हरियाणामधील १९६७ सालच्या निवडणुकीत हसनपूर विधानसभा मतदारसंघात गया लाल या अपक्ष उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि त्यांनीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही तासांत त्यांचे ‘हृदयपरिवर्तन’ झाले आणि त्यांनी विरोधात असलेल्या संयुक्त मोर्चामध्ये प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एका दिवसात पक्ष बदलण्याची हॅट्ट्रिक करणाऱ्या गया लाल यांच्याविषयी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राव बीरेंद्र म्हणाले, ‘‘गया राम नहीं, ये तो आया राम है!’’ तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्यांविषयी बोलताना ‘आया राम, गया राम’ हा शब्दप्रयोग रूढ झाला. ‘तळ्यात मळ्यात’ खेळ खेळल्याप्रमाणे होणाऱ्या पक्षांतरांमुळे सरकारे कोसळू लागली. अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळेच यशवंतराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. बेबंद पक्षांतरावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय सुचविण्याचे काम या समितीकडे होते. या समितीने नोंदवले की ७ राज्यांमध्ये २१० आमदारांनी पक्षांतर केले. त्यापैकी ११६ जणांना मंत्रीपद प्राप्त झाले! त्यामुळे पक्षांतरासाठी कायदा असण्याची आवश्यकता अधोरेखित झाली; पण तेव्हा कायदा झाला नाही. अखेरीस १९८५ साली ५२वी घटनादुरुस्ती झाली आणि पक्षांतरबंदी कायदा पारित झाला. दहावी अनुसूची संविधानाला जोडली गेली. या घटनादुरुस्तीचे विधेयक तत्कालीन कायदा मंत्री अशोक कुमार सेन यांनी मांडले होते. सेन हे नेहरूंच्या मंत्रिमंडळाचाही भाग होते. या विधेयकाच्या उद्देशातच म्हटले होते: पक्षांतर हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर देशातील लोकशाही तत्त्वांचाच पराभव होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा