सिद्धार्थ खांडेकर

आफ्रिका आणि आशिया या खंडांमध्ये अधिक प्रतिनिधित्व देण्याइतकी गुणवत्ता नसल्याचा दावा कतार २०२२ स्पर्धेत फोल ठरल्यानंतर आता फुटबॉलचा विश्वचषक बदलतो आहे..

MCA honours mumbai 1st ever first class match members 10 lakh cash rewards sunil gavaskar farokh engineer at Wankhede Stadium
Wankhede Stadium : १९७४ च्या मुंबई संघातील ८ सदस्यांचा एमसीएकडून प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
delhi assembly election loksatta news,
मुख्यमंत्री फडणवीस, गडकरी आता दिल्ली विधानसभेच्या मैदानात… ‘हे’ आहेत भाजपचे ४० स्टार प्रचारक
Anuj Rawat leave Delhi Team and join Gujarat Titans camp ahead IPL 2025 season
Anuj Rawat : आयपीएलला प्राधान्य देणे ‘या’ खेळाडूला पडणार महागात, गुजरात टायटन्ससाठी रणजी संघाची सोडली साथ
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
Sunil Gavaskar and others felicitated by MCA at Wankhede Stadium
वानखेडे स्टेडियमचे योगदान महत्वाचे! सुनील गावस्कर यांची भावना; तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने क्रिकेट पंढरी दुमदुमली
Loksatta Lokrang Comfort Food Hapus Mango Market
बारमाही : असले जरी तेच ते…

विश्वचषक फुटबॉल इतिहासातील सर्वात रोमांचकारी अंतिम सामना यंदा कतारमध्ये खेळला गेला. दोन जवळपास तुल्यबळ संघ, सरत्या पिढीतील थोरवी आणि नव्या पिढीतील उत्थान यांचे प्रतीक ठरू शकतील असे दोन खेळाडू विरोधी संघांमध्ये असणे, असा सगळा केवळ रसिकप्रेमी नव्हे, तर मार्केटस्नेही जामानिमाही जुळून आला. सर्वाधिक धक्कादायक निकाल या स्पर्धेत दिसून आले. वेगवेगळय़ा तीव्रतेच्या अशा आठ निकालांची नोंद घेतली गेली. इतक्या मोठय़ा प्रमाणात कोणत्याही आधीच्या स्पर्धेत असे अनपेक्षित निकाल दिसून आले नव्हते. अरब आणि मुस्लीम देशातली पहिली स्पर्धा, उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचलेला पहिला आफ्रिकी आणि अरब संघ अशी अपूर्वाई होतीच. प्रत्येक आफ्रिकी संघाने किमान एक सामना जिंकला हेही नवल, ज्याची दखल फारशी घेतली गेली नाही. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातले तीन मातब्बर संघ म्हणजे ब्राझील, जर्मनी आणि इटली. यांतील पहिला संघ उपान्त्यपूर्व फेरीत गारद झाला, दुसरा बाद फेरीही गाठू शकला नाही. तिसऱ्या संघाला तर या स्पर्धेसाठी पात्रता फेरीच पार करता आली नाही. या तीन मातब्बरांच्या अनुपस्थितीत खेळला गेलेला अर्जेटिना आणि फ्रान्स यांच्यातला अंतिम सामना विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक संस्मरणीय सामना ठरावा, याचा अर्थ फुटबॉलमध्ये प्रस्थापितांची सद्दी मोडीत निघाली, असा समजावा काय? कोणत्याही परिसंस्थेच्या- समाज किंवा क्रीडा क्षेत्र- प्रवाहीपणाचे एक लक्षण म्हणजे नवीन विजेते निर्माण होणे आणि त्यातून स्पर्धा अधिक तीव्र होणे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला १९३० मध्ये सुरुवात झाली. फुटबॉल हा खऱ्या अर्थाने वैश्विक खेळ मानला जातो. या खेळाची परिचालक संघटना असलेल्या फिफाचे जितके सदस्य आहेत, तितके ते कदाचित संयुक्त राष्ट्रांचेही नसतील. जवळपास २११ पूर्ण वेळ सदस्य देश आहेत या संघटनेचे. यांतील बहुतेकांच्या खंडीय स्पर्धा होतातच. पण फिफा वल्र्ड कप म्हणजे सर्वाधिक चर्चिली आणि पाहिली जाणारी स्पर्धा. ‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’! कतारमधील स्पर्धा जमेस धरून आजवर २२ स्पर्धा झाल्या. ज्यात ब्राझील पाच वेळा, जर्मनी आणि इटली प्रत्येकी चार वेळा, अर्जेटिना तीन वेळा, फ्रान्स व उरुग्वे प्रत्येकी दोन वेळा आणि इंग्लंड व स्पेन प्रत्येकी एकेकदा विजेते ठरले. म्हणून एकूण आठ विजेते. याव्यतिरिक्त हंगेरी, स्वीडन, नेदरलँड्स, (पूर्वाश्रमीचे) चेकोस्लोव्हाकिया, क्रोएशिया हे संघ एक किंवा अधिक वेळा उपविजेते ठरलेले आहेत. याचा अर्थ आजवर केवळ १२ देशांनाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आलेली आहे. म्हणजे ९२ वर्षे, २२ स्पर्धा, या कालावधीत सदस्यसंख्या सुरुवातीच्या आठवरून दोनशेवर पोहोचली, तरी विजेते संघ आठच आणि निव्वळ उपविजेते ठरलेले संघ चारच! पुन्हा १२ संघही केवळ दोनच खंडांमधले – युरोप आणि दक्षिण अमेरिका. तेव्हा जागतिक म्हणवल्या जाणाऱ्या फुटबॉल खेळातील या उच्चतम स्पर्धेला विश्वचषक म्हणावे, की प्रस्थापितांनी हौशी निमंत्रितांना बोलावून भरवलेली खेळजत्रा म्हणावे?

