विबुधप्रिया दास

राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था ‘सीबीएसई’ची पाठय़पुस्तके तयार करते, त्यापैकी इतिहासाच्या पाठय़पुस्तकांत गेल्या सहा वर्षांत झालेले फेरबदल वादाचा विषय ठरले आहेत आणि ताजा वाद सध्या सुरूच आहे. किशोरवयीन मुलांना भारताच्या विविधांगी इतिहासाबद्दल जे कुतूहल असते, ते शमवण्यासाठी एरवीही पाठय़पुस्तकांच्या बाहेरचे काही वाचावे लागते. पण काय वाचायचे? इतिहासाच्या अभ्यासू पद्धतीने लिहिलेली पुस्तके मुलांना आवडतील/ पचतील का? हे सारे प्रश्न जणू ओळखून, त्यावर उपाय म्हणून ‘अ न्यू हिस्टरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक सिद्ध झाले आहे. पुस्तकाच्या नावात ‘द हिस्टरी’ नाही- ‘अ न्यू हिस्टरी’ असे म्हणण्यापासून त्याचे वेगळेपण सुरू होते. इतिहास बहुमुखी, बहुकेंद्री असतो, हे त्या ‘अ’मधून सूचित होते. तीन लाख वर्षे (मानवसदृश प्राण्याचा वावर), ७० हजार वर्षे (भारतभूमीवर मानवी वस्त्या) इथपासून आजपर्यंतचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकात असा बहुकेंद्री इतिहासकथनाचा प्रयत्न आहे, तो नवा ठरतो.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

इतिहासकथन जर बहुकेंद्री असेल, तर वाचकाच्या मनात पूर्वग्रह निर्माण होण्यापेक्षा, तथ्यांवर आधारलेल्या व्यापक दृष्टिकोनासाठी मदत होते. त्यामुळेच, कोणत्याही वयात वाचले तरी चालेल असे हे पुस्तक जितक्या कमी वयात वाचले जाईल तितके चांगले!

पुस्तकात वादाऐवजी संवादावर भर कसा आहे, याची उदाहरणे अनेक देता येतील. मुघल आक्रमणांविषयीचा भाग या दृष्टीने महत्त्वाचा. ही आक्रमणेच होती, परंतु आक्रमकांनी याच भूमीला आपले मानून इथेच बस्तान बसवले, उद्यानकला आणि वास्तुरचनेच्या शैली तसेच पद्धती इथे रुजवल्या, त्यासाठी स्थानिक कारागिरांची मदत घेतली, संस्कृतींची ‘गंगाजमनी’ सरमिसळ होत असताना केवळ संगीतालाच नव्हे तर धर्मचिंतनालाही बहर आला हे सांगताना, एकेश्वरवादी तत्त्वज्ञानाची ओळख आपल्याला झाल्यामुळे पंजाबात गुरू नानक, बंगालात चैतन्य महाप्रभू आणि ‘मध्यदेशा’त कबीर यांचे चिंतन प्रगल्भ झाले, याचा आढावाही इथे आहे. अर्थात, वेदकाळात भारतभूमीवर कायमस्वरूपी वस्त्या वसू लागल्या, यासारखे निरीक्षण त्याआधी येते आणि बुद्ध व महावीर यांच्याविषयीच्या लिखाणात केवळ कथा सांगण्यावर भर न देता, या धर्मातील तत्त्वज्ञानाचा प्रभाव हिंदू धर्मावरही कसकसा पडला, याचे उल्लेख येतात.

भारत ‘आसेतुहिमाचल’ आहे असे आज आपण सहजपणे म्हणतो, पण हा भूगोल सांस्कृतिक इतिहासाने एकसंध होण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागला तो कसा, याची खुलासेवार वर्णने पुस्तकात आहेत. यापैकी अगदी अलीकडचा संदर्भ मुघलकाळातही दख्खनने आपले निराळे सांस्कृतिक अस्तित्व टिकवले होते, याविषयीचा. तो अलीकडचा आहे, कारण त्या इतिहासाचे प्रतििबब आजही दिसू शकते आहे. भारतीय इतिहासाचा कालप्रवाह मांडताना केवळ उत्तरेतल्या मौर्य, गुप्त कालखंडांकडे इतिहासकारांनी अधिक लक्ष पुरवले, पण चोल, पंडियन घराण्यांचा काळ दुर्लक्षित राहिला. तसे या पुस्तकात होत नाही. ब्रिटिश काळाबद्दलच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष न करता, ब्रिटिशांच्या आगमनाने भारतात काय बदल घडले याकडेही लक्ष देणारे हे पुस्तक आहे. ‘भारतविद्या’ ही ज्ञानशाखा म्हणून मुळात ‘परक्यां’मुळेच वाढू शकली असती, याचा नम्र आणि मनोज्ञ उल्लेखही आहे.

मजकुरासोबत भरपूर चित्रे हे सर्व पाने रंगीत छपाईची असलेल्या या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्टय़. चित्रांखाली टिपा म्हणून शोभतील अशा ओळी (कॅप्शन) आहेत. पुस्तकाच्या अखेरीस घडामोडींचा ‘कालपट’ (टाइमलाइन) आहे, तोही घडत्या वयात उपयुक्त ठरणाराच. हे पुस्तक तिघांनी लिहिले असल्यामुळे असेल, पण त्यात एकारलेपणा नाही, त्यामुळे वादांच्या पलीकडचा इतिहास हे पुस्तक आजच्या पिढीला देऊ करते.

अ न्यू हिस्टरी ऑफ इंडिया

लेखक- रुद्रांशू मुखर्जी, शोभिता पंजा, टोनी सिन्क्लेअर

प्रकाशक- अलेफ बुक्स किंमत- ९९९ रुपये पाने- ४८० रु.

Story img Loader