राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर वर्षे पूर्ण होतील. त्यानिमित्त २०२५-२६ हे शताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्याची जोरदार तयारी संघ करत आहे. वर्षभरासाठी कार्यक्रमांची आखणी केली जात असून त्यावर बेंगळुरूमधील बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. २१ ते २३ मार्च अशा तीन दिवसांमध्ये संघाची बैठक होईल. तिला देशभरातील प्रांत व क्षेत्र स्तरावरील सुमारे १५०० कार्यकर्ते उपस्थित राहतील, शिवाय, संघाच्या विविध संघटनांचे प्रमुख, त्यांचा राष्ट्रीय महासचिव, संघटना सचिव असे सर्व पदाधिकारीही हजर असतील. संघ शताब्दी कशी साजरी करेल हे याच महिन्यामध्ये स्पष्ट होईल! संघाच्या दरवर्षी होणाऱ्या प्रतिनिधी सभेकडं संघविचारांशी निगडित सगळ्यांचं लक्ष असतं, कारण त्यातील विचारमंथनातून निघालेले ‘आदेश’ घेऊन कार्यकर्ते नव्याने कामाला लागतात. शिवाय, शताब्दी वर्षात कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रीय कार्या’ची विशेष जबाबदारीही दिली जाऊ शकते. संघाने २०२४-२५ मध्ये काय केले याचा आढावा घेतला जाईल. त्यावर चिंतन होईल. मग, पुढील वर्षाचा कार्यक्रम ठरवला जाईल. संघाच्या या बैठकीमध्ये दोन राष्ट्रीय मुद्द्यांवर ठराव संमत केले जाणार आहेत. ते कोणते हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी दस्तऐवजासंदर्भात (एनआरसी) बैठकीमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते. पाच वर्षांपूर्वी भाजपने ‘एनआरसी’चा मुद्दा आक्रमकपणे हाताळला. त्यावरून देशभर आंदोलनही झालं होतं. त्यानंतर भाजपने एक पाऊल मागं घेत ‘एनआरसी’वर भाष्य करणं टाळलं. यावर्षी आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत असून तिथं हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता मांडली जात आहे. पण, त्याआधी संघाकडून ‘एनआरसी’च्या मुद्द्याची भाजपला आठवण करून दिली जाऊ शकते. या बैठकीमध्ये संघाच्या सामाजिक कार्याचाही आढावा घेतला जाणार आहे. समाजात पाच टप्प्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या ‘पंच परिवर्तन’ या संघाच्या अजेंड्याचाही आढावा घेतला जाईल. लोकांमध्ये भारतीय मूल्यांसह ‘स्व’ची भावना निर्माण करणं, कौटुंबिक मूल्यं आत्मसात करणं, सामाजिक सौहार्द वाढवणं, पर्यावरणस्नेही जीवनपद्धतीचा अवलंब आणि नागरी कर्तव्य बजावणं अशी ही पंचसूत्री आहे. शिवाय, बैठकीमध्ये हिंदू जागृतीच्या कार्याचंही मूल्यमापन केलं जाणार आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे सहभागी होतील. त्यामुळं या बैठकीतील दिशानिर्देशांकडं भाजपचंही लक्ष असेल.
नड्डांचं देवदर्शन…
भाजपचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सध्या देवदर्शनामध्ये मग्न आहेत. हे करताना त्यांनी सरकारी कर्तव्य बाजूला ठेवलं असं नाही. पाच वर्षं भाजपचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर या पदावरून पायउतार होण्याआधी कदाचित नड्डा आशीर्वाद घेण्यासाठी जात असावेत. प्रयागराजला जाऊन नड्डांनी गंगेत स्नान केलं. बनारसला काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. जम्मूमध्ये कटराला जाऊन वैष्णवदेवीचं दर्शन घेतलं. त्याआधी पुरीमध्ये जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले. अर्थात प्रत्येक ठिकाणी नड्डा भाजपच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हे कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी देवदर्शन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नड्डांना आणखी काही दिवस काम करता येईल. पक्षाच्या देशभरातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन नड्डा एकप्रकारे एक वर्तुळ पूर्ण करत आहेत. केंद्रीयमंत्री हरदीप पुरींच्या म्हणण्यानुसार, मार्च महिन्याच्या मध्यात भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकेल. असं झालं तर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच कदाचित भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली जाऊ शकेल. पण, भाजपमध्ये कधी काय होईल याचा अंदाज कोणालाही नसतो, त्यामुळं खरोखर नवा अध्यक्ष कधी विराजमान होईल हे सांगता येत नाही. भाजपच्या पक्षाच्या घटनेनुसार निम्म्या राज्यात प्रदेश संघटनेची निवडणूक होऊन नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त झाल्यानंतरच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाते. ३६ राज्यांपैकी १२ राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष नेमले गेले आहेत. अजून ६ प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यावर राष्ट्रीय स्तरावर निवडणूक होईल. पण, ही प्रक्रिया कधी पूर्ण होईल याचा फक्त अंदाजच करता येत असल्यामुळं नड्डांना राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने राज्या-राज्यांमध्ये फिरता येऊ शकेल असं दिसतंय.
