नारायण राणे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारख्या हस्तलकवा न झालेल्या नेत्यांच्या कर्तबगारीचा डंका सर्वत्र वाजत असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा निर्मोही राहिले, ही तशी घोडचूकच. आता मात्र शरद पवारसाहेबांच्या मतांचे गांभीर्य पृथ्वीराजबाबांना जाणवेल तो क्षण त्यांच्या उत्कर्षांरंभाचा असेल..
..तरी आम्हाला संशय होताच. तो असा की धोरणलकव्याची प्रदीर्घ बाधा झालेल्या मनमोहन सिंग यांच्या चाणाक्ष अर्थनजरेखाली उमेदवारी करणारे पृथ्वीराजबाबा चव्हाण यांचा हात स्थिर कसा? सर्वसाधारण मानवी अनुभव असा की गुरूची लकब ही नकळतपणे विद्यार्थ्यांत उतरते. त्यात पृथ्वीराजबाबा हे तर शालेय कालापासून अत्युत्कृष्ट विद्यार्थी. पंतप्रधान सिंग यांच्याप्रमाणेच पृथ्वीराजबाबांनीही कधी आपला पहिला क्रमांक सोडला नाही. इतकेच काय आपल्या शालेय वा महाविद्यालयीन काळात गृहपाठ करावयाचा राहिल्याबद्दल वर्गशिक्षकांवर या दोघांना रागे भरण्याची वेळ आली असेही कधी घडले नाही. पुढे राजकारणात आल्यावर दोघांचीही गृहपाठाची सवय कधी चुकली नाही. सोनिया मॅडम यांच्यासमोर सादर होताना तोंडी आणि लेखी परीक्षेत या दोघांनीही पैकीच्या पैकी गुण कमावलेले. अर्थात यातील कवतिकाचा भाग हा लेखी परीक्षेचाच, हे आपण लक्षात घ्यावयास हवे. तोंडी परीक्षेत दोनच शब्दांना महत्त्व. यस मॅडम. परंतु ते उच्चारण्यातसुद्धा या दोघांनी कधीही गल्लत केली नाही आणि त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचीच कधी गफलत झाली नाही. आणि ती न झाल्यामुळे दोघांच्याही विरोधात कधी कोणी गहजब करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. जेव्हा गुरू आणि शिष्य इतके तादात्म्य पावलेले असतात तेव्हा गुरूच्या लकबी या नकळतपणे शिष्यात उतरल्या तर ते नैसर्गिकच. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे त्यांचे पट्टशिष्य पृथ्वीराजबाबा हेदेखील हस्तलकव्याने पीडित असतील तर ते तसे साहजिकच. परंतु सर्वसामान्य जनतेस इतके कुठले कळायला. तेव्हा अशा अज्ञ आणि मूढ जनतेस या महाराष्ट्राचा विकास का बरे होत नाही, याचे इतके दिवस गुलदस्त्यात असलेले कारण राज्याचे विकासगुरू मा. शरदरावजी पवार यांनी स्पष्ट करून सांगितले याबद्दल समस्त लेखकूंच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. या विकासाच्या आड येणारे हात कोणाचे आहेत, हे प्रथम आम्हाला कळणे महत्त्वाचे. कारण राज्याची प्रगती एक्स्प्रेस कोणामुळे अडून आहे, हे आम्हालाच कळले नाही तर आम्ही वाचकांना काय सांगणार? आणि आमचे माध्यम हे लिहिण्याचे त्यामुळे अडचणही अधिक. कशातील काहीही माहीत नसताना केवळ स्वरयंत्राच्या आधारे कॅमेऱ्यासमोर बोलून बोलून हात दुखवून वेळ काढण्याची सोय आम्हास नाही. त्यामुळे आम्हास पवार साहेबांच्या विधानाचे कवतिक अधिक. दोन दिवसांपूर्वी पुण्यनगरीत भाष्य करताना रा. रा. पवार साहेबांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची अकार्यक्षमता उघड करीत त्यांच्या हातास लकवा भरला असल्याचे गुहय़ज्ञान चव्हाटय़ावर आणल्यापासून आम्हीच शंकानिरसनाचे समाधान उपभोगीत आहोत. आम्हास समाधानी वाटण्याची कारणे अनेक.