कतारमधील स्पर्धा अनेक बाबतीत अभूतपूर्व होती. यात अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. परंतु अंतिम समीकरणात, अर्जेटिना आणि फ्रान्स या प्रस्थापित संघांमध्येच जगज्जेता ठरवण्यासाठी सामना झाला हे नाकारता येत नाही. हे दोन्ही संघ फुटबॉल प्रस्थापितांच्या उतरंडीमध्ये दुसऱ्या फळीतील म्हणता येतील असे. अर्जेटिनाने १५ वेळा कोपा अमेरिका स्पर्धाही जिंकली आहे. फ्रान्स हा तर फिफाचा संस्थापक सदस्य. या देशानेही दोनदा युरो जिंकली असून, दोन वेळा विश्वचषक जिंकलेला आहे. एकूण तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी तेही सिद्ध होते. परंतु यामुळे स्पर्धेच्या प्रस्थापित पॅटर्नमध्ये खंड पडलेला नाही. नवीन सहस्रकात केवळ दोनच संघांना पहिल्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत धडकता आले. स्पेन २०१० आणि क्रोएशिया २०१८. स्पेन विजेते ठरले आणि क्रोएशिया उपविजेते. नवीन जगज्जेता लाभण्याचा कालावधी पाहिल्यास, अर्जेटिना (१९७८), फ्रान्स (१९९८) आणि स्पेन (२०१०) असे ४४ वर्षांमध्ये तीनच देश. जवळपास इतक्याच काळात आणखी केवळ दोनच नवीन देशांना (नेदरलँड्स, क्रोएशिया) अंतिम फेरी गाठता आली. या काळात विश्वचषक स्पर्धेतील संघांची संख्या १६ वरून २४ आणि पुढे ३२ वर गेली हे लक्षात घ्यावे लागेल. पुढील विश्वचषक स्पर्धेत ४८ संघ उतरणार आहेत. त्या स्पर्धेत तरी नवीन विश्वविजेता पाहायला मिळेल का, असा प्रश्न आहे.