‘दुसू’तील नेत्या…
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड झाल्यावर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी ३० वर्षांपूर्वीचं दिल्ली विद्यापीठातील गुप्ता आणि लांबा यांचं एकत्रित छायाचित्र समाजमाध्यमावर अपलोड केलं होतं. ते छायाचित्र खूप व्हायरल झालं होतं. या दोन्ही महिला नेत्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (दुसू) निवडणुकांमध्ये सक्रिय होत्या. लांबा यांनी विद्यापीठातील निवडणुकीत अध्यक्षपद जिंकलं होतं, तर गुप्तांनी महासचिवपद. लांबांनी ‘युवक काँग्रेस’कडून तर गुप्ता यांनी ‘अभाविप’कडून ‘दुसू’ची निवडणूक जिंकली होती. गुप्ता पुढे नगरसेविका बनल्या, लांबांना नगरसेवक होता आलं नाही. लांबा यांनी चार वेळा दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली, त्यापैकी तीन वेळा काँग्रेसकडून आणि एकदा आपकडून. २०१५ मध्ये ‘आप’कडून लांबा यांनी चांदनी चौक मतदारसंघातून एकमेव विजय मिळवला होता. यावेळीही लांबा यांनी काँग्रेसला चांदनी चौकातून उमेदवारी देण्याची विनंती केली होती. पण, तत्कालीन मुख्यमंत्री आतिशींविरोधात लढण्याचा आदेश पक्षाने दिला. पक्षादेश मानून लांबा यांनी ही निवडणूक लढवलीही. त्यांचं म्हणणं होतं की, निवडणुकीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळायला हवा होता. लांबा यांनी पहिली निवडणूक २००३ मध्ये तत्कालीन भाजपचे दिग्गज नेते मदनलाल खुराना यांच्याविरोधात लढवली होती. लांबा यांचं म्हणणं होतं की, त्यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक आव्हान होतं. विरोधक तुलनेत सशक्त असूनही त्यांनी निवडणूक लढवली. ‘दुसू’तून दिल्ली गाजवणाऱ्या नेत्यांमध्ये लांबा यांचं नाव आता घेतलं जातंय. अजय माकन, अरुण जेटली यांनीही दिल्ली विद्यापीठ निवडणुका जिंकल्या आणि पुढं आपापल्या पक्षामध्येही ते राष्ट्रीय स्तरावरील नेतेपदापर्यंत पोहोचले. रेखा गुप्ता आणि अलका लांबा यांची वाटचालही त्या दिशेने होऊ लागली आहे. सध्या काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये लांबा यांचं नाव घेतलं जातं. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळं तिथं तळ ठोकणार असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. आता राज्यांच्या निवडणुकीत महिला मतदार हा कळीचा मुद्दा असल्यानं काँग्रेस आणि भाजपसाठी महिला नेत्या महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील ‘मामा’
मध्य प्रदेशात ‘मामां’नी म्हणजे शिवराजसिंह चौहान यांनी केलं, महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केलं, दिल्लीत अरविंद केजरीवालांनी केलं, तेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांना करायचं आहे. त्यांना उत्तर प्रदेशचा ‘मामा’ बनायचं आहे असं दिसतंय! उत्तर प्रदेशमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तसा या निवडणुकीला बराच अवकाश आहे, त्याआधी बिहारमध्ये निवडणूक होईल. पण, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचे वारे २०२५ मध्येच वाहू लागले आहे. महाकुंभ मेळ्यातून भाजपने निवडणुकीचा अप्रत्यक्षपणे प्रचार सुरू केलेलाच आहे. महाकुंभ मेळा यशस्वी झाल्याचा गवगवा केला जात आहे. हे फक्त भाजपचं यश नव्हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं यश मानलं जात आहे. योगींचं यश हीच त्यातील खरी मेख आहे! निवडणुकीआधी दीड-दोन वर्षं भाजपनं आघाडी घेतली असेल तर, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समाजवादी पक्षालाही रिंगणात हुकुमी सोंगट्या फेकाव्याच लागतील. ‘सप’चे प्रमुख सहकुटुंब लंडनला फिरायला गेलेले आहेत. पण, जाण्याआधी त्यांनी ‘सप’च्या जाहीरनाम्यामध्ये काय असेल याचं सूतोवाच केलेलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळाली तर तिथल्या महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना लागू केली जाईल असं त्यांनी घोषित केलं आहे. राज्यातील निवडणुका जिंकायच्या असतील तर महिला मतदारांचा विश्वास जिंकावा लागेल असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटू लागलं आहे. मध्य प्रदेशमध्ये मामांनी ‘लाडली बहीण’ योजनेच्या आधारावर भाजपला जिंकून दिलं होतं. एवढं करूनही त्यांचं मुख्यमंत्रीपद राहिलं नाही हा भाग वेगळा. अखिलेश यांनी ‘मागास, दलित आणि आदिवासी’ असं सूत्रं मांडलेलं आहे. या वर्गातील महिलांसाठी विशेष योजना लागू केली पाहिजे असं अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे. मध्य प्रदेशमध्ये जसं ‘मामां’नी विद्यार्थिंनींना लॅपटॉप, स्कुटीचं आश्वासन दिलं होतं तसंच, अखिलेश यांनी मुलींसाठी लॅपटॉप आणि मोबाइलचं आश्वासन दिलेलं आहे. अखिलेश यांच्या या आश्वासनांमुळं उत्तर प्रदेशमध्येही रेवड्यांचा खेळ खेळला जाईल असं दिसतंय. मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये भाजपला लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला. दिल्लीत केजरीवालांना झाला नाही, तिथं भाजपने बाजी मारली, आता उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांना महिला मतदारांच्या भरवशावर सत्ता मिळवायची आहे. पण, योगी महाकुंभ मेळ्यानंतर कोणता डाव टाकतात हे बघायचं. दिल्लीमध्ये भाजपनं ‘लाडली बहना’ योजनेमध्ये दरमहा २५०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, या योजनेला मंजुरी देऊन भाजपच्या सरकारनं वचनपूर्ती केली आहे.