त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीराजबाबा यांचा हात थरथरत असेल तर मा. पवार यांच्याइतके अधिकारवाणीने अन्य कोणीही सांगू शकणार नाही, याची आम्हास खात्री आहे. म्हणजे पवार साहेबांनी दिलेली माहिती शंभर टक्के अचूक आहे. सोनियाबाईंच्या विदेशीपणाचा आपणच निर्माण केलेला मुद्दा वळकटीखाली दडवून पवार साहेबांनी ज्या क्षणी पळीपंचपात्रासह काँग्रेसदारी हजर होत मॅडमच्या हातावर आपले घडय़ाळ बांधले तेव्हापासूनच आम्हाला ठाऊक होते की हात हलायचा थांबला की ते पहिल्यांदा वरच्या घडय़ाळास कळणार. अगदी तसेच झाले. आम्हाला आश्चर्य याचे की हा हस्तलकवा मा. पवार साहेबांनी इतके दिवस सहन केलाच कसा, याचे. कारण पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यापासूनच त्यांच्या या आजाराची लक्षणे दिसत होती. त्यामुळेच पवार परिवार आणि सहकार यासाठी महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळच पृथ्वीराजबाबांनी घरी धाडले. केवढे हे पाप! ज्या राज्यात सहकाराच्या नावावर अनेकांचे खासगी मळे फुलले, ज्या राज्यात सहकारमहर्षी अशी उपाधी मिरवणारे अनेक नवे सुभेदार तयार झाले आणि ज्या राज्यात सहकार आणि स्वाहाकार यातील दरी कालपरत्वे पुसली गेली त्या राज्यातील मध्यवर्ती सहकारी बँक बरखास्त करणे म्हणजे काशीस जाऊन गंगेकाठच्या पंडय़ांनाच हटवण्यासारखे. ते पाप पृथ्वीराजबाबांनी केले. ग्रामीण भागात जे स्थान आणि उद्योग सहकारमहर्षीचे ते स्थान आणि त्याच्या कैकपट मोठे उद्योग मुंबई आदी शहरात बिल्डर नामक जमातींचे. या बिल्डरांचा आशीर्वाद असल्याखेरीज शहरात एक पान हलत नाही काय.. फुलतही नाही. तेव्हा अशा सामथ्र्यवंत बिल्डरांनादेखील पृथ्वीराजबाबांच्या हस्तलकव्याचा फटका बसला. बिच्चारे बिल्डर्स. ते तरी किती सहन करणार. या महागाईच्या दिवसांत इतके पैसे अडकले असतील विविध प्रकल्पांत आणि पृथ्वीराजबाबा सह्य़ाच करत नसतील तर त्यांनी करायचं तरी काय? बिल्डरबलवा कितीही डायनामिक असला म्हणून काय झालं? त्यालाही कधी ना कधी असाहाय्य वाटणारच ना? शेवटी बिल्डर झाला तरी माणूसच आहे तो. तेव्हा अशा रंजल्यागांजल्यांना वाली तरी कोण असणार दुसरा? ते गेले असतील पवार साहेबांकडे तक्रार करायला.. म्हणून असं कसं म्हणता येईल त्यांचं चुकलं? आणि अशा वेळी साहेबांनी अश्रू पुसले त्यांचे तरी त्यात गैर ते काय? त्या वरळी हाजीअली सी लिंकचेही तसेच. कित्येक हजारो कोटींचा तो पूल प्रकल्प. आपल्या खिशातले का जाणार आहेत पैसे त्यासाठी. तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याचे खासगी हितचिंतक मंत्री छगन भुजबळ यांनी धरला त्या प्रकल्पाचा आग्रह तर बिघडले काय? पण नाही. तिथेही पृथ्वीराजबाबांचा हात थरथरणार. चांगले पुलावरनं भरधाव जायचे सोडून हे म्हणणार किनारी रस्ता बांधा. त्यात कोणती आलीयेत मोठी कंत्राटे. चार जणांचेही भले करता यायचे नाही. पण हस्तलकव्याबरोबर विचारलकवा आला की इतरांच्या हिताचा विचार कसा काय येणार पृथ्वीराजबाबांच्या मनात. ग्रामीण भागाबद्दलही तसेच. आता धरणे बांधून तयार व्हायला लागला वेळ, कालव्यांचा खर्च झाला दुप्पट किंवा चौपट तर त्यात एवढे दु:ख करायचे कारणच नाही हे पृथ्वीराजबाबांना कळतच नाही. खरे तर ते त्यांना शिकायला मिळावे याच उदात्त हेतूने मा. पवार यांनी आपला कर्तबगार पुतण्या अजित यांस पृथ्वीराजबाबांच्या दिमतीला दिलेला आहे. पण त्यांच्यात काही फरकच नाही. इतका चांगला सहकारी मिळालेला असतानाही पृथ्वीराजबाबांचा पाटबंधारे प्रकल्पांचा हस्तलकवा काही जात नाही. वर उलट त्याबाबतच्या खर्चाची श्वेतपत्रिका वगैरे काढायचा आग्रह धरणार ते? विकासाला नाही का खीळ बसणार यामुळे? हे कोणी तरी त्यांना सांगायला हवेच. त्यांना कोणी तरी यातील काही शिकवण्याची गरज होतीच. एक साखर कारखाना नाही की दुग्धउत्पादन संघ नाही, हाताशी एखादी सहकारी बँक आहे म्हणावे तर तेही नाही. गेलाबाजार एखादा बिल्डर वगैरे तरी पदरी बाळगायचा तर त्यातही अपयशच. बरे नारायण राणे, भुजबळ अशा मान्यवरांकडून धडे घ्यावेत तर त्यासाठी तयारी नाही.
तेव्हा आदरणीय पवारसाहेब पृथ्वीराजबाबांच्या हस्तलकव्याबाबत जे काही बोलले ते योग्यच याबाबत आमच्या मनात तिळमात्रही संदेह नाही. त्यांच्या मतांचे गांभीर्य पृथ्वीराजबाबांना जाणवेल तो क्षण त्यांच्या उत्कर्षांरंभाचा असेल, याहीबाबत आम्हास शंका नाही. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा पृथ्वीराजबाबांचे हितचिंतकदेखील म्हणतील :
बरे झाला बाबा। बोलले काका ।
अन्यथा कपाळमोक्ष। ठरलेला ॥