फिफाचे सर्व संस्थापक सदस्य युरोपियन होते. १९०४ मध्ये ही संघटना स्थापन झाली, त्या वेळी बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झर्लंड, स्पेन, नेदरलँड्स आणि जर्मनी या देशांपुरताच संघटनेचा पैस मर्यादित होता. ही संघटना सहा खंडीय उपसंघटनांमध्ये विभागली गेलीय. यात दक्षिण अमेरिकेच्या संघटनेचे दहा सदस्य आहेत. युरोपीय संघटना अर्थात युएफाचे सर्वाधिक ५५ सदस्य आहेत. युरोप ही क्लब फुटबॉलचीही पंढरी असल्यामुळे फुटबॉलच्या अर्थकारणावरील युरोपची पकड समजण्यासारखी आहे. पण आशियाई फुटबॉल संघटना (४७ सदस्य) आणि आफ्रिकी फुटबॉल संघटना (५६ सदस्य) इतक्या मोठय़ा संघटना विस्तारल्यानंतर यांच्यापैकी आजवर दोनच देशांना (द. कोरिया २००२, मोरोक्को २०२२) फार तर उपान्त्य फेरीपर्यंतच मजल मारता आली, याविषयी फिफाचे युरोपीय अध्यक्ष जियानी इन्फांतिनो यांच्या सल्लागारांमध्ये किंवा स्वित्झर्लंडस्थित फिफाच्या मुख्यालयात फार मंथन होत असावेसे जाणवत नाही. फिफाचे माजी पदच्युत अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी २०१३ मध्ये कॅरेबियन फुटबॉल संघटनेला विश्वचषकात स्थायी जागा देण्याविषयी विधान केले होते. आफ्रिकी आणि आशियाई संघांनाही त्यांचे ‘हक्का’चे स्थान विश्वचषकात मिळायला हवे. ही स्पर्धा म्हणजे काही युरोप आणि दक्षिण अमेरिकी देशांची मक्तेदारी नाही, असे कळकळीचे विधान त्यांनी केले. कालांतराने ही कळकळ या टापूंमधील सदस्य संघटनांच्या मतांसाठी अधिक होती, हे उघडकीस आलेच! फ्रान्सचा विख्यात माजी फुटबॉलपटू, कर्णधार आणि नंतर संघटक-प्रशासक बनलेला मिशेल प्लाटिनी याच्याकडून या मुद्दय़ावर अधिक परिपक्व भूमिकेची अपेक्षा होती. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ही जगातील देशांना एकत्र आणून खेळवण्याची स्पर्धा असेल, तर निव्वळ फुटबॉल गुणवत्तेच्या पलीकडे जाऊन विशेषत: आफ्रिकेसारख्या खंडांतून अधिक देशांना पात्रता संधी देण्याची गरज असल्याचे त्याने बोलून दाखवले होते. कालांतराने तोही ब्लाटर यांच्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला.

 विश्वचषक स्पर्धेमध्ये अधिक विजेते दिसण्यासाठी युरोप आणि दक्षिण अमेरिकेपलीकडे अधिक देश प्रथम स्पर्धेत खेळताना दिसायला हवेत, ही मागणी तशी जुनी. पण त्यावर अंमलबजावणी करण्याचे कोणीच फारसे मनावर घेतले नाहीत. बहुतांचा दावा असा- जो बरीच वर्षे खरा ठरलाही- की आफ्रिका आणि आशिया या खंडांमध्ये अधिक प्रतिनिधित्व देण्याइतकी गुणवत्ता नाही. पण कतार २०२२ स्पर्धेत या दाव्यातील फोलपणा लक्षात येऊ लागला. आफ्रिकाच नव्हे, तर आशियाई संघांनीही युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील मातब्बर संघांना सातत्याने हरवले. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे संयुक्तपणे भरवत असलेल्या २०२६ मधील विश्वचषक स्पर्धेत ४८ संघांपैकी १६ संघ युरोपचे असतील. आफ्रिका (९), आशिया (८), दक्षिण अमेरिका (६), मध्य व उत्तर अमेरिका व कॅरेबियन देश (६), ओशनिया (१) अशा ३० स्थायी जागा आहेत. याशिवाय उर्वरित दोन जागांसाठी आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका, मध्य व उत्तर अमेरिका आणि ओशनिया या संघटनांचे प्रत्येकी एक सदस्य आणखी एक पात्रता फेरी खेळतील. नवीन रचनेत आफ्रिका आणि आशिया यांना आधीच्या स्पर्धापेक्षा प्रत्येकी चार जागांची घसघशीत वाढ मिळालेली आहे. त्या तुलनेत युरोप (३) आणि दक्षिण अमेरिका (२) यांच्या वाटय़ाला फारशी वाढ आलेली नाही.

बहुतेक देश अस्थिर असूनही आफ्रिका खंडातील फुटबॉल संघांनी गेल्या काही स्पर्धामध्ये सातत्याने कामगिरी केली. पण सलग चार किंवा अधिक वर्षे सातत्य टिकवून ठेवण्याइतके स्थैर्य वा समृद्धी त्यांच्याकडे नाही. कतार २०२२ स्पर्धेपर्यंत केवळ पाचच जागांसाठी डझनभर गुणवान देशांमध्ये स्पर्धा असायची. तो आकडा आता १० वर गेल्यामुळे अधिक सुखद धक्क्यांची अपेक्षा बाळगायला हरकत नाही. फुटबॉल विश्वविजेत्यांचा बंदिस्त क्लब विस्तारण्याची प्रक्रिया तेव्हाच खरी सुरू होऊ शकेल.

sidhharth.khandekar@expressindia.com

Story img Loader