेत्रात ओळखले जात आहेत.
डॉ. राजेंद्र सिंग
अमेरिकेत मिळणाऱ्या बहुतांश बहुमानांमध्ये आता एका तरी भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश असतोच. भारतीय वंशाचे हे महत्त्व सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही कायम राहिले आहे.
आणखी वाचा
First published on: 21-04-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clemson university professor dr rajendra singh amongst white houses solar champions of change list